सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. जागावाटप आणि एकमेकांवर आरोपांच्या फैरीदेखील सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीला ‘लोकशाहीचा सोहळा’ असे म्हटले जाते. अशातच आता देशातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपाने हा लोकशाहीचा सोहळा पाहण्यासाठी जगातल्या इतर अनेक देशांमधील विविध पक्षांच्या प्रतिनिधींना आवतण धाडले आहे. सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाची निवडणुकीसाठीची रणनीती समजून घेण्यासाठी, तसेच निवडणुकीची भव्यता पाहण्यासाठी भाजपाच्याच निमंत्रणावरून हे पक्ष प्रतिनिधी भारतात येणार आहेत.
तब्बल २५ पक्षांचे प्रतिनिधींना दिले निमंत्रण
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा हा सोहळा पाहण्यासाठी भाजपाने जगातील जवळपास २५ पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली आहे. त्यापैकी १३ पक्षांनी येण्याचे अधिकृतरीत्या मान्य केले आहे, अशी माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. हे पक्ष कोणते आहेत, या माहितीचा खुलासा नंतर केला जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील दोन्ही पक्षांना म्हणजेच सत्तेतील डेमोक्रॅट्स आणि विरोधातील रिपब्लिकन्स यांना भाजपाकडून निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्याबाबतचा खुलासा करताना भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, पहिली गोष्ट म्हणजे हे दोन्हीही पक्ष त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये व्यग्र आहेत. तसेच अमेरिकेतील वा युरोपियन पक्षांची रचना ही भारतातील पक्षांसारखी नाही. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला त्याच्या पक्षाच्या अध्यक्षाचे नावदेखील माहीत नसते. कारण- तिथली व्यवस्था केवळ अध्यक्ष किंवा यूएस काँग्रेसचे कार्यालय प्रमुख बनवते.
चीन आणि पाकिस्तानला प्रवेश नाही
मात्र, भाजपाने इंग्लंडमधील ‘हुजूर’ आणि ‘मजूर’ अशा दोन्ही पक्षांना निमंत्रण दिले आहे. जर्मनीमधील ‘ख्रिश्चन डेमोक्रॅट्स’ आणि ‘सोशल डेमोक्रॅट्स’ या पक्षांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. संबंध दुरावलेले असल्याने पाकिस्तानातील कोणत्याही पक्षाला निमंत्रण देण्यात आलेले नाही. तसेच चीनमधील कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीनलादेखील बोलावण्यात आलेले नाही. बांगलादेशमधून फक्त सत्ताधारी असलेल्या शेख हसीना यांच्या अवामी लीगला निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु, विरोधातील बीएनपी या पक्षाला निमंत्रण दिलेले नाही. कारण- हा पक्ष अलीकडेच झालेल्या भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबाबतच्या ‘इंडिया आऊट’ मोहिमेमध्ये सक्रिय होता.
नेपाळमधील सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये माओईस्ट पक्षाचाही समावेश आहे. याच पद्धतीने श्रीलंकेतीलही सगळ्या पक्षांना आवतण धाडले आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लोकसभेचा तिसरा आणि चौथा टप्पा पार पडणार आहे. या काळातच परदेशांतील विविध पक्षांचे नेते भारतात येणार आहेत.
हेही वाचा : कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढले; मोदी सरकारमधील मंत्र्यांविरोधात लिंगायत संत लढणार
पाहता येणार भाजपाचा प्रचार
भारतात आल्यानंतर या परदेशी पाहुण्यांना सर्वांत आधी दिल्लीमध्ये भाजपाबद्दलची माहिती दिली जाईल. तसेच भारतातील राजकीय यंत्रणा आणि निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते, याविषयीदेखील त्यांना योग्य ती माहिती दिली जाईल. त्यानंतर पाच-सहा जणांचे गट करून त्यांना पक्षाचे नेते, उमेदवार यांचा प्रचार कसा चालतो हे दाखविण्यासाठी चार-पाच मतदारसंघांमध्ये नेण्यात येईल. त्यामध्ये त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभांनाही नेले जाण्याची शक्यता आहे.
जे. पी. नड्डा यांच्या पुढाकाराने ‘भाजपाला जाणून घ्या’ हा उपक्रम राबविला जातो आहे. या उपक्रमांतर्गत विविध देशांतील जवळपास ७० प्रमुखांनी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. तसेच भाजपाच्याही अनेक पदाधिकाऱ्यांनी विविध देशांना भेट दिली आहे. याच उपक्रमांतर्गत नेपाळचे नेते प्रचंड यांनीदेखील भाजपाच्या प्रमुख कार्यालयाला भेट दिली होती. इतकेच नव्हे, तर अलीकडेच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही विविध ठिकाणांहून चार-पाच परदेशी पाहुणे आले होते. त्यांनाही इथल्या निवडणुकीची प्रक्रिया दाखविण्यासाठी विविध ठिकाणी नेण्यात आले होते.
हेही वाचा : LS Elections 2024: मुलगा पराभूत व्हावा ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचीच इच्छा
“या आणि पाहा आम्ही कसे जिंकतो?”
अलीकडच्या काळात भारताचे इतर काही देशांशी विविध घटनांमुळे खटके उडाले आहेत. त्यामध्ये कॅनडामध्ये खलिस्तानी फुटीरतावाद्याची झालेली हत्या, तसेच अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून जर्मनी आणि अमेरिकेने व्यक्त केलेली चिंता यांमुळे परिस्थितीमध्ये तणाव निर्माण झाला होता.
मात्र, भाजपाने या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवत हा उपक्रम राबविला आहे. “आम्ही असे हक्काने म्हणतो की, भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि भाजपा हा जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाबाबत योग्य प्रकारची माहिती आणि समज असणे गरजेचे आहे. भाजपा कशा प्रकारे निवडणुका जिंकतो, त्यांच्या प्रचार मोहिमांमध्ये कशी सखोल तयारी केली जाते? या सगळ्या बाबी परदेशातील मुख्य पक्षांना कळायला हव्यात,” असे मत भाजपाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाले यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मांडले आहे.