सोलापूर : राज्यात भाजपप्रणीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवून सत्तेची मांड आणखी पक्की केल्याच्या पार्श्वभूमीवर इकडे सोलापूर जिल्ह्यात प्रस्थापित मोहिते-पाटील कुटुंबियांची राजकीयदृष्ट्या कोंडी झाली आहे. विशेषतः सध्या भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.. एकीकडे पक्षशिस्त भंगाचे कृत्य केल्याचा ठपका ठेवून पक्षश्रेष्ठींनी कारणे दाखवा नोटीस बजावून दोन महिने उलटत असताना त्यानुसार कारवाई न होता उलट दुसरीकडे रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पक्ष सदस्य नोंदणी अभियानासाठी उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदन करणारे पत्र पाठवले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत माढ्यामध्ये विरोध डावलून भाजपने तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने मोहिते-पाटील कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि भाजपशी काडीमोड घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपला सहज सोपी वाटणारी माढ्याची लढत महाकठीण झाली आणि भाजपला पराभूत करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बाजी मारली. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही मोहिते-पाटील कुटुंबीयांनी ताकद वापरून भाजपसह महायुतीला रोखले. राज्यात भाजपप्रणीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असताना इकडे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मोहिते-पाटील यांच्या मदतीने चार आमदार निवडून आणून स्वतःची इभ्रत राखली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय कोंडी झाली. विधानसभा निवडणुकीत माळशिरसमध्ये पराभूत झालेले माजी आमदार राम सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर राग काढत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे सुद्धा मोहिते-पाटील कुटुंबीयांविरुद्ध प्रचंड नाराज झाले होते. विशेषतः खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर त्यांचा राग होता. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक नुकसानीप्रकरणी तत्कालीन ३२ संचालकांपैकी असलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह यांच्यावरही नुकसानभरपाई वसुलीची कारवाई होत आहे.
यातच भर म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दीड महिन्यापूर्वी भाजपने पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. दुसरीकडे सोलापूरचे पालकमंत्रिपद मोहिते-पाटील यांचे विरोधक असलेले जयकुमार गोरे यांच्याकडे सोपविण्यात आले असून त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा माळशिरसमध्ये राम सातपुते यांच्या निवासस्थानापासून सुरू केला होता. यातून सातपुते यांना बळ देऊन मोहिते-पाटील यांच्या अडचणी वाढविण्याची व्यूहरचना आखली जात असल्याचे मानले जात असताना दुसरीकडे आमदार आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या कुटुंबीयांवर शेलक्या शब्दात टीका करून त्यांची पक्षातून हकालपट्टी होणार असल्याचा विश्वास राम सातपुते हे बाळगून आहेत.
सातपुते व इतरांनी खालच्या स्तरावर जाऊन कितीही टीकास्त्र चालविले तरीही रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी त्यास प्रत्युत्तर न देता पूर्णतः संयमाची भूमिका घेतली आणि दुसरीकडे सोलापूर वगळता पक्षात राहणे पसंत केले. पक्षाच्या शिर्डीतील पक्षाच्या प्रदेश अधिवेशनात ते पूर्णवेळ उपस्थित राहिले. पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानालाही त्यांनी हातभार लावला. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना अभिनंदनपर पत्र पाठवून त्यांची प्रशंसा केली. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी भगवान श्री विष्णूच्या दशावताराचे प्रतीक असलेली तलवार भेट दिली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त भंगाची कारणे दाखवा नोटीस बजावून दीड महिना झाला तरी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर पक्षातून कारवाई करण्याचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते-पाटील कुटुंबीय भाजपपासून दुरावले आणि त्याचा राजकीय लाभ शरद पवार यांना झाला. आजही सोलापूर जिल्ह्यातील स्थान शंभर टक्के बळकट करायचे झाल्यास विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी मोहिते-पाटील यांना डावलून चालणार नाही, यांची जाणीव भाजपला झाली की काय, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा ऐकायला मिळते. परंतु त्याचवेळी त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सत्तेचा वापर करून स्वतःची ताकद वाढवत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून राम सातपुते व रणजितसिंह नाईक-निंबाळकर आदींना मंडळींना मोहिते-पाटील कुटुंबीयांच्या विरोधात मोठे बळ मिळाले आहे.