सुजित तांबडे
पुणे : कसबा विधानसभा मतदारातील पराभवाचा धसका भाजपने घेतला असून, आगामी पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने आतापासून प्रचारासाठी नवनवीन फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणूक लढविणार असल्याची ‘पुडी’ सोडून चर्चा घडवून आणली आहे. पुणेकर मतदारांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून भाजपचीच चर्चा राहील, याच्या खबरदारीबरोबरच संघटनात्मक पातळीवर नियोजनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने पुण्याला केंद्रस्थानी ठेऊन व्यूहरचना आखली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिवारातील महत्त्वाच्या संघटनांच्या राष्ट्रीय स्तरावरील बैठका या पुण्यात गेल्या तीन महिन्यांत झाल्या असून,आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पुणे हे चर्चेत राहणार आहे. संघ परिवाराच्या महत्त्वाच्या विभागांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका या पुण्यात झाल्या असून, काही बैठका या पुण्यात करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २६ मे रोजी पुण्यात घेण्यात आली. तब्बल १८ वर्षांनी ही बैठक पुण्यात झाली.

हेही वाचा >>> “एक तडीपार देशाचा गृहमंत्री तर माझ्यासारखा आदिवासी राज्यात…”, वसंत पुरके यांचे वक्तव्य; म्हणाले…

२००६ नंतर पुण्याकडे बैठक होऊ शकली नव्हती. संघ परिवाराने या बैठकीच्या निमित्ताने विचारमंथन केले. त्यानंतर जून महिन्यात स्वदेशी जागरण मंचची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत पुण्यामध्ये होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेदेखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानिमित्ताने पुणे चर्चेत राहील, याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. ही बैठक झाल्यावर चिंचवडमध्ये संस्कार भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक संघ परिवाराच्या बैठका पुण्यात होत आहेत.

हेही वाचा >>> शिवसेनेच्या पालकमंत्र्याच्या विरोधात ठाण्यात भाजप आमदारांमध्ये असंतोष, बैठकांना पालकमंत्र्यांना वेळच नाही

या बैठकांमध्ये २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्यादृष्टीने चर्चा करण्याबरोबरच २०२५ मध्ये संघाची शताब्दी असल्याने त्याबाबतच्या नियोजनावर विचारविनिमय होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संघाच्या समन्वय बैठकीमध्ये संघप्रेरित भाजप, राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय साहित्य परिषद अशा ३६ संघटना सहभागी होणार आहेत. सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीबरोबरच सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सेवा कार्य, सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा या विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार असल्याने वातावरण ढवळून निघणार आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूरमधील शरद पवार की अजित पवारांची सभा मोठी होणार ?

कसबा विधानसभा मतदार संघात झालेल्या पराभवाचा धसका घेत भाजप सावध झाली आहे. कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्याने पुण्यात उमेदवार निवडीत चूक झाली, तर पुणेकर उमेदवार स्वीकारत नसल्याची जाणीव भाजपला झाली. लादलेल्या उमेदवाराला पुणेकर झिडकारतात, हे हेमंत रासने यांच्या पराभवाने स्पष्ट झाले. कसब्याचा पराभव नक्की कशामुळे झाला, याचा आढावा घेतल्यानंतर आता कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी भाजपबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही चाचपणीला सुरुवात करत पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp kasba election defeat meetings in pune important meeting next week print politics news ysh
Show comments