छत्रपती संभाजीनगर : अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कारभाराला कंटाळून भाजप कार्यकर्ते शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश करणार आहेत. भाजपचे सुरेश बनकर हे या भाजप कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत आहेत. तालुक्यातील भाजपचे दाेन- चार पदाधिकारी वगळता दुसऱ्या फळीतील सर्व कार्यकर्त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमची कोणावरही नाराजी नाही पण सत्तार हे आम्हाला नेते म्हणून नको. त्यांनी सर्वसामांन्यांची अक्षरश: पिळवणूक चालवली आहे,’ असे सुरेश बनकर ‘ लाेकसत्ता’ शी बाेलताना म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर सिल्लोड मतदारसंघात मंत्री सत्तार यांच्या विरोधात रावसाहेब दानवे यांनी आघाडी उघडली होती. जाहीर वाद झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्तेही चिडले होते. तालुक्यतील जमिनी अवैध मार्गाने मिळवणे, सर्वसामांन्यांना त्रास होईल असे वर्तन सातत्याने असल्याने सिल्लोडमध्ये सत्तार नकोसे झाले आहेत. ही बाब भाजप नेत्यांच्या कानावरही वारंवार टाकण्यात आली होती. मात्र, ‘ महायुती’ च्या तडजोडीमुळे या तक्रारीकडे कोणी लक्ष दिले नाही. सत्तार यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पदाची धुरा दिल्यानेही भाजप कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे सिल्लोड भाजपमधील दुसऱ्या फळीतील सर्व कार्यकर्ते शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश शुक्रवारी होईल असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : ‘मविआ’चे जागावाटप अंतिम टप्प्यात; २५ ते ३० जागांचा तिढा कायम; आज पुन्हा बैठक

गेल्या काही महिन्यांपासून सिल्लोडमध्ये प्रयत्न करुनही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला संघटना बांधणीमध्ये यश आले नव्हते. फूट पडल्यानंतर अन्य सर्व मतदारसंघात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या सभा किंवा मेळावे झाले होते. सिल्लोडमध्ये मात्र असे होऊ शकले नव्हते. त्यामुळे भाजपमधून कार्यकर्ते आल्याने ठाकरे गटाचे बळ वाढणार आहे. ‘ कुत्रा’ चिन्ह दिले तरीही ‘ सिल्लोड’ मधून मीच निवडून येईन असे अब्दुल सत्तार यांचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जाहीरपणे सांगितले होते. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मात्र. सत्तार यांचा संपर्क सर्व समाजात आहे. पालकमंत्री होण्यापूर्वी सत्तार यांनीही आपला शिवसेनेबरोबर प्रासंगिक करार असल्याचे वक्तव्य केले होते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर आता भाजपची दुसरी फळी पक्षांतर करणार आहे.

हेही वाचा : “लॉरेन्स बिश्नोई व केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी शिजतंय”, पंजाब काँग्रेसचा गंभीर आरोप!

सिल्लोड मतदारसंघात सत्तार यांना विरोधक सापडत नसल्याने शिवसेना ( ठाकरे ) गटातील नेतेही हैराण होते. अगदी मेळावा घेण्यासाठी कार्यकर्ते गोळा करतानाही त्यांची दमछाक होत होती. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या मतदारसंघात सत्तार यांना कोणी राजकीय विरोधक मिळतो का, याची चाचपणी केली होती. मात्र, आता अचानक भाजपचा एक मोठा गट येणार असल्याने सिल्लोड मतदारसंघातील लढत चुरशी होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.