बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपाला १०० जागांवरही विजय मिळवता येणार नाही, असं विधान नितीश कुमारांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर भाजपाकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधताना मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाचं कौतुक केलं.
भारत देश बदलला असून भारतामुळे अमेरिकेसह यूके आणि फ्रान्समध्ये रोजगार निर्मिती होईल, असं विधान रविशंकर प्रसाद यांनी संबंधित देशांच्या पंतप्रधानांच्या हवाल्याने केलं.
नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना काय झालं आहे? ते बिहार राज्य व्यवस्थित हाताळू शकत नाहीत. त्यांचं राज्य संकटात आहे. त्यांच्या पक्षात अराजकता माजली आहे. काँग्रेस पक्षही त्यांना सामावून घेत नाही. त्यांना देवेगौडा किंवा इंदरकुमार गुजराल यांच्यासारखं ५-६ महिन्यांसाठी पंतप्रधान बनायचं आहे का? असा सवाल प्रसाद यांनी विचारला.
रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले, “नितीश कुमार असो वा इतर कोणताही नेता, त्यांना हे समजत नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास वेगाने होत आहे. भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे. यूके, अमेरिका आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांनी भारताच्या एअर इंडिया कराराचं कौतुक केलं आहे. भारताच्या या करारामुळे त्यांच्या देशांत रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपला देश खूप बदलला आहे.”
नितीश कुमार नेमकं काय म्हणाले होते?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार शनिवारी म्हणाले की, काँग्रेसने आता विश्रांती घेऊ नये. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ने नवीन ऊर्जा निर्माण केली आहे. या गतीचा उपयोग भाजपाच्या विरोधातील पक्षांची युती करण्यासाठी केला पाहिजे. हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. ज्यामुळे लोकसभेत ३०० पेक्षा अधिक जागांसह प्रचंड बहुमत असलेल्या भाजपाला सत्तेतून हटवता येईल. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला १०० पेक्षा कमी जागांवर आपल्याला रोखता येईल.