मोहन अटाळकर

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले असताना अमरावती मतदार संघात मात्र भाजपसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पाठिंबा द्यायचा की, त्‍यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देण्‍याचा प्रयत्‍न करायचा, अशी तळ्यात-मळ्यात स्थिती भाजपची बनली आहे.

BJP MLA preparing for rebellion Supporters are invited to fill the application form Wardha
भाजप आमदार बंडखोरीच्या तयारीत? अर्ज भरण्यास दिले समर्थकांना निमंत्रण
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
BJP rejected sitting MLA Lakhan Malik and gave chance to Shyam Khode in Washim Constituency
वाशीममध्ये भाजपने भाकरी फिरवली, विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; श्याम खोडे यांना संधी
BJP, Vidarbha, assembly election 2024
भाजप विदर्भातील आणखी तीन विद्यमान आमदारांना डच्चू देणार
aditya Thackeray allegation eknath shinde
भाजपविरोधात बंडखोरांना शिंदेंकडून आर्थिक रसद; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप
MNS nominated former corporator Dinkar Patil from Nashik West after BJP's ticket distribution
भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार
assembly elections in Satara the BJP won four seats from the Mahayuti the Sena and the Rashtravadi two seats
साताऱ्यात महायुतीकडून भाजपला चार तर सेना, राष्ट्रावादीला दोन जागा; भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची माहिती
Nashik Central constituency remains contentious between BJP and Shiv Sena
नाशिक मध्य जागेवरुन भाजप, शिवसेनेत रस्सीखेच

भाजप-शिवसेना युतीच्‍या काळात १९९१ च्‍या निवडणुकीपासून भाजपला कधीही अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवारीची संधी मिळू शकली नाही. आजवर या मतदार संघावर शिवसेनेचेच वर्चस्‍व राहिले. २०१९ च्‍या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर अपक्ष उमेदवार म्‍हणून नवनीत राणा रिंगणात होत्‍या. त्‍यांनी शिवसेनेचे दिग्‍गज नेते आनंदराव अडसूळ यांचा मोदी लाटेतही पराभव केला. कॉंग्रेस- राष्‍ट्रवादीसाठी हा आनंद मात्र औट घटकेचा ठरला. नवनीत राणा यांनी लगेच केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा दिला.

हेही वाचा… अजित पवारांच्या खेळीने पुण्यात भाजपची कोंडी

नवनीत राणा आणि त्‍यांचे पती आमदार रवी राणा यांचा युवा स्‍वाभिमान हा स्‍वतंत्र पक्ष आहे. राणा दाम्‍पत्‍याला देखील पक्षाच्‍या विस्‍ताराचे वेध लागले आहेत, पण त्‍यांनी २०१९ पासून हिंदुत्‍वाचा मार्ग निवडला आहे. राज्‍यात महाविकास आघाडी सरकार स्‍थापन झाले, तरी रवी राणांनी दिशा बदलली होती. ते उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे मानले जातात. महाविकास आघाडीच्‍या विरोधात ते उभे ठाकले.

करोनाची परिस्थिती हाताळण्‍यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्‍यामुळे राज्‍यात राष्‍ट्रपती राजवट लागू करण्‍याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी सप्‍टेंबर २०२० मध्‍ये केली आणि अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या. नवनीत राणा या केवळ राष्ट्रपती राजवटीची मागणी करून थांबल्या नाहीत, तर उद्धव ठाकरे घरात बसून राज्याचा कारभार हाकत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्‍यानंतर उद्धव ठाकरे यांच्‍यावर टीकेची एकही संधी राणा दाम्‍पत्‍याने गमावली नाही. उद्धव ठाकरे यांच्‍या शिवसेनेवर वार करणारे आणखी दोन नेते उभे झाल्‍याने भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांसाठी ते सुखावणारे होते. त्‍यातच मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाची घोषणा केल्यानंतर एप्रिल २०२२ मध्‍ये त्यांना तुरुंगात जावे लागले. राष्‍ट्रीय पातळीवरील प्रसार माध्‍यमांचे लक्ष वेधून घेण्‍यात राणा दाम्‍पत्‍य यशस्‍वी ठरले होते.

हेही वाचा… शिवसेनेत ‘गद्दार-खुद्दार’, राष्ट्रवादीत संभ्रमाची किनार! दोन्ही पक्षांमध्ये समान राजकीय पटमांडणी

आता नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अपक्ष म्‍हणून लढणार, की कुठल्‍या पक्षाच्‍या चिन्‍हावर लढत देणार, हे त्‍यांनी अद्याप स्‍पष्‍ट केलेले नाही. एकीकडे, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती लोकसभेत यावेळी कमळ हे पक्षचिन्‍ह राहणार, असा दावा करतात, तर राणा दाम्‍पत्‍याचा युवा स्‍वाभिमान पक्ष ‘एनडीए’चा घटक असल्‍याने भाजपचे संसदीय मंडळ त्‍यासंदर्भात निर्णय घेईल, असेही सांगतात. त्‍यामुळे भाजपचे कार्यकर्तेही संभ्रमात सापडले आहेत.

नवनीत राणा यांना पक्षचिन्‍हावर निवडणूक लढण्‍यासाठी आग्रह धरायचा, असा भाजपचा नेत्‍यांचा प्रयत्‍न आहे. नवनीत राणा यांनी आजवर या विषयावर प्रतिक्रिया देण्‍याचे टाळले असले, तरी त्‍यांना योग्‍यवेळी निर्णय घ्‍यावा लागणार आहे. आमदार रवी राणांचाही विचार भाजपला करावा लागणार आहे. राणांच्‍या बडनेरा मतदार संघात भाजपचे अनेक इच्‍छू‍क उमेदवार रांगेत आहेत.

हेही वाचा… कोल्हापूर दौऱ्यात शरद पवार यांनी पुरोगामी विचारधारा केली अधोरेखित; छत्रपती शाहू महाराजांची साथ

भाजपला केंद्रात जास्‍तीत जास्‍त खासदारांची गरज आहे. दुसरीकडे, महाराष्‍ट्रात शिवसेना शिंदे गट, राष्‍ट्रवादी अजित पवार गट, महायुतीतील इतर घटक पक्षांचेही समाधान करावे लागणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच जिल्‍ह्याचा दौरा करून कार्यकर्त्‍यांना घरा-घरापर्यंत पोहचण्‍याचे आवाहन केले. जिल्‍ह्यात भाजपची संघटनात्‍मक शक्‍ती वाढली असली, तरी गेल्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. आता लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची सज्‍जता असल्‍याचे भाजपचे नेते सांगत आहेत, पण भाजपचा उमेदवार कोण, हे अद्याप समोर आलेले नाही. भाजपच्‍या सोयीच्‍या हिंदुत्‍वाच्‍या राजकारणाचा वापर करण्‍याचे कसब राणा दाम्‍पत्‍याने मिळवले आहे. पण, नवनीत राणा या कमळ या पक्षचिन्‍हावर निवडणूक लढणार का, हा यक्षप्रश्‍न आहे. त्‍याची उत्‍सुकता ताणली गेली आहे.