नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या उमेदवारी यादीवरून भाजपमध्ये सोमवारी गोंधळ झाला. सुरुवातीला ४४ नावांची यादी जाहीर करण्यात आली होती, मात्र त्यावरून वाद निर्माण झाल्याने यादी मागे घेण्याची नामुष्की पक्षावर ओढविली. दोन तासांनी आधीची यादी रद्द करून १६ नावांची यादी पक्षाला जाहीर करावी लागली.

भाजपने जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून ९० पैकी ६० ते ७० जागा पक्ष लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील ४४ उमेदवारांची पहिली यादी भाजपने सोमवारी जाहीर केली. मात्र, ही यादी जाहीर होताच जम्मूसह राज्यातील पक्षाच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केली. खरोखर काम करणाऱ्यांना वगळून चुकीचे उमेदवार दिल्याचा आरोप कार्यकर्ते करीत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी नाराजी नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या गोंधळानंतर दोन तासांत भाजपने आधीची यादी रद्द मानावी, असे जाहीर केले. त्यानंतर काही वेळात केवळ पहिल्या टप्प्यातील १५ जागांची घोषणा करण्यात आली व दुसऱ्या यादीत एका नावाचा समावेश करण्यात आला. ४४ उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, दोन माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह व कविंद्र गुप्ता या तीनही दिग्गजांना वगळण्यात आले होते.

हेही वाचा : Congress : इंदिरा गांधींसाठी थेट विमान हायजॅक करणाऱ्या काँग्रेसच्या निष्ठावान नेत्याचं निधन, कोण होते भोलानाथ पांडे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सुमारे ५० जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जाते. जम्मू विभागातील सर्वच्या सर्व ४३ जागांवर भाजप उमेदवार उभे करणार असून काश्मीर खोऱ्यातील ४७ जागांपैकी काही जागाही पक्ष लढणार आहे.

उर्वरित जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. पहिल्या टप्प्यासाठी मंगळवार, २७ ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. या टप्प्यातील २४ जागांपैकी १६ काश्मीर खोऱ्यातील आहेत. भाजपने खोऱ्यातील पाम्पोर, शोपियाँ, अनंतनाग, अनंतनाग (प), कोकरनाग या जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

हेही वाचा : National Conference : काश्मीरमध्ये काँग्रेस अन् ‘एनसी’ची युती, मात्र दोन्ही पक्षांतील संबंधांमध्ये इतिहासात अनेक चढ-उतार; जाणून घ्या…

नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस जागावाटप निश्चित

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसदरम्यान जागावाटप निश्चित झाले आहे. त्यानुसार, नॅशनल कॉन्फरन्स ५१ तर काँग्रेस ३२ जागा लढवणार आहे. त्याशिवाय पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढत होईल. याबरोबरच जम्मू व काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी आणि माकप या पक्षांना एकेक जागा सोडण्यात आली आहे. दिवसभर झालेल्या चर्चेनंतर अंतिम जागावाटपाचा निर्णय झाला. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत याविषयी घोषणा करण्यात आली.