प्रबोध देशपांडे

राज्यात भाजप व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. या सत्ता परिवर्तनाचे पडसाद बुलडाणा जिल्ह्यातील राजकारणात उमटले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना व भाजपच्या सत्तासंघर्षात रस्त्यावर उतरून विरोध करणाऱ्या भाजप नेते व कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या बंडखोर व शिंदे गटातील आमदारांसोबत मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. गेल्या वर्षी भाजपच्या नेत्यांवर पातळी सोडून जहरी टीका करणाऱ्या व आरोपांची राळ उठवणाऱ्या शिवसेना आमदारांचे गोडवे गाण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली आहे. पक्षश्रेष्टींच्या आदेशानुसार स्थानिक नेत्यांना वारंवार आपली भूमिका बदलावी लागते. सोयीच्या सत्तासमीकरणाच्या खटाटोपात स्थानिक स्तरावरील नेत्यांसह कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच कोंडी होताना दिसत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. युतीमध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने गेल्या सलग पाच निवडणुकांमध्ये भगवा फडकवला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दोन आमदार जिल्ह्यातून निवडून आले आहेत. मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत बिनसल्यानंतर युती भंगली. त्यानंतर बुलडाण्यात भाजप विरूद्ध शिवसेना असा संघर्ष निर्माण झाला. युतीत शिवसेनेमुळे आपल्याला संधी मिळत नाही, अशी अंतर्गत खदखद भाजप नेत्यांच्या मनातही होतीच. त्यामुळे भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अगदी टाेकाचे वाद-विवाद झाले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अगदी रस्त्यावर एकमेकांना भिडले होते.

हेही वाचा- उपराष्ट्रपतीपदासाठी धनखड यांच्या निवडीतून भाजपची जाट मतांवर नजर

करोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना स्वत:ला कट्टर शिवसैनिक म्हणवणारे व आता शिंदे गटातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तत्कालीन विरोधी पक्ष नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. ‘मला करोनाचे जंतू मिळाले तर फडणवीसांच्या तोंडात सोडले असते’ असे वादग्रस्त विधान एप्रिल २०२१ मध्ये संजय गायकवाड यांनी केले होते. त्यावेळी राज्यभरात भाजपने आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांचा समाचार घेतला. बुलडाण्यात तर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आता वर्षभरानंतर परिस्थितीत बदल झाला आहे. फडणवीसांवर टीका करणाऱ्या गायकवाड यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसून त्यांचे गुणगान करण्याची वेळ बुलडाण्यातील भाजप नेत्यांवर आली आहे. शेवटी करणार काय, पक्षश्रेष्टीेंचा आदेश असल्याने त्यापुढे कोण जाणार? असा प्रश्न भाजप नेत्यांपुढे निर्माण झाला आहे.

राज्यातील अभूतपूर्व सत्तानाट्यात बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे मेहकरचे आमदार संजय रायमूलकर व बुलडाण्याचे संजय गायकवाड हे दोघे शिंदे गटात, तर पक्षातील पदाधिकारी व शिवसैनिक संघटनेसोबत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख व खासदार प्रतापराव जाधव यांनी मातोश्रीवरील बैठकीला हजेरी लावली असली तरी अद्याप त्यांनी आपली ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. जिल्ह्यातील पक्षाच्या बैठकींपासून त्यांनी अंतर ठेवले आहे. शिंदे गटातील जिल्ह्यातील दोन्ही आमदार प्रतापराव जाधव यांचे निकटवर्तीय समजले जातात. आता खासदार काय भूमिका घेतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- राज्यात जनता दलाच्या अस्तित्वाचा शोध !

बुलडाण्यातून शिवसेनेच्या तिकिटावर तीन वेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनी शिवसेनेतील गटबाजीला कंटाळून व्हाया वंचित आघाडी भाजपशी घरोबा केला. गेल्या काही वर्षांपासून देवेंद्र फडणवीसांसह भाजपशी जवळीक साधण्याचे शिंदे यांचे प्रयत्न राहिले. विजयराज शिंदे यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे आमदार संजय गायकवाड शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपच्या जवळ आले. शिंदे गटात सहभागी आमदार गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे झाले आहेत. त्यामुळे विजयराज शिंदे यांची चांगलीच अडचण झाली आहे. पुन्हा शिवसेनेत जाण्याचा त्यांच्यापुढे पर्याय असला तरी तो अवघड व धोक्याचा आहे. राज्यातील नव्या सत्ता समीकरणामुळे विजयराज शिंदे यांच्यासारख्या अनेकांची राजकीय कोंडी झाल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात निष्ठा यात्रा? 

दोन आमदारांच्या बंडामुळे बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निष्ठा यात्रा काढण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात ही यात्रा लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही जिल्ह्याचा दौरा करणार असल्याची चर्चा आहे.

Story img Loader