नागपूर : नागपुरात नुकताच गडकरी यांनी आयोजित केलेला खासदार औद्योगिक महोत्सव (ॲडव्हान्टेज विदर्भ) पार पडला. यानिमित्ताने विदर्भात किती गुंतवणूक येणार हा वादाचा व चर्चेचा विषय असला तरी समारोपाच्या कार्यक्रमात गडकरी आणि फडणवीस या भाजपच्या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची भाषणे सुरात सूर मिळवणारी होती. ही बाब भाजप आणि नागपूर, विदर्भाच्या विकासासाठी हा शुभसंकेत देणारी असली तरी सूर जुळण्यास दहा वर्ष का लागली हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला जाऊ लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडकरी व फडणवीस हे भाजपचे दोन्ही नेते नागपूरचे. त्यांचात मतभेद किंवा वाद असल्याचे चित्र पक्षात कधी दिसून आले नसले तरी या दोघांमध्ये सख्य असल्याचेही दिसून येत नव्हते. त्यामुळे वादाच्याच चर्चा अधिक होत होत्या. मात्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर चित्र बदलले. या दोन्ही नेत्यांचे सूर जुळल्याचे अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांवरून दिसून येते. गडकरींनी मागावे आणि फडणवीस यांनी ते द्यावे, असे चित्र सध्या तरी आहे. औद्योगिक महोत्सवाच्या समारोपाला गडकरी यांनी स्कील डेव्हलपमेन्ट ॲण्ड लजेस्टिक विद्यापीठासाठी महाराष्ट्र सरकारकडे नागपुरात शंभर एकर जागेची मागणी केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच ती देण्याची तयारी दर्शवली. यावेळी व्यासपीठावर बसलेल्या गडकरी यांनी टाळ्या वाजवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बसनिर्मिती प्रकल्प नागपूरमध्ये सुरू होणार असल्याची घोषण केली होती. त्यासाठी लागणाऱ्या वाहन चालक प्रशिक्षण इन्स्टिट्यूट सुरू करण्याची तयारी गडकरी यांनी दर्शवली. तत्पूर्वी नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंगच्या रखडलेल्या कामाबद्दल गडकरीनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने पावले उचलत विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.आतरराष्ट्रीय विमानतळ विकसाच्या बाबतीतही असेच पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचलले. ही काही उदाहरणे बोलकी ठरावी. पण हे सर्व होत आहे ते २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपला मिळालेल्या घवघवीत यश आणि फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर. तत्पूर्वी चित्र वेगळे होते. म्हणून आज हे नेते जवळ आल्याची चर्चा होत आहे.

गडकरी-फडणवीस यांच्यात अंतर वाढले होते का ?

२०१४ मध्ये गडकरी केंद्रात मंत्री आणि फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुळात विदर्भातील गडकरी समर्थक आमदारांनी गडकरी यांनाच मुख्यमंत्री करा अशी त्यावेळी जाहीर मागणी केली होती. ती मागणी काही मान्य झाली नाही पण तेंव्हापासूनच गडकरी आणि फडणवीस या दोन नेत्यांमध्ये अंतर निर्माण झाले होते. या दोन्ही नेत्यांनी परस्परांवर जाहीर टीका केली नाही पण सख्यही दिसले नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भातच कमी जागा मिळाल्या. यामागे भाजपमधलीच अंतर्गत शक्ती कारणीभूत असल्याची चर्चा त्यावेळी होती. २०१९ ते २०२४ या काळात गडकरी राज्याच्या राजकारणापासून दूरच होते. यामागेही पक्षांतर्गतच विरोधक होते, असे सांगितले जात होते. ऐवढेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही गडकरी यांचा पराभव व्हावा म्हणून भाजपचेच काही नेते काम करीत असल्याचा जाहीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. गडकरी या निवडणुकीत जिंकले. पण ही लढत त्यांच्यासाठी सोपी नव्हती, त्यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात कमी झाले. नागपूरची लढत एकास-एक व्हावी असे प्रयत्न भाजपमधूनच झाल्याची चर्चा त्यावेळी होती. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेवरही गडकरी यांनी जाहीर टीका केली होती. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आता गडकरी आणि फडणवीस यांच्यात निर्माण झालेली जवळिक जास्त महत्वाची ठरते. त्यामुळेच त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.