Pankaja Munde : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सध्या राज्यात सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारासाठी दिल्लीतील दिग्गज नेत्यांनी देखील महाराष्ट्रात तळ ठोकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी यांच्यासह आदी नेत्यांच्या सभा राज्यातील विविध मतदारसंघात होत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभा काही मतदारसंघात झाल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रचाराच्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असं म्हटलं होतं. भारतीय जनता पार्टीच्या या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’, या घोषणांवरून चांगलंच राजकारण तापलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आलेल्या या घोषणांवर विरोधकांनी टिकेची झोड उठवली. मात्र, या घोषणांवरुन आता भारतीय जनता पक्षाचे काही नेते आणि महायुतीमधील काही नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर आपलं मत मांडत ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणांची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत आमदार पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. तर याआधी अजित पवारांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा घोषणांची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं.
हेही वाचा : Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, “खरं सांगायचं तर माझं राजकारण वेगळं आहे. मी त्याच पक्षाचा भाग आहे म्हणून समर्थन करणार नाही. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणांची आवश्यकता नाही. केवळ विकासाचं काम केलं पाहिजे, असं माझं मत आहे. प्रत्येक माणसांसाठी काम करणं हे नेत्याचं काम असतं. त्यामुळे असा कोणताही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही. योगी आदित्यनाथ यांनी वेगळ्या संदर्भात घोषणा दिली होती. पंतप्रधान मोदीजींनी जात धर्म न पाहता सर्वांना न्याय दिला. लोकांना रेशन, घर किंवा सिलिंडर देताना त्यांनी जात किंवा धर्म पाहिला नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
याआधी अजित पवारांनी म्हटलं होतं की, “‘बाटेंगे ते काटेंगे’ अशा घोषणांचे राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही हे मी अनेकदा सांगितले आहे. हे यूपी-झारखंड किंवा इतर ठिकाणी चालू शकते”, असं मत त्यांनी मांडलं होतं. तसेच याबाबतच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी यावर बोलताना म्हटलं होतं की, ‘भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात धर्मांतरविरोधी कायद्याचे आश्वासन दिले होते. जे महायुतीच्या अजेंड्यावर नाही’.
दरम्यान, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांचा असं म्हणणं आहे की, मोदी-शाह युगाच्या उदयापासून पक्षातून बाजूला करण्यात आलं. मात्र, मुंडेंचा वारसा पाहता त्या एक मजबूत ओबीसी चेहरा आहेत. त्यामुळे पक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना लोकसभेची संधी देण्यात आली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली.
दरम्यान, परळीतील मुंडे कुटुंबीयांची जागा आता महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाच्या कोट्यात गेली आहे. परळीमधून आता धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले होते. त्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे विजयी झाले होते. दरम्यान, आता परळीबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी ‘द एक्सप्रेस’शी बोलताना म्हटलं की, “या निवडणुकीत परळीच्या लढतीत भाजपाचा उमेदवार नाही, याचं वाईट वाटतं. मात्र, मी त्यांना (पक्षाच्या कार्यकर्त्यांना) ‘घड्याळ’ चिन्हाचा (राष्ट्रवादीचे) प्रचार करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच ते देखील ‘कमळ’ (भाजपाचे चिन्ह) सारखेच आहे”, असं त्यांनी म्हटलं.