PM Modi Cabinet लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात घटना बदलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा मुद्दा प्रभावी ठरला आणि मुस्लिमांबरोबरच दलित मतेही विरोधात गेल्याने महायुतीला मोठा फटका बसला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करण्यावर भाजपने भर दिला असून, दलित मतांवर डोळा ठेवूनच रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होत आहे.
रिपब्लिकन पक्षाची ताकद तशी मर्यादित आहे. लोकसभा निवडणुकीत शिर्डी राखीव मतदारसंघातून लढण्याची रामदास आठवले यांची इच्छा होती. पण महायुतीच्या नेत्यांनी आठवले यांना लोकसभेसाठी संधी दिली नाही. प्रचारात आठवले हे किल्ला लढवित होते. पण भाजपकडून त्यांना तेवढे महत्त्वही देण्यात आले नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आठवले यांची तुलना केल्यास आंबेडकर हे अधिक उजवे ठरतात.
भाजपचा ‘चारसो पार’च्या नाऱ्यामुळे निवडून आल्यास घटना बदल केला जाईल, असा जोरदार प्रचार झाला. महाराष्ट्रात हा मुद्दा भलताच प्रभावी ठरला. दलित मते महायुती व विशेषत: भाजपच्या विरोधात गेली. काँग्रेस व महाविकास आघाडीला मिळालेल्या यशात मुस्लीम आणि दलित मतांचे प्रमाण अधिक आहे. सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या चुका दुरुस्त करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुतोवाच केले आहे. यातूनच एकगठ्ठा दलित विरोधात जाऊ नयेत, असा भाजपचा प्रयत्न आहे.
रामदास आठवले यांचा राजकीय फायदा किती यापेक्षा आठवले बरोबर असल्याचा संदेश वेगळा जातो, असे भाजपमध्ये बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणूक तसेच पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये दलित मतांचे महत्त्व ओळखून रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा…भंडारा-गोंदिया लोकसभा : काँग्रेसची चार विधानसभेतील आघाडी भाजपसाठी धोक्याची घंटा
रामदास आठवले यांना भाजपने राज्यसभेसाठी संधी दिली आहे. आठवले यांची राज्यसभेची मुदत एप्रिल २०२६ पर्यंत आहे. तोपर्यंत विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पाडतील. यामुळे आठवले यांना पुढील दोन वर्षे तरी मंत्रिमंडळात कायम ठेवले जाईल, असे सांगण्यात येते.