गेल्या वर्षी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही त्यांना एकही जागा जिंकता आलेली नव्हती. तेलंगणाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा असा पराभव झाल्याने भारत राष्ट्र समितीच्या अस्तित्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, आता भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मंत्री केटी रामाराव यांनी पक्ष पुन्हा एकदा पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत, असं म्हणत त्यांनी काँग्रेस आणि भाजपावर जोरदार टीकास्रही सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केटी रामाराव यांनी नुकतीच ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या एकंदरितच भावी वाटचालीवर भाष्य केलं. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरं खालीलप्रमाणे :

प्रश्न : तेलंगणातील विधानसभा निवडणुकीपूर्वी बीआरएसची राष्ट्रीय पक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा होती, त्या योजनेचं पुढे काय झालं?

उत्तर : राष्ट्रीय पातळीवर पक्षाचा विस्तार करण्याची आमची भूमिका आहे, तसा प्रयत्नही आम्ही सुरू केला होता. मात्र, आता आम्ही त्या योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. ज्यावेळी तुम्ही जनाधार गमावता तेव्हा तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज असते. अशातच तेलंगणात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. आम्ही संपूर्ण लक्ष त्या निवडणुकांवर केंद्रित केलं आहे, त्यामुळेच आम्ही महाराष्ट्रात किंवा इतर कुठेही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा आम्ही राष्ट्रीय पातळीवर पक्षाचा विस्तार करू.

हेही वाचा – गोंदियात गोपालदास अग्रवाल विरुद्ध विनोद अग्रवाल यांच्यात लक्षवेधी लढत, तिसऱ्यांदा समोरासमोर

प्रश्न : विधानसभा निवडणुकीतील पराभवापूर्वी १० वर्ष तुम्ही सत्तेत होतात. आता पुनरागमन करण्याची योजना काय?

उत्तर : तेलंगणातील जनता सूज्ञ आहे. त्यांनी आम्हाला दोन वेळा सत्ता दिली. विधानसभा निवडणुकीत आम्ही चांगलं प्रदर्शन केलं. मात्र, जनता काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडली. काँग्रेसने जनतेला खोटी आश्वासने दिली. आता तीच आश्वासने पूर्ण करण्यासाठी काँग्रेस धडपडत आहेत. गेलं वर्ष आमच्यासाठी नक्कीच कठीण होतं, पण आता आम्ही पुनरागमनासाठी सज्ज आहोत. जनताही भारत राष्ट्र समितीच्या बाजूने आहे. आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत.

प्रश्न : तेलंगणातील जनतेच्या भावना बीआरएसबरोबर आहेत, असं वाटतं का?

उत्तर : नक्कीच, तेलंगणातील जनता बीआरएसबरोबर आहे. आम्ही आमच्या पक्षाचं नाव बदललं असलं तरी आमचा झेंडा आणि नेता बदललेला नाही. राज्यातील जनता आजही केसीआर यांच्या पाठिशी उभी आहे.

प्रश्न : राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, के. कविता यांना मद्यधोरण घोटाळ्यात अटक झाल्यानंतर बीआरएसने भाजपाप्रती मवाळ भूमिका घेतली?

उत्तर : असं काहीही नाही. के. कविता यांच्या अटकेनंतर आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र, आम्ही भाजपापुढे झुकलो नाही. आम्ही या आव्हानांचा सामना केला. आता के. कविता यांना जामीन मिळाला आहे. आम्हाला अपेक्षा आहे, या प्रकरणातून लवकरच त्यांची निर्दोष मुक्तता होईल.

खरं तर भाजपाबाबत मवाळ भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही. आम्ही त्यांना पूर्वीही आक्रमकपणे प्रश्न विचारत होतो, आताही विचारतो आहे. तेलंगणात रेवंत रेड्डी यांनी अनेक आर्थिक घोटाळे करत काँग्रेसला निवडणुकीसाठी निधी मिळवून दिला आहे, पण भाजपाने त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. या मुद्द्यावरून आम्ही अनेकदा भाजपावर टीका केली आहे. कुणी मवाळ भूमिका घेतली असेल, तर ती भाजपाने काँग्रेसबाबत घेतली आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वीच तेलंगणाचे महसूल मंत्री पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी यांच्या घरावर छापा टाकला. मात्र, त्यांच्या घरात काय मिळालं, याची माहिती पुढे आलेली नाही. या भ्रष्टाचाराबाबत भाजपाचे नेते जी किशन रेड्डी आणि बंदी संजय कुमार यांनी आवाज उठवला आहे. मुळात हेच भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत.

हेही वाचा – आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?

प्रश्न : तुम्ही राहुल गांधी यांच्याबरोबर विनाकारण वैर घेतलं, असं तुम्हाला वाटतं?

उत्तर : वैयक्तिकरित्या मला विचाराल, मी कधीही कुणाशी वैर घेत नाही. माझा काँग्रेसला विरोध आहे, कारण काँग्रेस दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण करत नाही. भाजपाचीही तीच परिस्थिती आहे. भाजपासुद्धा दिलेली आश्वासने कधीच पूर्ण करत नाही, त्यामुळे आमचा दोन्ही पक्षाला विरोध आहे.

प्रश्न : दोन मोठे राष्ट्रीय पक्ष असताना त्यांच्याशी युती न करता प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय पातळीवर अस्तित्व निर्माण करणं शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?

उत्तर : जर तेलुगू चित्रपट संपूर्ण देशात लोकप्रिय होऊ शकतात तर प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पातळीवर अस्तित्व का निर्माण करू शकत नाही? आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू दिल्लीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. २०२९ मध्ये केसीआर दिल्लीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. माझ्या मते भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष त्यांचा विस्तार करतील. पुढचे दशक हे प्रादेशिक पक्षांचे असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders are cheerleaders of congress cm reventh reddy allegation by kt rama rao spb