छत्तीसगडमध्ये येत्या १७ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यामुळे येथे पूर्ण ताकदीने प्रचार केला जात आहे. या राज्यातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचे केंद्रातील नेते येथे सभा घेत आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी छत्तीसगडमधील सीतापूर या विधानसभा मतदारसंघातील एका सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी आम्ही सत्तेत आल्यास जबरदस्तीने केल्या जात असलेल्या धर्मातरावर बंदी घालू, असे आश्वासन दिले.
सक्तीच्या धर्मांतरावर बंदी आणू- राजनाथ सिंह
“आमिष दाखवून एखाद्याचे धर्मांतर का करावे. भाजपा सत्तेत आल्यास आम्ही अशा प्रकारच्या धर्मांतरावर बंदी आणू,” असे राजनाथ सिंह म्हणाले. पीटीआयने तसे वृत्त दिले आहे. तसेच २०१८ साली काँग्रेस सत्तेत आल्यापासून येथे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे, असा आरोपही त्यांनी केला. “छत्तीसगडमध्ये खुनासारखे प्रकार तर सर्रास घडत आहेत. अनेक कुटुंबातील मुली गायब असूम छत्तीसगडपुढे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. मानवी तस्करी आणि अमली पदार्थांच्या व्यापारात वाढ झाली आहे. त्यामुळे काँग्रेसला या राज्यातून उखडून टाकणे खूप गरजेचे आहे,” असेही राजनाथ सिंह म्हणाले.
“काँग्रेसला आता निरोप देण्याची वेळ”
काँग्रेस पक्ष हिरो नसून झिरो आहे, अशी टीकादेखील त्यांनी केली. “सत्तेत आल्यापासून काँग्रेसेने या राज्यात विकासाचे एकही काम केलेले नाही. या सरकारची कामगिरी सांगायची झाल्याल ती शून्य आहे. काँग्रेस हिरो नसून झिरो आहे. त्यामुळे त्यांना निरोप देण्याची आता वेळ आली आहे,” असेही राजनाथ सिंह म्हणाले.
डाव्या विचारांची कट्टरता संपुष्टात आणू- राजनाथ सिंह
आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी डावी विचारसरणी असणाऱ्यांवरही टीका केली. आम्ही सत्तेत आल्यास पुढच्या चार वर्षांत आम्ही डाव्या विचारसरणीची कट्टरता संपुष्टात आणू, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
भाजपाकडून सीआरपीएफच्या माजी जवानाला तिकीट
दरम्यान, भाजपाने सीतापूर या मतदारसंघात सीआरपीएफचे माजी जवान राम कुमार टोप्पो यांना उमेदवारी दिली आहे. येथे काँग्रेसने विद्यमान मंत्री अमरजीत भगत यांना उमेदवारी दिली आहे. येत्या १७ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये एकूण ७० जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी पार पडले.