तेलंगणात या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांनी शुक्रवारी केसीआर सरकारवर निशाणा साधला. तसेच त्यांनी तेलंगणातील निजामशाहीच्या प्रतीक असलेल्या सर्व वास्तू आणि संरचना नष्ट करू, अशा आशयाचं विधान केलं आहे.
भाजपा नेते बंदी संजय कुमार हैदराबादमध्ये म्हणाले की, तेलंगणात भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली तर आम्ही निजामाशी संबंधित सर्व सांस्कृतिक चिन्हं, संरचना, वास्तू नष्ट करू. कारण या वास्तू गुलामगिरीचं प्रतीक आहेत. हैदराबादमध्ये बांधण्यात येत असलेल्या नव्या सचिवालयाच्या घुमटात बदल करून भारत आणि तेलंगणाच्या संस्कृतीचं दर्शन होईल, असा त्यात बदल करू… “सचिवालयाचा नवीन घुमट पाहून असदुद्दीन ओवेसी यांना आनंद होतो. कारण तो घुमट ताजमहलासारखा दिसतो,” असंही बंदी संजय कुमार म्हणाले.
विशेष म्हणजे नवीन सचिवालयाला अलीकडेच आग लागली होती. या दुर्घटनेवरूनही कुमार यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर हल्लाबोल केला. ओवेसींना खूश करण्यासाठी मुख्यमंत्री केसीआर यांनी सचिवालयाचं रुपांतर ताजमहालासारख्या समाधीत केलं, असंही बंदी संजय कुमार म्हणाले. ते “जनम गोसा-भाजपा भरोसा” या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कुकटपल्ली विधानसभा मतदारसंघात एका सभेला संबोधित करत होते.