सुजित तांबडे
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घ्यावी लागणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार की कसब्याच्या निकालानंतर आत्मविश्वास वाढलेली महाविकास आघाडी पुन्हा ताकद दाखविणार, हे परत एकदा भाजपचा उमेदवार कोण? यावर अवलंबून असणार आहे. बापट यांचे सर्वपक्षीय संबंध पाहता त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असली, तरी बापट यांचा मुलगा आणि स्नूषा हे राजकारणात नवखे असल्याने भाजपकडून बापट कुटुंबीयांना संधी दिली जाणार की, अन्य कोणाला उमेदवारी देणार, यावर यापुढील राजकीय आराखडे बांधले जाणार आहेत.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी डावलून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. हा निर्णय भाजपच्या अंगलट आला. त्यामुळे आगामी लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपचा उमेदवार कोण? यावर निवडणूक बिनविरोध होणार की कसब्याची पुनरावृत्ती होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा >>>Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात पुन्हा भाजप की काँग्रेस ? सत्ता कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान
बापट यांचे पुत्र गौरव हे राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र, बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट या सक्रिय आहेत. दोघेही राजकारणात नवखे असल्याने भाजपकडून त्यांना पसंती दिली जाणार का, यावर या मतदार संघातील पुढील गणिते अवलंबून आहेत. बापट यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीला निवडणूक लढवायची की नाही, याबाबत विचार करावा लागणार असल्याचे चित्र आहे.सध्या भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि माधुरी मिसाळ ही नावे चर्चेत असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.
हेही वाचा >>>नगरमध्ये निधीसाठी रस्सीखेच
माजी महापौर मोहोळ यांना भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदावरही संधी देण्यात आली आहे. मोहोळ आणि शहराध्यक्ष मुळीक हे दोन तरुण चेहरे भाजपकडून दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना मागील विधानसभा निवडणुकीत डावलून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उभे करण्यात आले. विद्यमान आमदार असतानाही डावलल्याने त्या नाराज झाल्या होत्या. भाजपने त्यांना उपाध्यक्ष करून केंद्रीय पातळीवर कामाची संधी देत राजकीय पुनर्वसन केले. आता उमेदवारीसाठी त्यादेखील पर्याय असू शकतात. आमदार मिसाळ यांनी शहराध्यक्ष पद सांभाळले आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे हे पहिल्यांदाच आमदार झाले असले, तरी वडील माजी खासदार अनिल शिरोळे यांचा राजकीय वारसा त्यांना आहे. बापट कुटुंबीयांशिवाय या नावांचीभाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे.
हेही वाचा >>>राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधातही गटबाजी
महाविकास आघाडीची भूमिका महत्त्वाची
कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीला आत्मविशास वाढला आहे. मात्र, बापट यांचा सर्वपक्षीय संपर्क पाहता ही निवडणूक लढावायची की नाही, याबाबत महाविकास आघाडी काय निर्णय घेणार, यावर पोटनिवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. ही जागा काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी यांचे नाव आघाडीवर असणार आहे.
बापट यांचा ४० वर्षांचा जनसंपर्क
बापट यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी स्वीकारल्यानंतर १९८३ मध्ये ते पहिल्याच प्रयत्नात पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर गेले ४० वर्षे ते पुण्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले. सलग तीनवेळा ते नगरसेवक होते. त्यावेळी पुणे महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असतानाही सर्व पक्षांतील संपर्कामुळे ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. बापट यांचा सर्वपक्षीय जनसंपर्क हे त्यांचे वेगळेपण होते. १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी सलग पाच वेळा कसब्याचे नेतृत्त केले. १९९६ मध्ये त्यांनी लोकसभेची निवणूक लढविली होती.त्यावेळी काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी त्यांचा पराभव केला होता. २०१४ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले, तेव्हा मंत्रीपद आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर २०१९ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. राजकीय प्रवासात विविध क्षेत्रातील नागरिकांशी संपर्क ही त्यांची जमेची बाजू होती.