सौरभ कुलश्रेष्ठ
आम्हीच मूळ शिवसेना आहोत असा पवित्र घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना फोडण्यासाठी धडपड करत असताना शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघासह शिंदे गटातील नेत्यांच्या मतदारसंघांत पक्ष संघटनेचा विस्तार करत त्यांना राजकीय विळखा घालण्याची आक्रमक मोहीम भाजपने सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे केंद्रीय नेते दौरे करणार आहेत. या दौऱ्यांच्या तयारी निमित्त भाजपच्या प्रदेश नेत्यांच्या बैठका त्या भागांमध्ये सुरू आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात बऱ्याच वर्षांनी कमळ फुललेले दिसेल असा विश्वास भाजपचे आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी अशाच एका बैठकीत व्यक्त केला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत. तरीही रवींद्र चव्हाण यांनी असे विधान केल्याने तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पण शिंदे गटाकडील मतदारसंघावर डोळा ठेवून पक्ष विस्तार सुरू करण्याची ही पहिलीच व अपवादात्मक घटना नाही. गेल्या दोन आठवड्यांत शिंदे गटातील नेत्यांच्या मतदारसंघावर भाजपने दावा ठोकण्याची ही तिसरी चौथी घटना आहे.
मागील आठवड्यात शिंदे गटातील ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक याच्या ठाणे महापालिकेतील प्रभागात भाजपने प्रचार सुरू केला आणि त्यावर दावा ठोकल्याचे चित्र समोर आले होते. तर तिकडे औरंगाबादमध्ये आतापर्यंत शिवसेना लढवत असलेल्या लोकसभा मतदारसंघात आता कमळ फुलवण्याचा निर्धार ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला होता. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार नसला तरी वर्षानुवर्षे या जागेवरून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे निवडून गेले होते. आम्ही शिवसेना असे म्हणणाऱ्या शिंदे गटाने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर दावा करणे स्वाभाविक मानले गेले असते. पण त्या ऐवजी भाजपने थेट आपला दावा ठोकला. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघातही खासदार धैर्यशील माने ही शिंदे गटात दाखल झाले आहेत. पण भाजपमध्ये केवळ औपचारिक प्रवेश बाकी असलेले आवाडे कुटुंब हातकणंगले मतदारसंघावर दावा ठोकत आहे. विदर्भातही अशा घडामोडी सुरू झाल्या आहेत.
त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेबरोबरच शिंदे गटातील नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये आक्रमकपणे पक्ष विस्तार करण्याची मोहीम भाजपने सुरू केल्याचे दिसून येत आहे. या पक्ष विस्तारातून शिंदे गटातील नेत्यांच्या मतदारसंघांना राजकीय विळखा घालण्याची भाजपची रणनीती स्पष्ट होत आहे.