West Bengal Loksabha Election आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पाचवी उमेदवार यादी जाहीर केली. पाचव्या यादीत एका शाही नावाचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघात शाही घराण्यातील राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे प्रतिनिधित्व आहे. त्यामुळे कृष्णनगर मतदारसंघात मोईत्रा विरुद्ध राजमाता अशी हाय प्रोफाइल लढत पाहायला मिळणार आहे.
अठराव्या शतकापासून कृष्णनगर राजवाड्याचा गौरवशाली इतिहास राहिला आहे. ६३ वर्षीय अमृता रॉय याच शाही कुटुंबातील सदस्य आहेत. कोलकात्यातील पॉश ला मार्टिनियर स्कूल फॉर गर्ल्स आणि लॉरेटो कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अमृता रॉय यांची प्रतिमा ‘मोहराज पोरीबार (महाराजांचे कुटुंब)’ प्रतिनिधी आणि ‘घोरेर बौ (आदर्श गृहिणी)’ अशी आहे.
पंतप्रधानांचा रॉय यांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः रॉय यांना फोन केला होता. हे संभाषण भाजपाने सर्वत्र प्रसारित केले होते. “पश्चिम बंगालमधील गरीब लोकांकडून लुटलेले पैसे आणि अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेले पैसे लोकांना परत मिळावेत यासाठी आपण काम करीत आहोत,” असे पंतप्रधान म्हणाले. फोनवरील हे संभाषण ज्या दिवशी मोईत्रा यांना कथित फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट उल्लंघन प्रकरणात आणखी एक ईडी समन्स प्राप्त झाले, त्याच दिवशी प्रसारित करण्यात आले. याच प्रकरणात गेल्या वर्षी लोकसभेतून मोईत्रा यांना निलंबित करण्यात आले होते. त्यासह राज्याच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस नेत्यांचा कथित भ्रष्टाचार हा पश्चिम बंगालमधील भाजपाचा मुख्य निवडणूक मुद्दा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोईत्रा यांनी भाजपाच्या कल्याण चौबे यांचा ६३ हजार मतांनी पराभव करीत नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर ही जागा जिंकली होती.
कोण आहेत अमृता रॉय?
रॉय यांचा विवाह कृष्णनगर राजघराण्यात झाला. त्यांचे पती सौमिशचंद्र रॉय हे राजा कृष्णचंद्र रॉय यांचे वंशज आहेत. अमृता रॉय यांना ‘राजबरीर राजमाता किंवा कृष्णनगरच्या रॉयल पॅलेसची राणी आई’, असेही संबोधतात. त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्या मूळच्या हुगळी जिल्ह्यातील चंदननगरच्या आहेत. रॉय या स्वतः एका प्रतिष्ठित कुटुंबातून आल्या आहेत. “माझ्या कुटुंबातील अनेक सदस्य वकील आहेत. माझे आजोबा सुधांगशु शेखर मुखर्जी हे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. माझे वडील किशोर प्रसाद मुखर्जी आणि काका शक्तिनाथ मुखर्जी हेदेखील कोलकात्यातील प्रसिद्ध वकील आहेत,” असे त्यांनी सांगितले.
लग्नापूर्वी रॉय स्वतः फॅशन डिझायनर होत्या. “मी राजकारणात प्रवेश करीन, असे मला कधीच वाटले नव्हते. पण, ज्यांचा मी खूप आदर करते, त्यांनी हा प्रस्ताव दिला आणि मी तो स्वीकारला. नादिया आणि बंगालच्या इतिहासात राजा कृष्णचंद्राच्या योगदानाबद्दल सर्वांना माहीत आहे. प्रत्येक जण आमच्या कुटुंबाला ओळखतो आणि मला विश्वास आहे की, कृष्णनगरचे लोक मला आशीर्वाद देतील,” असे त्यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले
कृष्णनगरचा इतिहास
कृष्णनगर राजघराण्याचा अभ्यास करणारे इतिहासकार स्वदेश रॉय म्हणतात, “अनेक लोक म्हणतात की, कृष्णनगरचे नाव महाराजा कृष्णचंद्र रॉय यांच्या नावावरून दिले गेले आहे; पण ते खरे नाही. कृष्णनगरचे जुने नाव रेउई होते; जे गोपी जातीतील वैष्णवांचे होते (नादिया हे बंगालमधील वैष्णव चळवळीचे केंद्र होते). रेउईमध्ये श्रीकृष्णभक्तांची संख्या जास्त असल्याने, त्याच्या आजूबाजूचे शहर कृष्णनगर म्हणून ओळखले जाऊ लागले.
अठराव्या शतकात राज्य करणारे महाराज कृष्णचंद्र रॉय जागरूक राज्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. बंगालची संस्कृती आणि वारसा जपण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. १० दिवसीय दुर्गापूजा उत्सव आता बंगाली कॅलेंडरमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. तसेच कृष्णनगरचा दुसरा सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे जगद्धात्री पूजा. याचे श्रेय महाराज कृष्णचंद्र रॉय यांनाच जाते. त्यांनी बंगाली भाषेच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा असणारे अन्नदामंगल हे महाकाव्य लिहिणाऱ्या भरतचंद्र रे यांना संरक्षण दिले आणि संगीतकार रामप्रसाद सेन यांचेही समर्थन केले.
कौटुंबिक वारस्याचा बराचसा भाग आता तृणमूलच्या ताब्यात आहे. अनेक राजघराण्यांप्रमाणेच कृष्णनगर घराणेदेखील नवाब सिराज उद-दौलाच्या अधिपत्याखाली होते. जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची नजर पूर्वेकडे गेली तेव्हा कृष्णचंद्र यांनी जगतसेठ बंधू, मीर जाफर, ओमी चंद, राय दुर्लभ आणि इतरांना एकत्र आणून जनरल रॉबर्ट क्लाइव्ह यांच्याशी हातमिळवणी केली. १८५७ च्या प्रसिद्ध युद्धात त्यांनी सिराज उद-दौलाचा पराभव केला. सिराज-उद-दौलाचा पराभव हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला मोठा विजय होता. .
त्यानंतरच्या काळात कृष्णचंद्र यांचे इंग्रजांशी आणि विशेषत: क्लाइव्ह यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले. क्लाइव्ह पुढे बंगालचे गव्हर्नर झाले. १७६० च्या दशकात बंगालचा नवाब मीर कासिमने राजांना फासावर चढविण्याचा आदेश दिला. तेव्हा क्लाइव्ह यांनी हा आदेश खोडून काढला. इतकेच नाही, तर त्यांनी कृष्णचंद्र यांना पाच ब्रिटिश तोफा, ‘महाराजा’ ही पदवी आणि कृष्णनगरची जमीनदारीही भेट स्वरूपात दिली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कुटुंबातील सदस्याला भाजपाने उमेदवारी दिल्यामुळे तृणमूलची मजबूत जागा भेदण्यास भाजपाला फायदा होईल, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तृणमूलचे आरोप
तृणमूलने बुधवारी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, “१७५७ : महाराजा कृष्णचंद्र यांनी मीर जाफर, जगत सेठ व उमी चंद यांच्यासह कट रचला आणि स्वतःला ब्रिटीशांना विकले. २०२४ मध्ये पुन्हा त्यांच्याच कुटुंबातील ‘राजमाता’ अमृता रॉय यांनी बंगालच्या जनतेला फसविण्याच्या करारावर शिक्कामोर्तब केले आहे आणि बंगालविरोधी भाजपाला स्वीकारले आहे. चेहरे बदलले असतील तरी तेव्हाही ते विश्वासार्ह नव्हते आणि आताही असणार नाहीत.“
हेही वाचा : काँग्रेसचे १६ हजार नेते-कार्यकर्ते भाजपात! काय चाललंय मध्य प्रदेशात?
भाजपानेही यावर लगेच प्रत्युत्तर दिले. महाराजांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी मोठे योगदान दिले, असे पक्षाने म्हटले आहे. “ब्रिटिश आणि सिराज-उद-दौला या दोघांविरुद्ध महराजांनी जे केले, ते त्यावेळी केले नसते, तर आज आपण हिंदू नसतो,” असे रॉय म्हणाल्या.
महुआ मोईत्रा यांनी त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आणि गुरुवारपासून प्रचार सुरू करणार असल्याचे सांगितले. “मी दुपारी कृष्णनगर मतदारसंघात प्रचार करणार आहे,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.