सुहास सरदेशमुख

लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या ताब्यात असणाऱ्या देशातील १४४ आणि महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघांत जम बसवण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखणी सुरू केली असून प्रत्येक मतदारसंघात प्रभारी नेमले आहेत. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्याचा एक दौराही ठरविण्यात आला आहे.

लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिलेल्या या प्रभारींनी तसेच त्यांच्या सहाय्यकांनी विधानसभा मतदारसंघात मुक्कामी दौरे करावेत. पंतप्रधांनाच्या नावे सुरू असणाऱ्या योजनांची व्याप्ती वाढेल असे पाहावे, तसेच त्या मतदारसंघातील मोठी मंदिरे व मोघल साम्राज्याविरोधात लढा देणारी घराणी, मतदारसंघात प्रभाव असणाऱ्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रभारीपदावरील व्यक्तींनी भाजपच्या दृष्टीने अडचणीचे असणारे मुद्दे तर लक्षात घ्यावेतच शिवाय कोणत्या राजकीय मुद्दयांवर लक्ष द्यावे याचा अभ्यासही करण्यास सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी १८ महिने आधी कोणी काय करावे याचे नियाेजन तयार करण्यात आले असून भाजप विरोधातील राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांसाठी प्रभारी नेमण्यात आले आहेत. त्यात शिवसेनेकडील ११, राष्ट्रवादीच्या चार तर एमआयएमकडे असणाऱ्या औरंगाबाद या एकमेव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. राजकीयदृष्टया उपयुक्त असणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या माहितीच्या संकलनाबरोबरच प्रधानमंत्री आवास योजना, पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत, जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, सामाजिक सुरक्षा योजना, पंतप्रधान मातृवंदन योजना, श्रमयोगी मानधन योजना, ‘ वन नेशन वन रेशन कार्ड’, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी, पंतप्रधान पीक विमा योजना आदी योजनांच्या अंमलबजावणीसाठी  दोन जणांची एक समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती ‘ लाभार्थींचे रूपांतर मतदारात होईल’ यासाठी काम पाहणार आहेत.

विरोधी पक्षांकडील लोकसभा मतदारसंघात विधि विभागाचाही चमू सक्रिय केला जाणार आहे. यात माहिती अधिकार कार्यकर्ते, जनहित याचिकाकर्ते तसेच कायदेशीर लढा देणाऱ्यांचाही समावेश केला जाणार आहे. ३० जुलैपूर्वी प्रभारी नेमून सोशल मीडिया टीम, मीडिया टीम आदींच्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. सरकारच्या विरोधात जाणाऱ्या मुद्दयांबरोबरच लोकसभा निवडणुकीचा इतिहास आणि निकालांची आकडेवारी व त्याचा अभ्यासही केला जाणार आहे. हे सगळे करताना समान विचारधारेच्या संघटनांशी संवाद व संपर्क वाढवा, असेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. प्रत्येक समितीने काय करावे, कसे करावे, किती कार्यकर्ते कोठे नियुक्त करावेत याचे नियोजन ठरविण्यात आले असून आता विराेधकांच्या मतदारसंघात घुसण्याची भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. 

राज्यातील बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, पालघर, कल्याण, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, शिर्डी या शिवसेना मतदारसंघात विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. राष्ट्रवादीकडे असणाऱ्या बारामती, शिरुर, रायगड, सातारा या चार मतदारसंघातही आखणी केली जाणार आहे. औरंगाबाद हा एकमेव एमआयएमच्या ताब्यात असणारा लोकसभा मतदारसंघ असल्याने येथे वेगळया पद्धतीची रणनीती आखली जाणार आहे. विरोधकांच्या लोकसभा मतदारसंघातील रणनीती ठरवण्यासाठी प्रदेश पातळीवर एक समिती नेमण्यात आली आहे. त्यात अतुल सावे, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, प्रमोद जठार यांचा समावेश आहे. या समितीचे संयोजक म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे हे काम पाहत आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी कोण प्रभारी याचीही यादी तयार करण्यात आली असून यात लोकसभा मतदारसंघनिहाय प्रभारी नेमण्यात आले आहेत. 

असे आहेत लोकसभा मतदारसंघातील प्रभारी 

बुलढाणा : डॉ. अनिल बोंडे, चंद्रपूर: राजेश बकाने, हिंगोली: राणाजगजीतसिंह पाटील, औरंगाबाद: प्रशांत बंब, पालघर: नरेंद्र पवार, कल्याण : संजय केळकर, दक्षिण मध्य मुंबई : प्रसाद लाड, दक्षिण मुंबई: संजय उपाध्याय, रायगड : प्रशांत ठाकूर, बारामती: राम शिंदे, शिरूर: माधुरी मिसाळ, शिर्डी: राहुल आहेर, सातारा : अतुल भोसले, रत्नागिरी: आशीष शेलार, कोल्हापूर: सुरेश हळवणकर, हातकणंगले : गोपीचंद पडळकर.

Story img Loader