लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. देशातील वेगवेगळ्या जाती, धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. देशातील आदिवासी समाजाची संख्या लक्षणीय आहे. या समाजाला आकर्षित करण्यासाठीदेखील भाजपा विशेष मोहीम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर झारखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी प्रतिक्रिया दिली. आदिवासी समाज देवी-देवतांवर विश्वास ठवतो. हा समाज सनातनचाच एक भाग आहे, असे बाबुलाल म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त झारखंडमध्ये ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला सुरुवात केली. यावेळी बाबुलाल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आदिवासींचे प्रश्न, त्यांचा विकास यावर भाष्य केले.

“विकासाच्या यात्रेत आदिवासी सर्वांत शेवटच्या स्थानी”

विकसित भारत संकल्प यात्रेबद्दल बाबुलाल यांनी भाष्य केले. “या यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून ती २६ जानेवारीपर्यंत सुरूच राहील. या यात्रेच्या माध्यमातून गरीब, आदिवासी, वंचित लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. याच कारणामुळे यात्रेची सुरुवात करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनाची निवड करण्यात आली. बिरसा मुंडा यांचा जयंती दिन हा आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. विकासाच्या यात्रेत आदिवासी सर्वांत शेवटच्या स्थानी आहेत. देशातील वेगवेगळ्या २०० ठिकाणी या यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. याआधीही नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान योजनेची सुरुवात केली होती. झारखंडमधील गरीब नागरिकांना योग्य आरोग्य सेवा मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता”, असे बाबुलाल म्हणाले.

“आदिवासी समाज हा सनातनचाच एक भाग”

आदिवासी समाज सनातनचाच एक भाग असल्याचेही यावेळी बाबुलाल यांनी भाष्य केले. “आपल्या देशात बौद्ध, जैन, शीख असे वेगवेगळे धर्म आहेत. मात्र, खरं पाहायचं झालं तर हे सर्व धर्म हिंदू धर्माच्याच शाखा आहेत. झारखंड, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या सीमा भागांत काही ठिकाणी सरना धर्माबद्दल चर्चा झालेली पाहायला मिळते. सरना धर्म हा आदिवासी धर्म असल्याची चर्चा होते. मात्र, या सीमाभागाव्यतिरिक्त अन्य भागांत अशी चर्चा झालेली पाहायला मिळत नाही. अशा प्रकारच्या चर्चा होतच असतात. मात्र, तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं तर आदिवासी समाजाची खरी जवळीक ही सनातनशी आहे. सनातनमध्ये अमूक एकाच देवाची पूजा करा असे सांगितले जात नाही. सनातनमध्ये ३६ कोटी देवी-देवता आहेत. यामध्ये आदिवासी समाजाच्या देवी-देवातांचाही समावेश असावा. जे लोक स्वत:ला सरना म्हणून घेतात, ते देखील अनेक देवांची पूजा करतात. अशाच प्रकारची पूजा ही सनातन धर्मातही केली जाते. त्यामुळे आदिवासी हे सनातनच्या अधिक जवळ आहेत, असे म्हणायला हरकत नाही. उद्या आदिवासी समाजातील लोक ख्रिश्चन किंवा मुस्लीम झाले तर त्यांना भगवान बिरसा मुंडा यांना भगवान म्हणता येणार नाही. ते बिरसा मुंडा यांची पूजा करू शकणार नाहीत. मात्र, सनातनमध्ये असे कोणतेही बंधन नाही. आमच्यासाठी राम, कृष्ण, शंकर असे सगळेच देव आहेत. तुम्ही फक्त रामाचीच पूजा का करता? किंवा राम, शंकर, कृष्ण यापेक्षा सरस कोण आहे, असे तुम्हाला कोणीही विचारणार नाही. प्रभू राम हे त्रेतायुग तर कृष्ण हे द्वापर युगात आल्याचे सनातन धर्म मानतो. जेव्हा आदिवासी समाज देवी-देवतांना मानतो, तेव्हा तो सनातनचाच एक भाग आहे, असे मला वाटते. आदिवासी हे सनातनच्या जवळ आहेत”, असे बाबुलाल म्हणाले.