उपेंद्र कुशवाह, मुकेश साहनी आणि चिराग पासवान हे तीन नेते बिहारमध्ये भाजपासोबत युती करण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तीनही नेत्यांना केंद्रीय सुरक्षा व्यवस्था देऊन उपकृत केले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि जेडीयूचे बंडखोर नेते कुशवाह यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा मागच्याच आठवड्यात देण्यात आली. माजी राज्यमंत्री आणि विकासशील इन्सान पार्टीचे (VIP) नेते साहनी यांना फेब्रुवारी महिन्यातच वाय प्लस सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. दोघांनाही हल्लीच राज्य सरकारची सुरक्षा व्यवस्थादेखील मिळाली होती. जानेवारी महिन्यात लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख खासदार चिराग पासवान यांनाही वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेवरून झेड दर्जाची सुरक्षा दिली गेली होती. झेड सुरक्षेंतर्गत २२ गार्ड, चार ते पाच एनएसजी कमांडो यांचा समावेश असतो. तर वाय प्लस कॅटेगरीमध्ये ११ पर्सनल गार्ड, दोन ते चार एनएसजी कमांडो असतात. या तीनही नेत्यांना गुप्तचर विभागाच्या माहितीआधारे सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.
या तीनही नेत्यांनी भाजपासोबत युती करण्याबाबत अद्याप जाहीर वाच्यता केलेली नाही. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत संभाव्य युतीचे सहकारी म्हणून भाजपा या तीन नेत्यांकडे पाहत आहे. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात कुऱ्हानी विधानसभा पोटनिवडणुकीत पासवान यांनी भाजपाचा प्रचार केला होता. साहनी यांच्या तीन आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे ते काही काळ भाजपावर नाराज होते. तरीही त्यांनी भाजपावर टीका केली नव्हती. तर उपेंद्र कुशवाह यांनी मागच्या महिन्यात जनता दल (युनायटेड) पक्षाला रामराम ठोकत स्वतःचा राष्ट्रीय लोक जनता दल (RLJD) हा पक्ष स्थापन केला होता. भाजपासोबत आपण युती करू, याचे सुतोवाच त्यांनी दिले आहेत.
हे वाचा >> “परत कधीच नितीश कुमारांबरोबर आघाडी केली जाणार नाही” बिहार भाजपाच्या कार्यकारिणीकडून ठराव मंजूर
जेडीयू आणि आरजेडी यांच्याकडे मोठ्या जातसमूहांचा पाठिंबा आहे. या परिस्थितीत हे तीन नेते भाजपाला विविध जातसमूहांचे मते मिळवून देण्यासाठी मदत करू शकतात. चिराग अनुसूचित जातींमधील (SC) पासवान समुदायाचे प्रतिनिधित्व करतो, कुशवाह हे ओबीसीमधील (OBC) कुशवाह समुदायचे प्रतिनिधित्व करतात आणि सहानी हे अतिमागास वर्गामधील (EBC) मल्लाह समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. या तीनही समुदायांची बिहारमधील लोकसंख्या १२ टक्के एवढी आहे.
बिहारमधील जातनिहाय मतदानाच्या गणिताबाबत बोलताना भाजपा नेत्याने सांगितले की, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, काँग्रेस आणि इतर चार पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांच्याकडे आमच्यापेक्षा १० टक्के अधिकची मते आहेत. यासाठीच भाजपाला महागठबंधनला तोंड देण्यासाठी चिराग पासवान, कुशवाह आणि साहनी यांची साथ हवी आहे. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि तीन जातसमूहांचे गणित जुळून आल्यास मतदानात त्याचा लाभ होईल, अशी अटकळ बांधली जात आहे.
चिराग पासवानला यांना दिलेल्या सुरक्षेव्यवस्थेबाबत बोलताना लोजपचे (राम विलास) प्रवक्ते विनित सिंह म्हणाले की, चिराग पासवान यांना वाय प्लसवरून झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील मुख्य कारण म्हणजे चिराग पासवान यांची वाढत चाललेली लोकप्रियता. तसेच ही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यामागे बिहारमध्ये बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था हेदेखील एक कारण आहे.
हे ही वाचा >> बिहारमध्येही महाराष्ट्रासारखंच ‘ऑपरेशन लोटस’ होणार भाजपा खासदाराचा मोठा दावा
कुशवाह यांच्या आरजेएलडीचे नेते राहुल कुमार म्हणाले की, उपेंद्र कुशवाह यांना देण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा ही गुप्तचर माहितीच्या आधारे दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी आरा बरेली येथे त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. आम्ही कधीही सुरक्षा व्यवस्था द्या म्हणून मागणी केली नाही. तरीही सुरक्षा व्यवस्था प्रदान केली, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. तसेच विरोधकांना विनंती करतो की, यावरून त्यांनी राजकारण करू नये.
मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पक्षाचे प्रवक्ते देव ज्योती यांनी सांगितले की, मुकेश साहनी हे निशाद किंवा मल्लाह समुदायचे नेते आहेत. माओवादी नेत्यांचा प्रभाव असलेल्या भागात साहनी दौरा करत असतात. तरी आम्ही सुरक्षा पुरविण्याबाबत कधीही मागणी केली नाही. या विषयाचे कुणी राजकीय अर्थ काढत असेल तर त्याला आम्ही रोखू शकत नाही. केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले की, या नेत्यांना धमक्या मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिल्यानंतर सदर सुरक्षा पुरविण्यात आली आहे.