लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून १११ जागांसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये कर्नाटकच्या चार जागांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजपाने या यादीत हिंदुत्वाचे ‘पोस्टर बॉय’ राहिलेल्या अनंतकुमार हेगडे यांना डच्चू दिला आहे. त्यांच्याऐवजी उत्तरा कन्नडमधून विधानसभेचे माजी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.

रविवारी रात्री भाजपाकडून कर्नाटकच्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यानुसार भाजपाने चिक्कबल्लापूरमधून माजी मंत्री के. सुधाकर यांना उमेदवारी दिली आहे. के. सुधाकर २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के. सुधाकर हे भाजपातील वरिष्ठ नेत्यांच्या अगदी जवळचे आहेत. त्याशिवाय भाजपाने रायचूरमधून (एसटी-राखीव) विद्यमान खासदार राजा अमरेश्वर नाईक यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तसेच उत्तर कर्नाटकमधून विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि बेळगावमधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (६८) यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा – भाजपा की नितीश कुमार? एनडीएतील समावेश गरज कुणाची होती? आकडेवारी काय सांगते?

कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. त्यापूर्वी भाजपाकडून २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीतही भाजपाने विद्यमान खासदारांना तिकीट नाकारले होते. एकूणच भाजपाने कर्नाटकमध्ये २४ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहे. कर्नाटकमध्ये भाजपाची जेडीएसबरोबर युती आहे. त्यानुसार तीन जागा भाजपा जेडीएससाठी सोडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मंड्या, हसन व कोलार या जागांचा समावेश आहे. तर, अनुसूचित जाती (SC) उमेदवारांसाठी राखीव असलेल्या चित्रदुर्गाकरिता पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

अनंतकुमार हेगडेंना डच्चू

भाजपाने जाहीर केलेल्या यादीत एक मोठा बदल बघायला मिळाला आहे. भाजपाने उत्तरा कन्नडमधून पाच वेळा खासदार राहिलेल्या अनंतकुमार हेगडे यांना तिकीट नाकारले आहे. त्यांच्याऐवजी विधानसभेचे माजी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना उमेदवारी दिली आहे. अनंतकुमार हेगडे आणि विश्वेश्वर कागेरी हे दोघेही ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

अनंतकुमार हेगडे हे १९९० च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान भाजपाशी जोडले गेले. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी उत्तरा कन्नडमधून ४.७९ लाख मतांनी विजय मिळविला होता. अनंतकुमार हेगडे हे अलीकडेच त्यांच्या विधानामुळे चर्चेत होते. संविधान बदलायचे असल्यास भाजपाला ४०० जागांवर विजय मिळवून द्यावा लागेल, असे ते म्हणाले होते.

अनंतकुमार हेडगे १९९६ मध्ये उत्तर कर्नाटकातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. प्रकृती बरी नसल्याने मागील तीन वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. या वर्षी जानेवारीमध्ये ते पुन्हा सक्रिय झाले.

हेही वाचा – केजरीवालांच्या ‘कट्टर भक्ता’चा देशात बोलबाला; एका व्हिडीओमुळे व्हायरल झालेले राम गुप्ता नेमके कोण?

जगदीश शेट्टर यांना तिकीट

भाजपाने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (६८) यांना बेळगावमधून उमेदवारी दिली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हुबळीमधून तिकीट नाकारल्याने शेट्टर यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, जानेवारी महिन्यात ते पुन्हा एकदा भाजपामध्ये परतले. शेट्टर लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करतात. बेळगावमध्ये त्यांची लढत काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर यांच्याशी होणार आहे.

चिक्कबल्लापूरमधून के. सुधाकर यांना संधी

त्याशिवाय भाजपाने चिक्कबल्लापूरमधून माजी मंत्री के. सुधाकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरून भाजपाच्या एका गटात नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. के. सुधाकर हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपाचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांच्या जवळचे मानले जातात.

Story img Loader