अकोला : राज्यातील विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे लक्ष्य ठेवले. त्यासाठी पक्षाच्या संघटनात्मक जाळ्याचा विस्तार व मजबुतीकरणावर भर दिला जात आहे. पक्षाच्या ‘संघटन पर्व’ मोहिमेंतर्गत सदस्य नोंदणी अभियान जोमाने सुरू आहे. पक्षाने महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले. ते पूर्ण करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यापासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांना पक्षाने कामाला लावल्याचे चित्र आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश पुसून काढत विधानसभेमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यावर समाधानी न राहता आता भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गत अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. राजकीय आरक्षणाचे न्यायप्रविष्ठ प्रकरण निकाली निघून आगामी काळात स्थानिक निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप जोमाने कामाला लागला. संघटनात्मक कार्यामध्ये इतर पक्षांच्या तुलनेत भाजप सदैव अनेक पाऊल पुढे असतो. संघटनात्मक दृष्ट्या भाजपची मजबूत फळी आहे. त्याचा विस्तार करून त्याला बळकटी देण्याचे पक्ष नेतृत्वाचे प्रयत्न आहेत.
सुमारे १२ कोटीवर लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले. सर्वसामान्यांना पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न आहेत. सदस्य नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार केला जात असून त्यासाठी मोबाइल क्रमांक देखील प्रसारित केले. बुथननिहाय नियोजन करण्यात आले. पक्षाचे महाराष्ट्रात एक लाख बुथ असल्याचा दावा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने केला. प्रत्येक बुथला २०० सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट दिले. आतापर्यंत भाजपचे एक कोटी १० लाख सदस्य नोंदणी पूर्ण झाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी इच्छूक असलेले सदस्य नोंदणीच्या कामाला लागले आहेत. इच्छुकांमध्ये सदस्य नोंदणीची चढाओढ दिसून येते. खासदार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांना उद्दिष्ट विभागून देण्यात आले असून ते पूर्ण होण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. एक हजार सदस्य नोंदणी करणाऱ्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर प्रदेशाध्यक्ष पत्राद्वारे कौतुकाची थाप देखील देतात.
‘संघटन पर्व’ अंतर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पश्चिम विदर्भातील पदाधिकाऱ्यांची अकोल्यात, तर पूर्व विदर्भाची कार्यशाळा नागपुरमध्ये घेतली. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने काम करावे, बूथ स्तरापासून पक्ष वाढीसाठी सुक्ष्म नियोजन करून कार्यरत राहण्याचा संदेश दिला. भाजपचा विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रभावी कार्य करणे अपेक्षित असल्याच्या सूचना कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांना दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्याचा मार्ग हा तळागाळातून जातो. त्या दृष्टिनेच भाजपने सदस्य नोंदणीचे नियोजन केल्याचे स्पष्ट होते.
पश्चिम विदर्भात ‘अकोला पूर्व’ अव्वल
भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानामध्ये पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सदस्य नोंदणी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात झाली. संपूर्ण विदर्भाचा विचार केल्यास अकोला पूर्व तिसऱ्या स्थानावर आहे.
राज्यात भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर कार्यकर्त्यांची मेहनत व समर्पणामुळे मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करणे पक्षाला शक्य झाले. पुढील काळात दीड कोटी सदस्य नोंदणी करून राज्यातील सर्वात मोठा पक्ष करण्याचे उद्दिष्ट आहे. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष, भाजप.
राज्यात भाजपची एक कोटी १० लाख सदस्य नोंदणी पूर्ण झाली. ठरवलेल्या उद्दिष्टानुसार लवकरच पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण होईल. सदस्य नोंदणीचे बुथनिहाय नियोजन असून जोमाने कार्य सुरू आहे. – आ.रणधीर सावरकर, मुख्य प्रतोद तथा प्रदेश सरचिटणीस, भाजप.