प्रबोध देशपांडे
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचा गड राखण्यासाठी भाजपने आत्तापासूनच जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पाच महिने अगोदरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ. रणजीत पाटील तिसऱ्यांदा पदवीधरच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यासाठी त्यांनी सुमारे एक वर्षापासून तयारीवर जोर दिला. पदवीधरच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा अंतर्गत गटबाजीचे मोठे आव्हान डॉ. रणजीत पाटील यांच्यापुढे राहणार आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघावर ३० वर्ष शैक्षणिक संघटनांचा दबदबा होता. २०११ मध्ये भाजपने संघटनात्मक बळावर शैक्षणिक संघटनांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. मातब्बर नेते प्रा.बी. टी. देशमुख यांचा पराभव करून डॉ. रणजीत पाटील यांनी विधान परिषद गाठली होती. २०१४ मध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून आमदारकीच्या पहिल्याच टप्प्यात डॉ. पाटील यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली. दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतांना डॉ. रणजीत पाटील गृहराज्यमंत्री होते. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथमच भाजप व काँग्रेस हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आमनेसामने आले. डॉ. रणजीत पाटील विरूद्ध संजय खोडके असा सामना झाला. देवेंद्र फडणवीस व भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असलेले अमरावती पदवीधर मतदारसंघाचे ‘रण’ भाजपने एकतर्फी लढतीत जिंकले होते.
गत सहा वर्षांच्या कार्यकाळात समीकरणे बदलली आहेत. एका वर्षांपासून इच्छुकांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चाहूल लागली. निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली. विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांना आधीच पक्षाने तयारीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांनी सुमारे वर्षभरापासून भेटीगाठी घेऊन मतदार नोंदणीसाठी अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली. विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये त्यांचे दौरे सुरू आहेत. त्यातच आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. रणजीत पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. पक्षादेश आल्याने संघटनात्मक पातळीवर देखील निवडणुकीच्या कार्याला वेग येणार आहे. गेल्या निवडणुकीत हा मतदारसंघ आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला होता. आता देखील मविआमध्ये काँग्रेसकडेच हा मतदारसंघ कायम राहण्याची शक्यता असून काँग्रेसकडून प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे व इतर काहींनी तयारी सुरू केली आहे. भाजपने आत्तापासूनच पदवीधरवर लक्ष केंद्रित केले असतांना इतर पक्षांमध्ये मात्र यासंदर्भात शांतता दिसून येते.
दवीधर मतदारसंघातील मतदार उच्चशिक्षित वर्ग म्हणून ओळखला जातो. डॉ. रणजीत पाटील यांनी गत १२ वर्षांच्या कार्यकाळात पदवीधर, शिक्षक, प्राध्यापकांचे विविध प्रश्न सभागृहात मांडून ते सोडविण्याचे प्रयत्न केले. काही धोरणात्मक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. त्यावरून विरोधक त्यांना घेरण्याची शक्यता आहे. विरोधकांपेक्षा डॉ. रणजीत पाटील यांच्यापुढे अंतर्गत गटबाजीचे आव्हान राहणार आहे. गृहजिल्हा असलेल्या अकोल्यातच त्यांना धोत्रे गटाकडून मोठा विरोध आहे. पदवीधर निवडणुकीत इतर जिल्ह्यातील भाजप नेते व लोकप्रतिनिधींना एकसंघ ठेवण्याची कसरत डॉ. रणजीत पाटील यांना करावी लागणार आहे.
मतदार नोंदणीवर गणित
भौगोलिकदृष्ट्या पदवीधर मतदारसंघ फार मोठा आहे. प्रत्यक्ष भेटी घेऊन निवडणुकीची रणनीती आखतांना उमेदवारांची चांगलीच दमछाक होते. या निवडणुकीसाठी प्रत्येकवेळी मतदार नोंदणी करावी लागते. मतदार नोंदणीवरच निवडणुकीचे गणित अवलंबून असल्याने इच्छुकांकडून त्यावर भर दिला जातो. गेल्या काही दिवसांपासून इच्छुकांनी पदवीधरांकडून मतदार नोंदणी अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. पदवीधरांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज गोळा करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून प्रत्यक्षात १ ऑक्टाेबरपासून मतदार नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे.
मतदारनोंदणीचे काम सुरू
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पक्षाने अगोदरच तयारीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार भेटीगाठी घेऊन निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मतदार नोंदणीसाठी पदवीधरांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत.
डॉ. रणजीत पाटील, आमदार, पदवीधर मतदारसंघ, अमरावती.