हर्षवर्धन पाटील हे १९९५ पासून येनकेनप्रकारेण राजकीय वर्तुळात चर्चेत राहिले आहेत. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पाटील यांचा युती सरकारमध्ये समावेश झाला होता. १९९९ मध्ये सत्ताबदल होताच अपक्ष निवडून आलेल्या पाटील यांचा लोकशाही आघाडी सरकारमध्ये समावेश झाला. पण मंत्रिमंडळाचा आकार फारच मोठा आहे या कारणावरून सहा मंत्र्यांना नारळ देण्यात आला. त्यात हर्षवर्धन पाटील हेसुद्धा होते. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी त्यांनी चांगले जमविले. सहकार, संसदीय कार्य, पणनसारखी महत्त्वाची खाती त्यांच्या वाट्याला आली. २०१४ मध्ये ते इंदापूरमधून पराभूत झाले आणि त्यांच्या नशिबी राजकीय विजनवास आला. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने इंदापूरची जागा पाटील यांना सोडण्यास नकार दिला आणि पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुन्हा पराभव झाला. याच काळात ईडी व अन्य शासकीय यंत्रणा अधिकच सक्रिय झाल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना दरदरून घाम फुटला होता. तेव्हा ‘भाजपमध्ये प्रवेश केल्याने शांत झोप लागते’, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केल्याने त्याची प्रतिक्रिया उमटली. भाजप नेत्यांनाही हे विधान फारसे रुचले नव्हते. राज्यसभा किंवा विधान परिषदेवर वर्णी लावून आपले पुनर्वसन करण्याची पाटील यांची मागणी भाजपने काही पूर्ण केली नाही. अजित पवार महायुतीबरोबर आल्याने इंदापूर मतदारसंघात लढण्याची संधी मिळणे कठीण होते. शेवटी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली. २०१९ मध्ये शरद पवार यांच्या आक्रमक प्रचारामुळे पराभव झाल्याची भावना पाटील यांनी तेव्हा व्यक्त केली होती. आता शरद पवार हेच मदतीला येतील, असा विश्वास पाटील यांना वाटतो. भाजपला रामराम केल्यावर ईडी वगैरे यंत्रणा मागे लागतात हे एकनाथ खडसे यांनी अनुभवले आहे. यामुळेच हर्षवर्धन पाटील यांना झोपमोड होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
हेही वाचा : Jammu and Kashmir Politics : जम्मू-काश्मीर विधानसभेचा उद्या निकाल; कोणता पक्ष ठरणार ‘किंगमेकर’?
चर्चा भरकटते तेव्हा…
कोल्हापुरात विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी येणार आहेत. याच्या नियोजनासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीची बैठक आयोजित केली होती. हसन मुश्रीफ तसेच धनंजय महाडिक – संजय मंडलिक हे आजी माजी खासदार आवश्यक तितके बोलले. तिघांनी केलेले मार्गदर्शन पुरेसे होते. आणखी कोणी काही बोलावे याची गरज नव्हती. तरीही भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी बोलणे सुरू ठेवलेच. हा मुद्दा धरून मनोगत संपवताना मंडलिक यांनी शेजारी बसलेल्या महेशरावांना अनेक प्रश्न असले; तरी त्याची उघडपणे चर्चा करू नका, असा खोचक सल्ला दिला. कार्यक्रम नियोजनाचा मुद्दा सोडून त्यांची गाडी कार्यकर्त्यांच्या भावनांना मांडण्याकडे वळली. रखडलेल्या शासकीय समित्यांच्या नियुक्तींचा विषय त्यांनी छेडला. विधानसभा निवडणुकीनंतर नियुक्ती केल्या नाहीत तर पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्या दारात जाऊन बसू. चंद्रकांतदादा पुण्यात असल्याने त्यांनाही सोडणार नाही, असा इशारा देत त्यांनी अंतरीचे गूज जाहीरपणे मांडल्याबद्दल कार्यकर्त्यांनी टाळ्याचा प्रतिसाद नोंदवला.
(संकलन : संतोष प्रधान, दयानंद लिपारे)