लक्ष्मण राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जालना : भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्वपक्षीय समितीने त्यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. परंतु या कार्यक्रमाकडे जिल्ह्यातील बहुतेक निमंत्रित पुढाऱ्यांनी आणि इतकेच नव्हे ज्येष्ठ भाजप नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह काही भाजप नेत्यांनीही पाठ फिरविल्याने आपल्याच जिल्ह्यात बबनराव लोणीकर व त्यांचे पुत्र राहुल लोणीकर एकाकी पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळेच बबनराव लोणीकर यांनी मराठवाड्यातील नेत्यांना खेकड्याची उपमा देत मनातील खदखद व्यक्त केली.

राहुल लोणीकर हे परतूरचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव. २००६ मध्ये पंचायत समिती सदस्य पदावर निवडून आल्यापासून त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. नंतर पंचायत समिती उपसभापती आणि सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि उपाध्यक्ष इत्यादी पदांवर ते निवडून आले. विद्यार्थीदशेपासून विविध आंदोलनांत सक्रिय असलेल्या राहुल लोणीकर यांची भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा… भारत जोडोयात्रेनिमित्त कोल्हापुरात अन्य पक्षांचीही मोट बांधण्याचा सतेज पाटील यांचा प्रयत्न

निमंत्रण पत्रिकेवर १६ पुढाऱ्यांची छायाचित्रे होती आणि हे सर्व उपस्थित राहणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे जनतेस कळविण्यात आले होते. यापैकी आमदार बबनराव लोणीकर, उद्योजक घनश्याम गोयल, आरपीआय (आठवले) ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, माजी आमदार शकुंतला शर्मा यांची उपस्थिती कार्यक्रमास होती. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, आमदार नारायण कुचे ही भाजपची नेतेमंडळी अनुपस्थित होती. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे उपनेते अर्जुन खोतकरही उपस्थित नव्हते. ते मुंबईत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा… निलेश राऊत : माणसांना जपणारा कार्यकर्ता

काँग्रेसचे आमदारद्वय कैलास गोरंट्याल आणि राजेश राठोड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर आणि माजी आमदार संतोष सांबरे, राष्ट्रवादीचे माजी आमदारद्वय अरविंद चव्हाण आणि चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश टोपे इत्यादी सर्वपक्षीय नेत्यांची नावे प्रमुख पाहुण्यांमध्ये असली, तरी ते सत्काराच्या कार्यक्रमास अनुपस्थित होते. आमदार बबनराव लोणीकर या वेळी बोलताना म्हणाले, खेकड्यांची गोष्ट तुम्हाला माहीत आहे. मराठवाड्यातील पुढारी एकमेकांना खेकड्यासारखे खाली ओढतात. आपणास आनंद आहे, की सत्काराच्या कार्यक्रमास पहिल्या फळीतील कुणी नेता नसला तरी दुसऱ्या फळीतील सर्व नेते उपस्थित आहेत.

हेही वाचा…‘भारत जोडो यात्रे’त श्रीजया अशोक चव्हाण राजकीय पदार्पण करणार?

हा सत्कार सर्वपक्षीय कसा होऊ शकेल?

राहुल लोणीकर यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणे ही बाब जिल्ह्यात त्यांच्या पक्षासाठी महत्त्वाची बाब नक्कीच असू शकेल. परंतु त्यासाठी सर्वपक्षीय सत्काराचे आयोजन कसे काय होऊ शकते? पक्ष संघटनेतील पद आणि अन्य वैधानिक पद यामधील अंतराची जाणीव संयोजकांना असती, तर सर्वपक्षीय सत्काराचा घाट घातला गेला नसता. त्यातच राज्यातील सत्ताबदलाच्या राजकीय वातावरणात भाजप विरोधात असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ‘मविआ’तील घटक पक्षांची नेतेमंडळी अशा सत्कारास उपस्थित राहण्याची अपेक्षाच चूक आहे. कितीही नाही म्हटले तरी हे भाजपचेच व्यासपीठ होते. त्यातही भाजपचेच प्रमुख पुढारीही अनुपस्थित होते. राहुल लोणीकर यांच्यासाठी त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने आणि जिल्ह्यासाठी हे पद मोठे असले तरी मविआतील घटक पक्षांच्या पुढाऱ्यांना या सत्कारासाठी आग्रहाने निमंत्रित करण्याचे कारण नव्हते. ते अशा जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर कसे काय येऊ शकतील?, असा सवाल जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders including raosaheb danve ignored rahul babanrao lonikars all party felicitation program print politics news asj