वाई: साताऱ्यात उमेदवारी अर्ज दाखल करायला करण्यास सुरुवात झाली असली तरी खासदार उदयनराजे भोसले अद्यापही उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची उमेदवारी महायुतीतून भाजपाने अद्यापही जाहीर केलेली नाही. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असलेले उदयनराजे भोसले दिल्लीत ठाण मांडून मुंबई फिरून आले . भाजपकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या यादया प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या मुद्यावरून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे मात्र भाजपने या नाराजीची कोणतीही दखल घेतलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून समाधान न झाल्याने त्यांनी दिल्लीत धाव घेतली. दिल्लीतील अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही उमेदवारी लांबणीवर पडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . उमेदवारी लांबल्याने त्यांच्या समर्थकांच्या नाराजीत भर पडत आहे. उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी भाजपमधून विरोध असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : ‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना सातारा आणि माढा मतदारसंघांवर दावा केला होता. मात्र माढा मतदारसंघाची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अगोदर जाहीर करण्यात आली. साताऱ्याची जागा अजित पवार गटाने हक्काने मागून घेतली आहे. त्यांचा उमेदवार तयार असतानाही उदयनराजे यांनी शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली. अजित पवार गटा कडून उदयनराजेंना घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे सांगण्यात आले. धनंजय मुंडे यांनी तसा निरोप दिला. मात्र उदयनराजे भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. अजित पवार जागा सोडायला तयार नाहीत आणि उदयनराजे ठाम असल्यामुळे भाजपची अडचण झाली आहे.

हेही वाचा : भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक

उदयनराजे यांची राज्यसभेची मुदत अजून शिल्लक आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना राज्यसभेतूनच पक्ष संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत विचार करता येईल परंतु आपण साताऱ्याच्या जागेचा हट्ट सोडावा असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन भाजपने गिरीश महाजन साताऱ्यात येऊन उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंना भेटून गेले. भाजप पक्षश्रेष्ठींच्या निरोपानंतरही उदयनराजे कमळ या चिन्हावर निवडणूक मिळविण्यासाठी अडून राहिल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नाराज आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागत आहे. उदयनराजेंना उमेदवारी भाजपाकडून मिळाली तर राष्ट्रवादी चे दोन्ही गट शशिकांत शिंदेंना मदत करतील अशी भीती भाजपाला आहे. राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळे झाले असतील तरी कार्यकर्ते मात्र एकत्रच आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भाजप कोणाची नाराजी आणि जोखीम ओढून घ्यायला तयार नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारीची प्रतीक्षा कायम आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader udayanraje bhosale awaiting for candidature for satara lok sabha constituency print politics news css