दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर शुक्रवारी सीबीआयची धाड पडल्याने एरव्ही राजकीय घडामोडींवर उशीराने व्यक्त होणारी दिल्ली भाजपा भलतीच जोशात दिसली. सिसोदिया यांच्या सोबतच आम आदमी पार्टीवर शरसंधान साधण्याची संधी त्यांनी सोडली नाही.
दिवसभर पक्षाकडून ठरावीक अंतराने पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले. चाँदनी चौकचे खासदार आणि केंद्रिय मंत्री हर्ष वर्धन आणि राज्य भाजपा अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सकाळच्या पहिल्या परिषदेत प्रेसला माहिती दिली. त्यानंतर पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा आणि ईशान्य दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनीही पत्रकार परिषद घेतली.

संध्याकाळी वृत्त वाहिन्यांवर मुलाखती आणि चर्चांचे सत्र पाहायला मिळाले, ज्यामध्ये पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर, दक्षिण दिल्लीचे संसदपटू रमेश बिदुराई, वर्मा आणि तिवारी सहभागी झाले होते. नवी दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी या राजधानीतील एकमेव भाजपा सदस्य परदेशात गेल्याने आप विरुद्ध बोलताना दिसल्या नाहीत.   

अलीकडे आपविरुद्ध तोंडसुख घेण्याची मोहीम थंड झाल्याने पुन्हा पक्षावर शरसंधान साधण्याचे धोरण सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्ली पक्ष प्रमुखांनी मिळाल्याची माहिती दिल्ली भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानी उघड केली. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले, दिल्लीचे शिक्षण आणि आरोग्यविषयक मॉडेल देशभर आणि जगात लोकप्रिय झाले. भाजपासाठी ही लोकप्रियता पोटदुखीचा विषय बनली. तर आपच्या भ्रष्टाचाराविषयीची पत्रके दिल्लीभर लावण्यात येत असल्याचे भाजपा प्रवक्ते हरीश खुराना यांनी सांगितले.

आगामी काळात 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी विरुद्ध केजरीवाल असे चित्र रंगणार असल्याचा दावा सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज, संजय सिंह, राघव चड्डा यांच्यासारख्या काही इतर पक्ष नेत्यांनी  केला.
याविषयी अधिक माहिती देताना सिसोदिया यांनी वार्ताहरांना सांगितले, “पंजाब निवडणुकीनंतर, देशभरात केजरीवाल यांच्यावर जनतेने प्रेमाचा वर्षाव केला. केजरीवाल यांच्यात जनतेला राष्ट्रीय पातळीवर पर्यायी नेतृत्व दिसते. हीच बाब भाजपाकरिता तापदायक ठरली, आणि त्यांनी माझ्याविरुद्ध बनाव रचायला सुरुवात केली आहे.. हे सगळे कुंभाड रचलेले आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp is trying to politically trap aap in delhi pkd
Show comments