BSP Leader In BJP लोकसभेचे खासदार रितेश पांडे यांनी रविवारी बहुजन समाज पक्ष (बसप) सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, प्रदेशाध्यक्ष भुपेंद्र चौधरी आणि इतर पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत रितेश पांडे यांनी पक्षप्रवेश केला. पांडे हे उत्तर प्रदेशमधील आंबेडकर नगरचे खासदार आहेत. त्यांचे वडील राकेश पांडे हे सध्या समाजवादी पार्टीचे (सपा) आमदार आहेत. ब्राह्मण समाजाचे ४२ वर्षीय रितेश पांडे यांनी बसपमध्ये आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. जाट आणि दलित समाज हा त्यांचा मतदार राहिला आहे. तळागळात जाऊन काम करणारे नेते, अशी त्यांची ख्याती राहिली आहे. परंतु २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षातील त्यांचे स्थान बदलले. त्यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलतांना अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यांनी यात बसप सोडल्याचे कारणही स्पष्ट केले.
बसपा का सोडली? यावर पांडे म्हणाले की, २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या एकाही बैठकीला मला बोलावले नाही. मी बहेनजी (मायावती) यांचा आदर करतो, त्यामुळे यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. त्यांनी मला खूप काही दिले. मला त्यांच्याबद्दल नकारात्मक विधान करायचे नाही. माझ्याप्रमाणे इतरही खासदार आहेत, ज्यांना पक्षाच्या बैठकींना बोलावले नाही. याचे उत्तर ते स्वतःदेतील, असे त्यांनी सांगितले. बसप तुम्हाला उमेदवारी देणार नाही अशी भीती तुम्हाला होती का? यावर ते म्हणाले, “बसपमध्ये गेल्या १२ वर्षात मी खूप काही शिकलो आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझा हात धरून मला शिकवले. पण अलीकडे पक्षाला माझी गरज आहे, असे वाटत नाही. पक्ष आणि पक्षातील खासदारांमध्ये संवाद असणे आवश्यक असते, परंतु गेल्या दोन वर्षांत आमच्यात काहीही संवाद झालेला नाही. यामुळे मला असे जाणवले की, पक्षाला माझी गरज नाही. यामुळेच मला माझे भविष्य ठरवणे योग्य वाटले.
विद्यमान खासदार बसपपासून दूर जात आहेत
तुम्ही पूर्वी बसपलाच का निवडले? या प्रश्नावर पांडे म्हणाले, मी २४व्या वर्षी पक्षात सामील झालो. मी पक्षाच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम जी आणि मायावती जी यांच्या विचारांनी प्रभावित झालो होतो. आताही मी त्यांच्या विचारांनी प्रभावित आहे. परंतु माझ्याबद्दलचा पक्षाचा दृष्टिकोन बदलला आहे, असे मला वाटते. बसपा खासदार अफजल अन्सारी यांना सपाने उमेदवारी दिली; तर दानिश अली यांनीही राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला हजेरी लावली होती. इतर खासदारही विविध पक्षांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. विद्यमान खासदार बसपपासून दूर का जात आहेत?, असा प्रश्न पांडे यांनी केला.
तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करण्यामागे काय कारण आहे? यावर ते म्हणाले, “समाजातील शोषित आणि वंचित घटकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीच मी राजकारणात प्रवेश केला. गेल्या दशकात मी त्यांना घर, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळताना पाहिलं आहे. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधीही निर्माण करण्यात आल्या आहेत. आंबेडकरनगरमध्ये गेल्या पाच वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४ हजाराहून अधिक घरे बांधली गेली, शौचालये बांधली गेली, प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या आणि प्रत्येक घरात वीज पोहोचली. मागासलेल्या भागात पूर्वांचल एक्सप्रेसवे आणि गोरखपूर लिंक एक्सप्रेसवेच्या बाजूने इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकसित केले जात आहेत. या सर्व योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत, असे मला वाटते.”
या काळात मतदारसंघाचा विकास करतांना पक्षाची गरज भासल्याचेही त्यांनी सांगितले. “राजकीय नेत्याला त्याच्या कामाचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेची गरज असते. लोक त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींजवळ आपल्या समस्याघेऊन सहज पोहोचू शकतील, हे सुनिश्चित करणेही तितकेच आवश्यक असते. नेता हा संघटनेच्या माध्यमातूनच आपल्या मतदारसंघातील लोकांशी जोडलेला असतो,” असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक लढवणार का? यावर रितेश पांडे म्हणाले, “असे निर्णय लोकशाही पद्धतीने घेतले जातात. पक्षाचा निर्णय मला मान्य असेल.”
हेही वाचा : राहुल-अखिलेशची जोडी सात वर्षानंतर निवडणुकीच्या रणांगणात, २०१७ ची पुनरावृत्ती होणार की नवा इतिहास घडणार?
मायावती यांचा पक्षातील खासदारांवर आरोप
मायावती यांनी त्यांच्याच पक्षातील खासदारांवर केलेल्या आरोपाबद्दलही पांडे यांना विचारण्यात आले. बसपच्या खासदारांनी वेळोवेळी पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले की नाही हे पाहणे आवश्यक असल्याचे एक विधान मायावती यांनी केले होते. यावर पांडे म्हणाले, मायावतींनी माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्या निदर्शनास आणलेल्या उणिवाही मी दुरुस्त केल्या, असे ते म्हणाले. मायावती आणि बसपमधील त्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना पांडे म्हणाले, मायावती जी एक अत्यंत आदरणीय आणि अतिशय लोकप्रिय नेत्या आहेत. मी त्यांच्या निर्देशानुसार काम केले आणि लोकसभेत पक्षाचे नेतृत्व केले, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मायावती जी आणि बसपच्या कार्यकर्त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि शिकवले. मायावती जी यांना मी समाजसुधारक म्हणून पाहतो आणि पुढेही त्यांच्या विषयीचा माझा दृष्टीकोण बदलणार नाही, असे पांडे यांनी संगितले.