महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. २८८ मतदारसंघांमध्ये काही हजार उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. पण प्रमुख लढत ही विद्यमान सत्ताधारी महायुती व विरोधक महाविकास आघाडी यांच्यात होणार असल्याचं दिसत आहे. एकीकडे भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे तीन पक्ष सत्ता पुन्हा मिळवण्याच्या निर्धाराने रिंगणात उतरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सगळ्या घडामोडींमध्ये मुंबईत सध्या चर्चा आहे घाटकोपर पूर्वमधील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार व उमेदवार पराग शाह यांची. काही दिवसांपूर्वी पराग शाह घरातच घसरून पडल्याने त्यांना दुखापत झाली. पायाला फ्रॅक्चर झालं. पण तरीही ते प्रचारासाठी मतदारसंघात पिरत आहेत. महाराष्ट्रातले सर्वात श्रीमंत उमेदवार अशी त्यांची ख्याती आहे. पायाला दुखापत झाल्यामुळे ते मतदारसंघात कसे फिरणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी यासाठी नामी शक्कल शोधून काढली आहे!

“मी घरातच घसरून पडलो. माझ्या गुडघ्याला फ्रॅक्चर झालं. डॉक्टरांनी मला सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. पण निवडणुका चालू आहेत. प्रचार चालू आहे. मी एक मिनीटही वाया घालवू शकत नाही. त्यामुळे मी प्रचार चालूच ठेवायचा निर्णय घेतला आहे”, असं शाह यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नमूद केलं. “मी माझ्या कार्यालयातच फिजिओथेरेपी घेतो. दुखापत झाल्यानंतर मी दोन हॉस्पिटल बेड बसवून घेतले आहेत. त्यातला एक माझ्या घरी तर दुसरा माझ्या कार्यालयात आहे”, असंही ते म्हणाले.

अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन

गोल्फकार्टची अनेखी शक्कल!

पराग शाह यांना दुखापत झाल्यानंतर त्यांना कारमध्ये चढून बसणं आणि उतरणं कठीण होतं. त्यामुळे मतदारसंघात प्रचारासाठी शाह कसे फिरणार? असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला होता. “आम्हाला कल्पना होती की त्यांच्या दुखापतीमुळे त्यांना जीप किंवा इतर गाड्यांमध्ये चढता येणार नाही. मग आम्ही त्यांच्यासाठी एक गोल्फकार्ट मागवली”, अशी माहिती भाजपा नेते प्रवीण छेडा यांनी दिली. गोल्फकार्टमध्ये पराग शाह पाय सरळ ठेवून बसू शकतात. त्यांच्यासाठी एक स्वतंत्रपणे तयार करून घेतलेली व्हॅन आणि सेमी ऑटोमॅटिक रॅम्पदेखील तयार करण्यात आल्याचं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार!

पराग शाह हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झालं आहे. १ नोव्हेंबर रोजी शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेही यांनी महायुतीतील सात नेत्यांच्या मालमत्तेची माहिती जाहीर केली होती. त्यात पराग शाह यांचाही समावेश होता. २०१९ च्या निवडणुकीवेळी पराग शाह यांची व त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती ४२२.६ कोटी होती. तसेच, विलेपार्ले, घाटकोपर, चेंबूर आणि गुजरातमधील काही मालमत्तांचं मूल्य ७९ कोटींच्या घरात होतं.

यावेळी उमेदवारी अर्जासोबत शाह यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची संपत्ती तब्बल ३ हजार ८०० कोटी इतकी नमूद करण्यात आली आहे. “मी सर्वात श्रीमंत उमेदवार आहे म्हणून माझी चर्चा होते हे खरं आहे. पण मला वाटतं एखाद्या व्यक्तीचं मन श्रीमंत असायला हवं. कधीकधी राजकारणी फक्त चर्चेत राहायचं म्हणून काहीही बोलतात”, असं पराग शाह म्हणाले.

पराग शाह यांना राखी जाधव यांचं आव्हान!

पराग शाह यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या उमेदवार राखी जाधव यांचं आव्हान असेल. “लोक पराग शाह यांना त्यांच्या पैशांमुळे ओळखतात त्यांच्या कामामुळे नाही. ते उघडपणे सगळ्यांना सांगत आहेत की त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नये कारण त्यांच्यावतीने काम करण्यासाठी त्यांनी इतर लोकांना कामावर ठेवलं आहे. मी नगरसेविका म्हणून गेली १५ वर्षं लोकांसाठी काम केलं आहे आणि यापुढेही मी ते करत राहीन”, असं राखी जाधव म्हणाल्या.

मी कोणतंही आश्वासन देत नाही – पराग शाह

दरम्यान, पराग शाह यांनी मात्र आपण मतदारांना कोणतंही आश्वासन देत नसल्याचं नमूद केलं. “मी जेव्हा २०१७ मध्ये स्थानिक निवडणुका लढवल्या होत्या किंवा २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती तेव्हाही मी कुणालाही कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं. २०१४मध्येही मी कोणतंही आश्वासन देत नाहीये. लोकांना माहिती आहे की मी एक विश्वासार्ह व्यक्ती आहे आणि देशासाठी काम करण्यासाठीच मी आलो आहे”, असा विश्वास पराग शाह यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ghatkopar east candidate parag shah fracture campaigning on golf cart pmw