गुजरात राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गौरव यात्रेचा आज (बुधवार) शुभारंभ केला. या यात्रेला मेहसाणा जिल्ह्यातील बहुचराजी येथून सुरुवात झाली आहे. या यात्रेची सांगता कच्छमधील मांडवी येथे २० ऑक्टोबर रोजी होईल. ही यात्रा गुजरातमधील पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून निघेल. आगामी निवडणुका लक्षात घेता या यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा उद्देश आहे.
हेही वाचा >>> “पाच वेळा युती तोडूनही नितीशकुमार सत्तेत”, बिहार दौऱ्यात अमित शाहांचं टीकास्र
गुरवारी आणखी तीन ठिकाणांहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या यात्रेचा शुभारंभ करतील. या यात्रेत माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी मंत्री जवाहर चावडा हे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. गुरुवारी अमित शाह यांच्या उपस्थितीत ही यात्रा अन्य तीन मार्गांनी जाईल. पहिला मार्ग अहमदाबाद जिल्ह्यातील झंझार्का गावातील संत सावैयानाथ मंदिरापासून तर अन्य दोन मार्गांनी जाणाऱ्या यात्रेचा सुभारंभ नवसारी जिल्ह्यातील वानसाडा तालुक्यातील उनई माता मंदिरापासून होईल.
हेही वाचा >>> राजीनामा नामंजूर करून उमेदवारी रद्द करण्याच्या २०१९ अकोला लोकसभा निवडणुकीतील खेळीचा ऋतुजा लटके यांच्यावर प्रयोग
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा या यात्रेत आदिवासी समाजातील मतदारांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. गुजरातमध्ये आदिवासी समजासाठी आरक्षित असलेल्या एकूण २७ जागा आहेत. त्यामुळे या समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकूडन प्रयत्न केला जाणार आहे. गुजरात गौरव यात्रेतील पाच मार्गांपैकी एक मार्ग हा आदिवासी बहुल भागातून जाणार आहे. हा मार्ग दक्षिण गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील उनैई ते उत्तर गुजरातमधील बानासकांथा जिल्ह्यातील अंबाजी असा असेल.
हेही वाचा >>> पाकिस्तानबरोबर व्यापार सुरू करण्याची पंजाब सरकारची मागणी; भाजपा,काँग्रेसची ‘आप’वर सडकून टीका
याआधी भाजपाने गुजातमध्ये दोन वेळा गुजरात गौरव यात्रेचे आयोजन केले होते. २००२ साली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना खेडा येथील फागवेल येथून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा ११ आठवडे चालली होती. तर २०१७ सालीदेखील अशीच यात्रा आयोजित करण्यात आली होती. या वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्यामुळे या यात्रेव्यतिरिक्त भाजपातर्फे येथे एक एलईडी रथ आणण्यात आला आहे. या एलईडी रथाच्या माध्यमातून भाजपा सरकारच्या योजनांबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. हा रथ गुजरात गौरव यात्रेप्रमाणेच १८२ विधानसभा मतदारसंघांत जाणार आहे.