BJP Candidates for Loksabha लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे. देशभरात भाजपा ३०० उमेदवारांच्या नावे जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. आठवड्याच्या शेवटी भाजपा लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले आहे. शुक्रवारी पहाटेपर्यंत चाललेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (सीईसी) बैठकीत उमेदवारांच्या पहिल्या यादीवर चर्चा करण्यात आली. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, “या यादीत किती उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, हे सांगणे कठीण आहे. परंतु यात पक्षातील प्रमुख नेत्यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.”
या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह काही बड्या नेत्यांच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा आहे, असे भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले. भाजपाने २०१९ च्या निवडणुकीत ज्या जागा गमावल्या आणि ज्या जागा जिंकल्या त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. उमेदवारांना प्रचारासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यानुसार पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करेल.
उत्तर प्रदेशमधील जागांचे गणित
मागील निवडणुकीत ज्या जागा पक्षाने गमावल्या त्या जागांसाठी प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गेल्यावेळी पक्षाने गमावलेल्या जागांवर भाजपाचे सरचिटणीस सुनील बन्सल अतिरिक्त लक्ष देत आहेत, असे पक्षातील अंतर्गत सूत्राने सांगितले. अयोध्या राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) ने एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याने मागील निवडणुकीच्या तुलनेत विरोधक कमी झाले आहेत. “प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहेत हे ओळखून नंतर उमेदवार निवडले,तरी पंतप्रधान मोदींची लोकप्रियता इतकी आहे की पक्षाला त्याचा फायदाच होईल,” असे एका भाजपा नेत्याने सांगितले.
भाजपाच्या आणखी एका कार्यकर्त्याने सांगितले की, निवडणूक आयोगाने (ईसी) निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वीच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. मध्य प्रदेशातील एका भाजपा नेत्याने सांगितले की, लोकसभा उमेदवारांच्या नावांची लवकर घोषणा केल्याने भाजपा शिस्तबद्ध पक्ष असल्याचा संदेश जाईल.
लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या यादीत सुमारे २० उमेदवारांची नावे असू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यात एनडीएमध्ये सामील झालेल्या आरएलडीसाठीही पक्ष दोन जागा सोडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील आरएलडी पक्षाने २७ फेब्रुवारीच्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या आठव्या उमेदवाराला मतदान केले; ज्यामुळे समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यात मदत केली. त्यामुळे भाजपा आरएलडीसाठी जागा सोडणार हे नक्की. यासह भाजपा अपना दल (एस) साठी एक किंवा दोन, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (एसबीएसपी) साठी एक आणि निशाद पक्षाला एक जागा देण्याची अपेक्षा आहे.
हरियाणात एनडीएच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
पक्ष नेतृत्वाला हरियाणातील सर्व १० लोकसभा मतदारसंघांसाठी संभाव्य उमेदवारांचे पॅनेल मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील एनडीएच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष (जेजेपी) हा एनडीएचा सहयोगी आणि सत्ताधारी पक्ष आहे. “आम्ही सर्व १० जागांसाठी नावांचे पॅनेल दिले असले तरी, जेजेपीसाठी जागा सोडायची की नाही हे केंद्रीय नेतृत्वावर अवलंबून असेल. याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही,” असे हरियाणातील पक्षाच्या अंतर्गत सूत्राने सांगितले. गेल्या वेळी भाजपने राज्यातील सर्व १० मतदारसंघांवर विजय मिळवला होता.
हेही वाचा : Loksabha Election: उत्तर प्रदेशमध्ये सपाच्या जागावाटपावरून काँग्रेसची कोंडी, नेमकं पक्षात काय घडतंय?
पहिल्या यादीत १० जागांसाठी घोषणा
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी भाजपाच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, भाजपा पहिल्या यादीतील २९ जागांपैकी १० जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करू शकते. छत्तीसगडमध्ये चर्चा आहे की, पहिल्या यादीत सुरगुजा आणि बस्तर या दोन आदिवासी पट्ट्यांमधील उमेदवारांची नावे आहेत.