भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, केरळचे सरचिटणीस व माजी राज्यसभा खासदार बिनॉय विश्वम यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीवर टीका केली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये अनेक विषयांबाबत मतभेद असल्यामुळे लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला मागील लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला असल्याचे विधान त्यांनी केले आहे. दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये विश्वम यांनी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटमध्ये कोणत्या अडचणी आहेत आणि कोणत्या बाबींवर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, याविषयी भाष्य केले आहे.
प्रश्न : अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये केरळमध्ये डाव्यांना बसलेल्या फटक्याकडे तुम्ही कसे पाहता?
हा मोठा फटका आहे, हे मान्य केले पाहिजे. हा जनतेने दिलेला कौल आहे. आम्हा कम्युनिस्ट लोकांसाठी लोकच महत्त्वाचे आहेत. जेव्हा लोक असा निर्णय देतात, तेव्हा तो स्वीकारण्याची जबाबदारी आमची आहे. असे का घडले त्याचे आत्मपरीक्षण करणे आमच्यासाठी गरजेचे आहे. आम्हाला फटका का बसला याची कारणे आम्ही शोधली पाहिजेत. झालेल्या चुकांचे विश्लेषण केले पाहिजे. हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे. हे आमच्या इतिहासाचे शेवटचे पान नाही, याची आम्हाला खात्री आहे. इतिहास घडत राहील आणि त्यामध्ये डावे पक्ष केरळचे राजकीय भविष्य ठरविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत राहतील. आम्हाला आमच्या कामगिरीचे आत्मपरीक्षणात्मक विश्लेषण केले पाहिजे.
हेही वाचा : काँग्रेसचे आमदार फोडून सत्तेवर आलेल्या भाजपामध्ये धुसफूस; पुडुचेरीमध्ये काय घडतंय?
प्रश्न : या पराभवामागचे प्रमुख कारण काय आहे?
या पराभवामागचे कारण एका वाक्यात अथवा एका मुद्द्याच्या आधारे सांगता येणार नाही. त्याला अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे सामाजिक-राजकीय परिस्थिती होय. या निवडणुकीमध्ये अनेक शक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समाजातील जे घटक आम्हाला पाठिंबा देतील, असे आम्हाला वाटत होते, त्यांच्या वृत्तीत काही बदल झाला आहे का? याचा विचार करावा लागेल. तसेच आम्हाला आमची धोरणे, कामगिरी, आमच्या सरकारचे प्राधान्यक्रम आणि राजकीय-सामाजिक आयुष्याकडे पाहण्याचा कम्युनिस्ट दृष्टिकोन पुन्हा तपासून पहावा लागेल. या सगळ्याचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे. आम्हाला लोकांशी संवाद साधण्याची, सल्लामसलत करण्याची प्रक्रिया नव्याने तयार केली पाहिजे. आम्ही खुलेपणाने लोकांशी संवाद साधला पाहिजे. जे आधी आमच्याबरोबर होते आणि आता आमचे टीकाकार झाले आहेत, अशा मित्रांशीही आम्हाला बोलले पाहिजे. केरळमधील मोठा वर्ग डाव्यांना पाठिंबा देतो. ते चळवळीचे कार्यकर्ते नसतील; मात्र, ते डाव्यांचे पाठीराखे राहिले आहेत. जर या वर्गाला असे वाटत असेल की, आम्ही काही चुका केल्या आहेत, आमचा मार्ग चुकला आहे… तर आम्ही तक्रार न करता, ते काय विचार करतात, ते शांतपणे ऐकून घेतले पाहिजे.
प्रश्न : हा मुद्दा विस्ताराने सांगा…
केरळमधील एका मोठ्या वर्गाला डाव्यांचा राजकीय आधार वाटतो. डावे विश्वासार्ह वाटतात. त्यांना असे वाटते की, डावे त्यांचा मार्ग सोडणार नाहीत. त्यातील काहींना असे वाटते की, आम्ही बदललो आहोत. त्यांच्याकडे शत्रू म्हणून पाहण्याऐवजी आम्ही त्यांच्याशी शांतपणे संवाद साधला पाहिजे. ते असा विचार का करतात आणि त्यांचा विश्वास पुन्हा प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार करायला हवा. राजकीय, सामाजिक, संघटनात्मक, आमची काम करण्याची पद्धती, तसेच ज्या पद्धतीने आम्ही राजकारण करीत आहोत, त्या सगळ्याच मुद्द्यांवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. आम्ही उद्दाम वाटता कामा नये. उद्दाम असणे हा डाव्यांचा मार्ग नाही. जितके आम्ही ताकदवान होऊ, तितके आम्ही सत्तेत राहू. त्यामुळे आम्ही अधिकाधिक विनम्र असणे गरजेचे आहे. आम्हाला अगदी आमच्या कुटुंबासहित वैयक्तिक आयुष्यातही बदल घडविणे गरजेचे आहे.
