कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर येथील प्रदेश भाजपात काहीशी अस्थिरता आहे. निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसने आता दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे अद्याप विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्तच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिल्लीतील नेतृत्व कर्नाटकमधील भाजपा नेत्यांवर नाराज आहे, असे म्हटले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मे महिन्यापासून विरोधी पक्षनेतेपद रिक्त

या वर्षाच्या मे महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. तेव्हापासून विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. भाजपाने कर्नाटकच्या प्रदेशाध्यक्षपदावरही अद्याप कोणाचाही कायमस्वरुपी नियुक्ती केलेली नाही. निवडणुकीनंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी लवकरच दोन्ही रिक्त पदांवर नियुक्ती केली जाईल, असे सांगितले. मात्र अद्याप भाजपाने विरोधी पक्षनेतेपद आणि प्रदेशाध्यक्षपद कोणत्याही नेत्याकडे सोपवलेले नाही. जुलै महिन्यात भाजपाच्या दोन सदस्यीय केंद्रीय निरीक्षकांनी कर्नाटकचा दौरा केला होता. या दौऱ्यात निरीक्षकांनी विरोधी पक्षनेतेपदी तसेच प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड करावी, याविषयी कर्नाटकमधील भाजपा नेत्यांच्या भावना जाणून घेतल्या होत्या. याबाबतचा अहवाल या निरीक्षकांनी दिल्लीला पाठवला होता. मात्र त्यावर नंतर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या देशात पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे दिल्लीतील नेतृत्व या नियुक्त्यांबाबत सध्यातरी गंभीर नसल्याचे म्हटले जात आहे. या विधानसभा निवडणुकांनंतर लगेच लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू होईल, त्यामुळे भविष्यात या नियुक्त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कर्नाटकमध्ये लवकरच हिवाळी अधिवेशन

कर्नाटकमध्ये लवकरच हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. याच कारणामुळे भाजपाचे केंद्रीय नेतृत्व प्रदेशाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदी नेत्यांची नियुक्ती करेल, अशी आशा कर्नाटकच्या नेत्यांना आहे. हिवाळी अधिवेशन तोंडावर असताना विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्यामुळे काँग्रेस भाजपावर टीका करत आहे. झारखंडमध्ये २०१९ सालच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. या पराभवानंतर भाजपाने चार वर्षे विरोधी पक्षनेतेपदावर कोणाचीही नियुक्ती केली नव्हती. त्यामुळे कर्नाटकच्या बाबतीतही भाजपा हेच सूत्र वापरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे नेते बी एस येडियुरप्पा यांनी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व लवकरच विरोधी पक्षनेत्याची निवड करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत अनेक नेते

भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात संपलेला आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत होते. मात्र निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने बोम्मई यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. बोम्मई यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे ते या शर्यतीतून बाहेर पडल्यासारखेच आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत सी टी रवी, बसनगौडा पाटील यत्नल, सुनील कुमार, आर अशोक आणि सी एन अश्वथ नारायण आदी नेते आहेत.

काँग्रेसची भाजपावर टीका

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्तच असल्यामुळे काँग्रेसकडून भाजपावर टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “कर्नाटकच्या इतिहासात सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहिलेले नाही. एक सक्षम विरोधी पक्षनेता देण्यास भाजपा सक्षम नाही. असे असले तरी भाजपाला कोणीही प्रश्न विचारत नाहीये,” असे शिवकुमार म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp karnataka chief lop post still vacant what is in mind of bjp central leadership prd