Diwali Milan Function Chandrapur – चंद्रपूर : भाजप नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी राजकीय दिवाळी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. चंद्रपूरचे भाजप उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांना मतदारांसमोर ‘प्रोजेक्ट’ करण्यासाठी आयोजित या स्नेहमिलन सोहळ्यात राज्याचे वनमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार निमंत्रित नव्हते. त्यामुळे या राजकीय स्नेहमिलन सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, असा राजकीय प्रवास असलेले विदर्भवादी ओबीसी नेते जीवतोडे यांनी सोमवारी जनता महाविद्यालयात दिवाळी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. चांदा शिक्षण मंडळाची अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असल्याकारणाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे डॉ.जीवतोडे यांच्यावतीने भासविण्यात आले. प्रत्यक्षात भाजप उमेदवार जोरगेवार यांना मतदारांसमोर ‘प्रोजेक्ट’ करण्यासाठी हा राजकीय सोहळा आयोजित करण्यात आल्याचे दिसून आले. सोहळ्यात भाजप नेते माजी मंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. चेतन खुटेमाटे, माजी नगराध्यक्ष मनोहर पाऊणकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, काँग्रेस सेवादल अध्यक्ष नंदू खनके, अनिल शिंदे, विजय राऊत, संभाजी ब्रिगेडचे दिलिप चौधरी यांसह भाजपतील अहीर समर्थक आणि कुणबी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा-Arvi Assembly Constituency : आर्वीत अखेर केचेंची माघार, म्हणतात माझा पक्षाला लाभच होणार

लोकसभा निवडणुकीपासून कुणबी समाज हा भाजपापासून दूरावला आहे. विधानसभा निवडणुकीत ही नाराजी दूर व्हावी व जोरगेवार यांना त्याचा फटका बसू नये यासाठीच डॉ. जीवतोडे यांनी या राजकीय दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले. मात्र, या दिवाळी स्नेहमिलनाचे निमंत्रण मुनगंटीवार यांना व त्यांच्या समर्थकांना नव्हते. मुनगंटीवार गटाला या कार्यक्रमापासून मुद्दामून दूर ठेवण्यात आले. यासंदर्भात जीवतोडे यांना विचारले असता ते म्हणाले की, मुनगंटीवार मित्र आहेत. त्यांना निमंत्रणाची गरज नाही. ते कधीही येऊ शकतात. मात्र, मुनगंटीवार यांची अनुपस्थिती अनेक चर्चांना तोंड फोडून गेली. डॉ.जीवतोडे यांनी हा दिवाळी मिलन कार्यक्रम सर्वपक्षीय आहे, असे भासविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रित केले. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण नव्हते, असेही सांगण्यात आले.

महाविकास आघाडीचे चंद्रपूर मतदार संघातील उमेदवार प्रवीण पडवेकर यांना या सोहळ्याचे निमंत्रण नव्हते. मात्र काहीं हितचिंतकांनी त्यांना येण्याची विनंती केली. त्यामुळे पडवेकर अकरा वाजताच्या सुुमारास माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यासोबत कार्यक्रमस्थळी आले. तोपर्यंत भाजप नेते तथा बहुसंख्य लोक कार्यक्रम स्थळाहून निघून गेले होते. बौद्ध समाजातून येणाऱ्या पडवेकर यांनाही मुद्दामून डावलण्यात आले, अशीही चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders diwali milan function chandrapur kishor jorgewar hansraj ahir invited sudhir mungantiwar dropped print politics news mrj