उत्तर प्रदेशमधील भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या लखनौ येथील निवासस्थानी त्यांच्या मुलाच्या मित्राची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. याआधीही किशोर हे मोदी सरकारने त्यांच्यावर सोपवलेल्या राज्यमंत्री पदाच्या जबाबदारीमुळे नव्हे, तर अशाच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. ते उत्तर प्रदेशमधील दलितांचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कौशल किशोर मोहनलालगंज मतदारसंघाचे खासदार

कौशल किशोर हे उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांना मोदी सरकारमध्ये गृहनिर्माण आणि शहरविकास विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ६३ वर्षीय किशोर हे अनुसूचित जातीमधून येतात. साधारण २० वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ साली ते मलिहाबाद येथून आमदार झाले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. निवडून येताच त्यांचा तत्कालीन मुलायमसिंह यादव सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता.

अमली पदार्थांमुळे एका मुलाचा मृत्यू

किशोर यांच्या पत्नी जय देवी यादेखील उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्या आतापर्यंत मलिहाबाद (राखीव) जागेवरून दोन वेळा आमदार राहिलेल्या आहेत. या दाम्पत्याला एकूण तीन मुले होती. त्यातील एका मुलाचा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून किशोर यांनी अमली पदार्थांविरोधात लढा उभारलेला आहे.

मुलाने स्वत:वरच झाडली होती गोळी?

किशोर यांचे दुसरे पुत्र आयुष यांना २०२१ साली बंदुकीची गोळी लागली होती आणि ते जखमी अवस्थेत सापडले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्वत:वरच गोळी झाडून घेतली होती. त्यानंतर आता किशोर यांच्या निवासस्थानी ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे, ती व्यक्ती किशोर यांच्या तिसऱ्या मुलाचा मित्र आहे, असे म्हटले जात आहे.

भावाच्या मृत्यूमुळे योगी सरकारवर टीका

करोना काळात भावाचा मृत्यू झाल्यामुळे किशोर चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी उत्तर प्रदेशच्या भाजपाच्याच सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच शासकीय रुग्णालयांच्या अवस्थेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातही किशोर चर्चेत आले होते. वालकर हत्या प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी ज्या मुली घर सोडून गेलेल्या आहेत, त्यांना आवाहन केले होते. आफताब पूनावाला – श्रद्धा वालकर यांच्यासारख्या नात्यासाठी तुम्ही आई-वडिलांना सोडून जाता, ते कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. तसेच अशा प्रकारे कोणी लग्न करीत असेल, तर तशा विवाहाची नोंदणी करावी, असेही ते म्हणाले होते.

शासकीय अधिकारी फोन कॉल्स उचलत नसल्याची तक्रार

गेल्या महिन्यात किशोर आणि त्यांच्या पत्नीने उत्तर प्रदेशमधील एका स्थानिक शासकीय कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींचे फोन कॉल्स उचलत नाहीयेत, असा आरोप त्यांनी केला होता. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे किशोर हे सतत चर्चेत आलेले आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना उत्तर प्रदेशमधील पासी समाजाचा मोठा पाठिंबा आहे. याच कारणामुळे अनेक वेळा वादाचे कारण ठरूनदेखील त्यांना भाजपाने वेळोवेळी महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे.

किशोर यांच्याकडे भाजपाकडून महत्त्वाची जबाबदारी

सपा सरकारच्या काळात मंत्री झाल्यानंतर त्यांनी खासदार होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्यांनी स्वत:चा एक पक्ष काढला होता. २००४ मध्ये त्यांनी मोहनलालगंज येथून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत ते पाचव्या स्थानी होते. पुढे भाजपामध्ये प्रवेश करताच त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आले. त्यांनी २०१४ सालची निवडणूक लढवीत बसपाच्या आर. के. चौधरी यांना पराभूत केले होते. २०१९ मध्येही त्यांनी भाजपाच्याच तिकिटीवर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी बसपाचे उमदेवार सी. एल. वर्मा यांना पराभूत कले होते. या यशानंतर त्यांच्यावर उत्तर प्रदेश भाजपाच्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

… म्हणून किशोर यांना केंद्रात मंत्रिपद

२०२१ साली किशोर यांचा मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. अनुसूचित जातीच्या मतदारांवर असलेल्या त्यांच्या प्रभावाला समोर ठेवूनच त्यांना ही संधी देण्यात आली होती. २०२२ साली उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाने चांगली कामगिरी करावी म्हणूनदेखील त्यांना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या मुलाला तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, पक्षाने त्यांची पत्नी जय देवी यांना तिकीट दिले होते.

किशोर यांच्या पुत्राच्या नावावर बंदुकीची नोंदणी

दरम्यान, किशोर यांचे पुत्र विकास हेदेखील राजकारणात सक्रिय असल्याचे म्हटले जाते. किशोर यांच्या निवासस्थानी ज्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, ती व्यक्ती विकास यांचा मित्र असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे ज्या बंदुकीने या व्यक्तीची हत्या झाली, त्या बंदुकीची विकास यांच्या नावावर नोंदणी झालेली आहे. हत्येच्या वेळी विकास हे दिल्लीला असल्याचा दावा केला जातोय.