उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपा सरकार आग्राला नवीन ओळख देईन, असं म्हटलं आहे. २०१७ पर्यंत सर्वात गलिच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रा शहराला आता मेट्रो आणि स्मार्ट सिटीशी संबंधित सुरू असलेल्या विविध योजनांमुळे नवीन ओळख प्राप्त होईल. असं योगींनी म्हटलं आहे. तारघर मैदानावर आयोजित प्रबुद्धजन संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री योगींनी ४८८ कोटी रुपयांच्या ८८ प्रकल्पांचे उद्धाटनही केले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील बुलेट ट्रेनच्या गतीने वाढणाऱ्या विकासाचा वेग थांबू दिला जाणार नाही, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे.
याशिवाय आग्रा मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री योगींनी काम वेगाने सुरू आहे आणि पुढील वर्षी ही सुविधा लोकांसाठी खुली केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी आग्राच्या कायपालटासाठी भाजपाच्या डबल इंजिन सरकारला श्रेय दिले. ते म्हणाले “२०१७ पर्यंत देशातील सर्वात गलिच्छ शहर आता स्वच्छ, सुरक्षित आणि स्मार्ट बनले आहे.”
मुख्यमंत्री योगी म्हणाले, आग्रा शहराचा समावेश २०१७ च्या अगोदर गलिच्छ शहरांमध्ये व्हायचा. मात्र पाच वर्षांमध्ये चित्र बदलले आहे. मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जे आग्राला नवीन ओळख देत आहे. इथे संग्रहालयाच्या नावाखाली गोंधळ घातला जात होता, मुघल म्युझियम बनवले जात होते. परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ते बनवले. आग्रामध्ये आयटी उद्योग येतील, हजारोंना हाताला काम मिळेल.
या अगोदर त्यांनी आगामी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा उमेदवार रघुराजसिंह शाक्य यांचा मैनपुरी येथे प्रचार केला.