गुजरात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करत आहेत. यंदाची निवडणूक काहीशी वेगळी ठरणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आम आदमी पार्टी आपल्या पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरली आहे. त्यामुळे गुजरात विधानसभेच्या अनेक जागांवर चुरस पाहायला मिळणार आहे.
अशी एकंदरीत स्थिती असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केलं आहे. “गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी शर्यतीत नाही, येथे भाजपा आणि काँग्रेस पक्षात लढत होईल” असं विधान अमित शाह यांनी केलं आहे. ते ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. गुजरातमधील लोकांच्या आशीर्वादामुळे भारतीय जनता पार्टी १९९० पासून प्रत्येक निवडणूक जिंकत आहे, असंही शाह म्हणाले.
गुजरात विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळेल, असं अनेकांना वाटू शकतं. पण निकाल लागल्यावर आपल्याला कळेल की ही तिरंगी लढत होती की नाही. तथापि, गुजरातमध्ये अलीकडच्या बऱ्याच वेळा तिरंगी लढत पाहायला मिळाली आहे. अलीकडेच शंकरसिंह वाघेला यांनी यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. त्याआधी केशुभाई पटेल यांनीही त्यांच्या नवीन पक्षाची स्थापना केली होती. त्याआधी चिमणभाई पटेल यांनीही त्यांचा पक्ष स्थापन केला होता. रतुभाई अदानी यांनीही स्वतःचा पक्ष काढला. या सर्व घटनांमध्ये गुजरातच्या लोकांनी फक्त दोनच पक्षांवर शिक्का मारला” असं शाह म्हणाले.
विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत भाजपा आणि आम आदमी पार्टीत मुख्य चुरस पाहायला मिळेल, असं विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष शर्यतीत नसेल, असं त्यांनी म्हटलं होतं. यावरही अमित शाहांनी टिप्पणी केली. काँग्रेसला या निवडणुकीत पाचपेक्षा कमी जागा मिळतील, असं शाह म्हणाले.