तुम्ही उद्दामपणाबद्दल बोललात. केरळचे मुख्यमंत्री, मंत्री वा पक्षाच्या कार्यकर्त्यांविषयी तुम्हाला बोलायचे आहे का?
एखाद्या व्यक्ती अथवा गटाबद्दल भाष्य करणे योग्य होणार नाही. मी सामान्यत: डाव्यांबद्दल बोलत आहे. त्यामध्ये भाकप आणि माकप या दोघांचाही समावेश आहे. माकपला लक्ष्य करणे हा उद्देश नाही. मी जे बोलत आहे, ते दोन्हीही पक्षांना लागू आहे. ज्या सुधारणा करायच्या आहेत, त्या डावे पक्ष म्हणून एकत्र येऊनच कराव्या लागतील. लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला मजबूत करणे हा आमचा हेतू आहे. त्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याची गरज आहे. त्यामध्ये माकप आणि भाकप या दोन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे.
सरकारविरोधी जनमताचा कौल होता का? त्याबद्दल काय सांगाल?
केंद्र सरकारकडून लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला अनेक आर्थिक हल्ल्यांना तोंड द्यावे लागत होते. हे एक प्रकारे आर्थिक निर्बंधासारखे होते. त्यामागची कारणे राजकीय आहेत. भाजपा सरकारने फक्त डाव्यांच्या सरकारला शत्रू समजून वागवले. डाव्यांच्या सरकारची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे राज्याला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. स्वाभाविकत: नैसर्गिकरीत्या अनेक विकास प्रकल्प, लोककल्याणकारी धोरणे आणि योजनांवर परिणाम झाला.
हेही वाचा : काँग्रेसने मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे मोदींचे वक्तव्य; काय आहे इतिहास?
प्रश्न : हे फक्त एकच कारण होते का? माकपमध्येच मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून टीका होत होती.
भाकपचा सरचिटणीस म्हणून मला ही चर्चा फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित करायची नाही. जे काही आम्ही साध्य करू शकलो, तो सामूहिक प्रयत्नांचा भाग होता. तसेच जे काही करू शकलो नाही, तेदेखील आमचे सामूहिक अपयशच आहे. आम्ही आमच्या कॉम्रेड्सना एकटे पाडू इच्छित नाही. आम्ही फार चांगले आणि ते वाईट, असे आम्हाला म्हणायचे नाही. या सुधारणा दोघांसाठीही लागू आहेत.
प्रश्न : केरळमध्ये भाजपाचा प्रभाव वाढत आहे आणि डाव्यांचा मतटक्का कमी होत आहे. त्याबद्दल काय सांगाल?
२०१९ मध्येही आम्हाला फटका बसला होता. त्यावेळी आम्हाला एकच जागा मिळाली होती. या वेळची चिंता अशी आहे की, भाजपाचा प्रभाव वाढला आहे आणि त्यांना एका जागेवर यशही मिळाले आहे. केरळमध्ये भाजपा हाच असा पक्ष आहे; ज्याचा मतटक्का वाढला आहे. तब्बल ११ विधानसभा मतदारसंघांमध्ये ते पहिल्या स्थानी; तर आठ मतदारसंघांमध्ये ते दुसऱ्या स्थानी राहिले आहेत. हे गंभीर आहे. हा मोठा धोका आहे. फक्त डाव्यांचीच मते भाजपाने खाल्ली, असे मी म्हणत नाही. युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट अशा दोघांचीही मते भाजपा गिळंकृत करीत आहे. मात्र, याहून चिंताजनक बाब अशी आहे की, ज्या मतदारसंघांवर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवत होतो, ते आता भाजपाला मतदान करीत आहेत. माकप आणि भाकपचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या अनेक मतदारसंघांमध्ये आता भाजपाचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. त्यामुळे आत्मपरीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे.