नांदेड : भारतीय जनता पार्टीत अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांचे किंवा त्यांचे वारसदारांचे राजकीय लाड करताना पक्षातील जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांबाबत सापत्न भाव नको, अशी भूमिका मांडत एका शिष्टमंडळाने मराठवाड्यात विधानसभेच्या चार जागांवर पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राज्याचे प्रभारी भुपेंद्र यादव यांची मुंबईमध्ये भेट घेतलेल्या वरील शिष्टमंडळात नांदेडचे चैतन्यबापू देशमुख, बालाजी बच्चेवार, महेश खोमणे, डॉ. सचिन उमरेकर यांचा समावेश होता. इतर जिल्ह्यांतील जुन्या कार्यकर्त्यांकडूनही अशाच स्वरूपाची मागणी करण्यात आली आहे. वरील शिष्टमंडळाने मराठवाड्यातील नांदेड (दक्षिण), लातूर शहर, कळंब आणि फुलंब्री या चार मतदारसंघांमध्ये जुन्या-निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जावी, अशी विनंती पक्ष प्रभारींकडे केल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा-Ravinder Raina’s Asset: भाजपाचा सर्वात गरीब उमेदवार; फक्त १००० रुपये रोख एवढीच संपत्ती, आमदारकीची पेन्शनही करतात दान!

दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र भाजपामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांतील वेगवेगळ्या भागांतल्या नेत्यांनी प्रवेश केला होता. यांतील बहुसंख्य नेत्यांचे पक्षाने त्या-त्या वेळी पुनर्वसन केले. काही नेत्यांच्या मुला-मुलींनाही पक्षाने आमदार-खासदार केले; पण या मांदियाळीत पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांची संधी हुकली. या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार ठरवताना पक्ष नेतृत्वाने जुन्या-नव्यांचा समतोल साधावा, अशी अपेक्षा चैतन्यबापू देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

पक्षनेत्यांच्या भेटीसाठी मुंबईला जाण्यापूर्वी देशमुख यांनी निष्ठावंतांना निवडणुकीत संधी देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एक सविस्तर निवेदन पाठविले होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पण १९८० साली भाजपाची स्थापना झाल्यानंतर संघ-जनसंघ विचारसरणीतल्या जुन्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये तयार झाले. पण अलीकडच्या काळात जुन्यांऐवजी नव्या कार्यकर्त्यांनाच पक्षात मान मिळत गेला, याकडे आता नेत्यांचे लक्ष वेधले जात आहे.

आणखी वाचा-Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवडणुकीच्या मैदानात उतरणार? कोण आहेत संजय पांडे?

नांदेड जिल्ह्यात भोकरसह चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांतून कोणालाही उमेदवारी मागण्याचा वाव नाही. देगलूरमध्ये काँग्रेसच्या माजी आमदाराने नुकताच भाजपात प्रवेश करून आपली उमेदवारी सुरक्षित करून घेतली. लोहा मतदारसंघात माजी खासदार चिखलीकर यांनी तयारी सुरू केली आहे. आता केवळ नांदेड (द.) मतदारसंघातच उमेदवार निश्चित करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर वरील जागेवर देशमुख यांनी दावा केला आहे.

गतवर्षी मध्य प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने काही नवे व वेगळे प्रयोग केले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी परिवारातील कार्यकर्त्यांतून सक्षम असलेल्यांना उमेदवारी दिल्यास संघ-भाजपा परिवारात चांगला संदेश जाईल, असे भुपेंद्र यादव यांना सांगण्यात आले. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले व आवश्यक ते केले जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.