जालना: लाेकसभा निवडणुकीतील पराभवानंतर झालेल्या भाजपच्या जिल्हा अधिवेशनात ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मरगळ झटकून टाकण्याची सूचना केली. पराभव विसरा आणि विधानसभेसाठी पुन्हा कामाला लागा. लाेकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही घडले तर कार्यकर्त्यांचेही राजकीय भवितव्य धाेक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पराभवानंतर रावसाहेब दानवे पुन्हा बांधणीच्या कामास लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
कार्यकर्ता घराबाहेर निघाला नाही तर लाेक त्याचा वेग अर्थ काढतील म्हणून पराभवानंतर लगेच घराबाहेर पडलाे आणि मतदार संघाचा दाैरा केला. लाेकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत घडले तर कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्यही धाेक्यात येईल. आपला पराभव कुणामुळे आणि कशामुळे झाला, हे सांगण्याची गरज नाही. कार्यकर्ता गावचा सरपंच आणि त्याचे कुणी ऐकत नाही असे कसे चालेल, राजकीय हवा काेणत्याही बाजूने असली तरी मतदाराला आपल्या बाजूने आणण्याची कला कार्यकर्त्यांत असली पाहिजे, असे म्हणत रावसाहेब दानवे आता विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना बळ देऊ लागले आहेत.
हेही वाचा : राजधानी दिल्लीचा कारभार नक्की कोणाच्या हातात? कोलमडलेल्या पायाभूत सुविधांसाठी कोण जबाबदार?
विराेधात निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना उद्देशून दानवे म्हणाले, मतदार संघातील विकास कामांच्या अनुषंगाने सहा महिने आपण त्यांना काहीही बाेलणार नाही. त्यानंतर मात्र हिशेब घेऊ. मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट आहे. परंतु नवनिर्वाचित खासदारांची भूमिका मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याची असेल तर त्यांनी तसे स्पष्ट केले पाहिजे. काँग्रेस, त्याचप्रमाणे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची अशी भूमिका असेल तर त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ती मांडली पाहिजे, असे म्हणत दानवे आता आरक्षणावरुन महाविकास आघाडीला लक्ष्य करू लागले आहेत.
हेही वाचा : बांगलादेशातील हिंदू निर्वासितांवरून पश्चिम बंगालचं राजकारण कसं तापलंय?
जालना जिल्ह्यात बदनापूर, भोकरदन व परतूर या विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळाले होते. यातील परतूर मतदारसंघातून निवडून येणारे माजी मंत्री बबनराव लोणीकर हे रावसाहेब दानवे यांच्या मेळाव्यात दिसत नाहीत. मात्र, रावसाहेब दानवे जिल्ह्याच्या बांधणीत पुन्हा कामाला लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
© The Indian Express (P) Ltd