कविता नागापुरे

भंडारा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही उमेदवारीसाठी ‘भाऊगर्दी’ सुरू आहे. डॉ. परिणय फुके येथून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे  बोलले जात आहे. या शक्यतेला त्यांच्या एका ‘ट्विट’मुळे बळही मिळत आहे. त्याचीच राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सीतासावंगी गावात क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे डॉ. फुके यांनाही फलंदाजीचा मोह आवरला नाही. यानंतर त्यांनी, ‘इस बार धूम मचाएंगे…’ अशा आशयाचे ट्विट केले. त्याला एक चित्रफीतही त्यांनी जोडली. यात ते क्रिकेटच्या  मैदानात उतरून फलंदाजी  करीत असल्याचे  दिसते आहे  आणि  ‘बॅकग्राऊंड’ला ‘वो सिकन्दर ही दोस्तों कहलाता है, हारी बाज़ी को जीतना जिसे आता है,’ हे गाणे  वाजत आहे.  त्यांच्या या  ट्विटचा नेमका अर्थ काय, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत.  फुके लोकसभेच्या मैदानात  दंड थोपटून उभे  आहेत  की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सध्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या हा मतदारसंघ भाजपकडे आहे. सुनील मेंढे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, महायुतीकडून तिकीट मिळावे यासाठी डॉ. फुकेंनीही शक्तिप्रदर्शन सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यांची ही सुप्त इच्छा आता जगजाहीर होत चालली आहे.

हेही वाचा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टांगती तलवार अद्यापही कायम

हेही वाचा… उद्धव ठाकरे गटावर अपात्रतेची कारवाई टाळण्यामागे राजकीय खेळी?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. फुके साकोली मतदारसंघात नाना पटोलेंविरोधात लढले होते. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. हा राजकीय इतिहास पाहता भाजपश्रेष्ठी आणि स्वत: देवेंद्र फडणवीस  फुकेंना  पुन्हा एकदा  विधानसभेच्या  निवडणुकीत उतरवतात की त्यांना लोकसभेचे तिकीट देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader