६,०७७ क्विंटल तांदळाची चोरी केल्याप्रकरणी एका भाजपा नेत्याला अटक करण्यात आली आहे. ‘अण्णा भाग्य’ योजनेसाठीच्या तांदळाची चोरी केल्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी बुधवारी राज्यातील भाजपा नेते मणिकांत राठोड यांना अटक केली. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याला दर महिन्याला १० किलो धान्य दिले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये यादगीर जिल्ह्यातील शहापूर येथील सरकारी गोदामातून दोन कोटींपेक्षा जास्त किमतीचा तब्बल ६,०७७ क्विंटल तांदूळ चोरीला गेला होता. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, राठोड यांना तपास पथकासमोर हजर राहण्यासाठी अनेक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु, त्या नोटिसांना त्यांनी उत्तर दिले नाही.

हेही वाचा : देशातील १६ लाख लहान मुलं लसीकरणापासून वंचित, ‘डब्लूएचओ’ची धक्कादायक माहिती; कारण काय?

कोण आहेत मणिकांत राठोड?

कलबुर्गी जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते मणिकांत राठोड यांनी २०२३ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे याच्याविरोधात लढवली होती. राठोड यांचा निवडणुकीत पराभव करणारे प्रियांक सध्या सिद्धरामय्या मंत्रिमंडळात इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री आहेत. मे २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राठोड चर्चेत आले होते.

मल्लिकार्जुन खरगेंच्या कुटुंबाला संपविण्याच्या कटाचा आरोप

काँग्रेसने राठोड यांच्यावर मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबाच्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप केला गेला होता. त्यावेळी एआयसीसीचे कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी राठोड आणि भाजपाचे स्थानिक नेता यांच्यामधील कथित संभाषणाची एक ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यामध्ये राठोड हे “खरगे यांच्या पत्नी आणि मुलांना समाप्त करतील”, असे म्हणताना दिसले. राठोड यांनी या ऑडिओ क्लिपला ‘बनावट’ असल्याचे सांगत काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले होते. राठोड हे गुरमितकल पट्ट्यातील आहेत आणि हा मल्लिकार्जुन खरगे यांचा बालेकिल्ला राहिला आहे.

गुन्हेगारी ट्रॅक रेकॉर्ड

हत्येचा प्रयत्न, ड्रग्ज व अमली पदार्थांची तस्करी, बेकायदा शस्त्रे बाळगणे व धमकी देणे, असा त्यांचा गुन्हेगारी ट्रॅक रेकॉर्ड राहिला आहे. त्यांच्यावर ४० फौजदारी खटले सुरू आहेत. त्यातील तीन प्रकरणांमध्ये त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांनी एक वर्षाची शिक्षा भोगली आहे. उर्वरित खटल्यांमध्ये ते जामिनावर सुटले आहेत. दोषी ठरलेल्या तीन प्रकरणांपैकी,२०१३ मध्ये यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून सार्वजनिक जीवन धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता; ज्यामध्ये त्यांनी २,४०० इतक्या रकमेचा दंड भरला होता.

२०१५ मध्ये त्यांच्यावर मुलांसाठी सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या दूध पावडरची चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. २०१५ मध्ये सरकारी अधिकाऱ्याला खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांना २००० रुपयांचा दंड भरावा लागला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये राठोड यांनी प्रियांक खरगे यांना ठार मारण्याची धमकीदेखील दिली होती; ज्यासाठी त्यांच्यावर कलबुर्गीमध्ये गुन्हा दाखल करून, हैदराबादमधून अटक करण्यात आली होती. या प्रकरणातून त्यांची नंतर जामिनावर सुटका झाली होती.

हेही वाचा : २ हजार नोकर्‍यांसाठी २५ हजार अर्ज, मुंबईत चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती; भारतात बेरोजगारी वाढत आहे का?

विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात राठोड यांनी त्यांची जंगम मालमत्ता ११.३४ कोटी रुपये, स्थावर मालमत्ता १७.८३ कोटी रुपये, त्याशिवाय १५.३३ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही जाहीर केले होते. त्यांच्या स्थावर मालमत्तेत शेतजमीन, एक तांदूळ फॅक्टरी आणि हैदराबाद, कलबुर्गी व महाराष्ट्रातील ठाणे येथील फ्लॅट्सचा समावेश होता.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader manikanth rathod arrested in rice theft case rac