धुळे : अलीकडच्या काळात राज्यकर्त्यांना शेतीशी आस्था राहिलेली नाही. कांदा निर्यात बंदीसारखे निर्णय घेतले गेले. महाराष्ट्र अधिकाधिक ऊस उत्पादन करणारे राज्य होते. या राज्यात आता उसाला किंमत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले. केंद्रातील सरकार हे शेतकरीविरोधी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
शिंदखेडा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारचे निर्णय कसे जनहितविरोधी आहेत, ते मांडले. कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक आणि सामान्यांचे रोजचे खाद्या असताना निर्यात बंदीचा निर्णय घेतला गेला. सरकारला या पिकाचे महत्त्व आणि ते पिकविणाऱ्यांबद्दल आस्था नाही. गहू, तांदूळ याबाबतही हेचे घडले. जे पिकवाल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी करण्याचे धोरण राबविले गेले. अशा पिकांना निर्यात बंदी करून नेमके काय साध्य करण्यात येते, हेच कळत नाही. यात सामान्य शेतकरी भरडला जातो, असे मांडत पवार यांनी, आपण केंद्रात कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे ७१ हजार कोटीचे कर्ज माफ केले होते, याकडे लक्ष वेधले.
हेही वाचा : Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली? काय आहे राजकीय गणित?
या सरकारला सत्तेचा माज आला आहे. कष्टकऱ्यांच्या या परिसरात २० वर्षांच्या सत्ता काळात कोणता विकास झाला, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. ना कारखाने उभे राहिले, ना सहकार चळवळ मजबूत झाली. महाराष्ट्रात गुंडगिरी आणि सत्तेचा गैरवापर सुरू आहे. हे सरकार आता बहिणींना दरमहा १५०० रुपये देत आहे. परंतु, लाडक्या बहिणींची अब्रू कोण वाचवणार, बहिणींचा सन्मान कोण राखणार असे प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केले.
यावेळी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी शेतकऱ्यांची अवस्था, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राज्य सरचिटणीस संदीप बेडसे यांनी शिंदखेडा मतदारसंघातील समस्या मांडल्या. जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, कामराज निकम यांचीही भाषणे झाली. धुळे शहराध्यक्ष रणजित भोसले, माजी महापौर कल्पना महाले, हेमलता शितोळे आदी उपस्थित होते.
भाजप आमदारांकडून शरद पवार यांचे स्वागत
शिरपूर विमानतळावर शरद पवार यांचे स्वागत भाजपचे आमदार अमरिश पटेल, उद्याोजक तथा माजी नगराध्यक्ष भूपेश पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यामुळे पवार चकित झाले. आपण कोणत्या पक्षाचे, इथे कसे आलात, असा प्रश्न त्यांनी केल्यावर आमदार पटेल यांनी स्मितहास्य केले. बंधू भूपेश पटेल यांना आपण याआधी मदत केल्याचे आमदार पटेल यांनी पवार यांना सांगितले. विमानतळ कुणाचे, असा प्रश्नही पवार यांनी केला.