नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केरळच्या २० जागांसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. इथे भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही. यावेळी मात्र केंद्रातील सत्ताधारी पक्ष इथे खाते उघडेल अशी आशा भाजपचे केरळप्रभारी प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
केरळमध्ये २०१९ आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फरक काय?
जावडेकर: माकप आणि काँग्रेसला भाजपशी टक्कर द्यावी लागेल. यावेळी तिहेरी लढत पाहायला मिळेल. भाजपच्या मतांच्या टक्केवारीत १५ ते २० टक्के वाढ होईल. (२०१९ मध्ये भाजपला १३ टक्के मते मिळाली होती.) २०२४ मध्ये केरळमध्ये भाजपला ५ पेक्षा जास्त जागा मिळतील.
केरळमधील कोणते समूह भाजपला मतदान करू शकतील?
जावडेकरः हिंदूमधील नायर समाजाचा नेहमीच पाठिंबा असतो. केरळमध्ये इळवा हा प्रमुख ओबीसी समाज २५ टक्के असून यावेळी हा समाज भाजपला मतदान करेल. आत्तापर्यंत इळवांची १०० टक्के मते ‘माकप’ला मिळत होती. केरळमध्ये ‘माकप’ हा हिंदूचा पक्ष तर, काँग्रेस मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा पक्ष मानला जातो. यावेळी हिंदू ओबीसी आणि ख्रिश्चन या दोन्ही समाजांची मते भाजपला मिळतील.
हेही वाचा : एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
लोकांनी भाजपला मते का द्यावीत?
जावडेकरः केरळमधून भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही म्हणून केंद्राने राज्याचा विकास थांबवला नाही. काँग्रेसच्या १० वर्षांच्या काळात केरळला ४६ हजार कोटींचे अनुदान दिले गेले, मोदींच्या १० वर्षांत १.५ लाख कोटी म्हणजे तिप्पट अनुदान मिळाले. ५० लाख मल्याळी परदेशात काम करतात. संकटांमध्ये युक्रेन, येमेन, आखाती देश, सुदानमधून बहुसंख्या मल्याळी लोकांना सुखरुप आणले गेले. आखाती देशांतील तुरुंगात अडकलेल्या ५६० मल्याळींना सोडवले गेले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची पत वाढल्यामुळे हे शक्य झाले. मल्याळी जनतेमध्ये मोदी सरकारवरील विश्वास वाढू लागला आहे.
पण, मल्याळी लोकांनी भाजपला कधीही आपले मानलेले नाही…
जावडेकरः २०१९ मध्ये केरळमधील बहुसंख्य मतदारांना राहुल गांधी पंतप्रधान होईल असे वाटले होते. तेव्हाही मोदीच पंतप्रधान झाले, २०२४मध्ये तर राहुल गांधींचे नावही कोणी घेत नाही. केरळचा विकास मोदीच करणार असतील तर विकास करणाऱ्या पक्षाला लोक मते देतील. दिल्लीत आंदोलने करणारे, संसदेत सभात्याग करणारे, फक्त प्रश्न मांडणारे खासदार हवेत की, प्रश्न सोडवू शकणारे लोकप्रतिनिधी हवेत हा विचार केरळचे मतदार यावेळी करतील.
हेही वाचा : भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?
भाजपच्या प्रचाराचे मुद्दे काय?
जावडेकरः विकास हा एकमेव मुद्दा आहे. मोदींच्या १० वर्षांत लोककल्याणाच्या योजना कोणत्याही भेदभावाविना राबवल्या गेल्या. केरळची लोकसंख्या ३.५ कोटी आहे, त्यातील १.५ कोटींना मोफत धान्य दिले जाते. तिरुवनंतपूरम-कासारगौड हा ३५० किमीचा सहा पदरी रस्ता ६० टक्के पूर्ण झाला. याच दोन शहरांना जोडणाऱ्या २ वंदे भारत रेल्वेगाड्या तुडुंब भरलेल्या असतात. ‘माकप’ आघाडी सरकारच्या ‘के-रेल्वे’ प्रकल्पावर फक्त महाभारत घडले, बाकी काहीच झाले नाही. केंद्राचा विकास केरळपर्यंत पोहोचला असेल तर २०-२५ टक्के लोक मतदानावेळी वेगळा विचार करू शकतील.
हेही वाचा : “…भारताची परिस्थिती रशियासारखी होईल”, भगवंत मान यांचा आरोप; मोदींविषयी काय म्हणाले?
तिरुवनंतपूरममध्ये काँग्रेसचे शशी थरूर विरुद्ध केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर या लढतीकडे कसे बघता?
जावडेकरः चंद्रशेखर मल्याळी आहेत, ते परके नाहीत. त्यांचा केरळमध्ये जनसंपर्क प्रचंड असून इथे अटीतटीची लढत होईल. पट्टणमथिट्टामध्ये अनिल ॲण्टनी हे सक्षम उमेदवार आहेत. तिथल्या ख्रिश्चन मतदारांचा त्यांना पाठिंबा आहे. अटिंगळमध्ये केंद्रीयमंत्री व्ही. मुरलीधर हे तगडे उमेदवार आहेत. अळ्ळपूळमध्ये शोभा सुरेंद्रन, कोळ्ळममध्ये जी. कृष्णकुमार यांच्या लढतीही लक्षवेधी होऊ शकतील.