एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अधिकाधिक जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी संघ परिवाराच्या निकटचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या अधिपत्याखाली ‘ महाविजय २०२४ ‘ कृती कार्यक्रम आखला आहे. भारतीय यांनीही राज्यातील प्रत्येक भागात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. सोलापुरातही त्यांच्या झालेल्या भेटीगाठीतून भाजपमध्ये नवी समीकरणे निर्माण होणार की काय, अशी प्रश्नार्थक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेषतः रेल्वे भागात रविशंकर बंगल्यात जाऊन भारतीय यांनी उदय रमेश पाटील यांची भेट घेतल्यानंतर ही सार्वत्रिक चर्चा वाढली आहे.
सोलापूर शहर व आसपासच्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आदी भागात वीरशैव लिंगायत समाजाची साथ अनेक वर्षांपासून भाजपला मिळत आहे. किंबहुना लिंगायत समाजामुळे भाजपची ताकद वाढल्याचे दिसून येते. याच समाजातील मातब्बर मानलै जाणारे आणि सलग चौथ्यांदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करणारे माजी पालकमंत्री विजय देशमुख हे अलिकडे लिंगायत समाजाशी संबंधित वाद-विवादाच्या चक्रव्युहात अडकले आहेत. आपल्याच पक्षाचे माजी सहकारमंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याशी आमदार विजय देशमुख यांचा गेल्या आठ-नऊ वर्षांपासून पक्षांतर्गत वाद आहे. मराठा समाजाचे सुभाष देशमुख हे तसे हिशेबी आणि व्यावहारिक राजकारणी. तर विजय देशमुख हे आपल्यातच देशमुखी थाटात जनसंपर्क तथा कार्यकर्त्यांच्या गर्दीत रमणारे. या दोन्ही देशमुखांच्या वादाची भाजप पक्षश्रेष्ठींसह सर्वांना आता चांगलीच सवय झाली आहे. परंतु यापलिकडे अलिकडे लिंगायत समाजाच्या दृष्टीने मानबिंदू समजल्या जाणाऱ्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उंच चिमणी पाडण्याचा विमानसेवेशी संबंधित वाद याच लिंगायत समाजातील दोन मातब्बर नेत्यांमध्ये उफाळून आला आहे. सिध्देश्वर साखर कारखान्यासह सिध्देश्वर देवस्थान, संगमेश्वर महाविद्यालय, दै. संचार आदी अनेक संस्थांशी संबंधित याच लिंगायत समाजातील बडे प्रस्थ धर्मराज काडादी आणि आमदार विजय देशमुख यांच्यात सुरू झालेला संघर्ष आता टोकाला जात आहे. त्यातूनच विजाय देशमुख यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान देण्यात आले आहे. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पुन्हा तिकीट मिळवूनच दाखवावे, असे खुले आव्हान काडादी यांनी दिले आहे. हे आव्हान वाटते तेवढे सोपे नाही. यातूनच विजय देशमुख यांना पर्याय म्हणून लिंगायत समाजातील काही अन्य बड्या व्यक्तींना पुढे आणलै जात आहे.
हेही वाचा… मतदारांचा पाठिंबा कायम राखण्याचे ठाकरे यांच्यापुढे मोठे आव्हान
उदय पाटील यांच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिले जाते. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे यांचाही पर्याय पुढे आणला जात आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी खासदार अप्पासाहेब काडादी यांचे नातू असलेले धर्मराज काडादी यांनी आमदार विजय देशमुख यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करताना आपले हात किती लांबपर्यंत आहेत, याची प्रचिती सध्याच्या घडामोडींतून प्रत्ययास येत असल्याचे मानले जात आहे. काडादी हे कर्नाटकचे गृहनिर्माण तथा पायाभूत सुविधा खात्याचे मंत्री व्ही. सोमण्णा यांचे व्याही आहेत. सोमण्णा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातील समजले जातात. ते स्वतः जरी कर्नाटकातील भाजपचे वजनदार मंत्री असले तरी महाराष्ट्रातील एखाद्या गोष्टीवर पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकू शकतात. याच बलस्थानाच्या आधारे काडादी यांनी आमदार विजय देशमुख यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट आणून दाखविण्याचे आव्हान दिल्याचे सांगितले जाते. देशमुख यांनी काडादी यांना, आपण जर नको असेल तर तुम्ही स्वतः मैदानात या आणि विश्वासार्हता सिध्द करा, असे आव्हान दिले आहे. काडादी हे स्वतः देशमुख यांच्या विरोधात निवडणूक मैदानात उतरू शकत नाहीत. त्यांचा तो स्वभावही नाही. मात्र देशमुख यांच्यासमोर पर्यायी नेतृत्व उभे करू शकतात.
हेही वाचा… सांगलीत पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच सारा निधी
या पार्श्वभूमीवर भाजपचे ‘ महाविजय २०२४ ‘ चे प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय यांनी सोलापूरच्या राजकारणात लक्ष घालून उदय पाटील यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या घडामोडींचा पूर्व अंदाज आल्यामुळेच की काय, आमदार विजय देशमुख यांनीही उदय पाटील यांच्या बंगल्यात जाऊन त्यांची भेट घेतली होती. पाटील हे तसे व्यावसायिक आहेत. तात्पुरता प्रासंगिक लाभ घेण्यासाठी राजकीय तडजोड करण्याची सवय सोडून देत दीर्घ दृष्टिकोन बाळगून भूमिका अंगिकारल्यास त्यांचे राजकारण वावटळीसारखे होणार नाही, असे स्थानिक राजकीय जाणकारांचे मत आहे. ॲड. मिलिंद थोबडे यांचा नवा पर्याय येऊ शकतो. ते स्वतः प्रतिष्ठित अशा थोबडे घराण्यातील आहेत. ग्रामदैवत सिध्देश्वर देवस्थान समितीचे ते विश्वस्त आहेत. काडादी यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आमदार विजय देशमुख यांच्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची लक्षणीय ताकद आहे. हा समाज काही अपवाद वगळता नेहमीच भाजपला साथ देत आला आहे. याच अनुषंगाने भाजपने लिंगायत समाजातील नव्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न हाती घेतला आहे. यातून आगामी काळात या पक्षात नवी समीकरणे तयार होण्याची अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे.