काही दिवसांपूर्वी ओटीटी माध्यमात प्रदर्शित झालेल्या ‘महाराणी’ वेबसीरिजने चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. या वेबसीरिजचं कथानक बिहारमधल्या राजकारणावर बेतलं होतं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरीखुरी ‘महाराणी’ मतदारांच्या भेटीला येत आहे. मतदारांनी कौल दिल्यास या महाराणी लोकसभेत त्रिपुराचं प्रतिनिधित्व करताना दिसू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारी (१३ मार्च) दुसरी यादी जाहीर केली. या यादीतील महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्रिपुरा या राज्यांतल्या ७२ उमेदवारांच्या नावांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. त्याचबरोबर काही नवीन चेहर्‍यांनाही संधी देण्यात आली आहे. पूर्व त्रिपुरा मतदारसंघातून भाजपाने त्रिपुराच्या महाराणी कृती सिंह देबबर्मा यांना उमेदवारी दिली आहे. त्या राजवंशातील राजकारणी व टिपरा मोथा पार्टीचे संस्थापक प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांच्या भगिनी आहेत.

पूर्व त्रिपुरा ही जागा अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव आहे. या जागेच्या विद्यमान भाजपा खासदार रेबती त्रिपुरा आहेत. रेबती त्रिपुरा यांच्या जागेवर भाजपाने कृती यांना उमेदवारी दिली आहे. अलीकडेच टिपरा मोथा पार्टी त्रिपुरातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाली; ज्यानंतर भाजपाने कृती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्या पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.

भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार

राज्यातील आदिवासींच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार व टिपरा मोथा पार्टी यांच्यात त्रिपक्षीय करार झाला आहे. या करारानंतरच प्रद्योत यांच्या भगिनींना भाजपाने लोकसभेचे तिकीट दिले आहे. या करारामुळे प्रद्योत यांनी २७ फेब्रुवारीपासून सुरू केलेले आमरण उपोषण संपले आणि प्रमुख विरोधी टिपरा मोथा पार्टी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाली.

कृती सिंह देबबर्मा यांना उमेदवारी मिळणार, याची पूर्वकल्पना सर्वांना होती. कारण- प्रद्योत यांनी वारंवार असे सांगितले होते की, त्रिपक्षीय करारानुसार पूर्व त्रिपुरा जागेवरून आपले लोक दिल्लीला जातील. त्यांनी असेही म्हटले आहे की, योग्य व्यक्ती असल्यास पक्षाच्या चिन्हाचा फारसा फरक पडत नाही. भाजपाच्या या निर्णयानंतर टिपरा मोथा पार्टीच्या अधिकृत सोशल मीडियावर म्हटले आहे, “ऐतिहासिक टिपरा कराराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणखी एक मैलाचा दगड. त्रिपुरा पूर्व संसदीय मतदारसंघातून महाराणी कृती सिंह देबबर्मा यांना टिपरा मोथा पार्टी आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) यांचे संयुक्त उमेदवार घोषित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.”

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना, प्रद्योत यांनी भाजपाच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, “राज्यातील आदिवासी समुदायाच्या जवळची व्यक्ती (कृती) संसदेत गेल्यावर त्रिपक्षीय करार पुढे नेण्यासाठी काम करील.” २०१९ च्या निवडणुकीत भाजपाच्या रेबती त्रिपुरा यांनी प्रद्योत आणि कृती यांची बहीण काँग्रेसच्या प्रज्ञा देबबर्मा यांचा दोन लाख मतांनी पराभव केला होता. त्याआधी सीपीएमचे जितेंद्र चौधरी यांनी या जागेवर प्रतिनिधित्व केले होते. कृती सिंह देबबर्मा या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. विशेष म्हणजे २०१९ मध्ये स्थापन झालेल्या टिपरा मोथा पार्टीने अद्याप लोकसभा निवडणूक लढविलेली नाही.

कृती सिंग देबबर्मा कोण आहेत?

कृती सिंग देबबर्मा पूर्वीच्या माणिक्य राजघराण्यातील राजकुमारी आहेत. तसेच त्या किरीट बिक्रम किशोर माणिक्य यांची ही धाकटी कन्या आहे. त्या विविध पर्यावरणीय विषयांवर काम करतात. ईशान्येकडील पर्यावरणीय समस्या, शाश्वत विकास, संरक्षण आणि याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी त्या अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत काम करीत आहेत.

त्यासह त्या मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात जल व्यवस्थापन, पाणलोट विकास आणि ग्रामीण विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठीदेखील काम करीत आहेत. सध्या त्या छत्तीसगडमधील कावर्धा पॅलेसचे कामकाज पाहतात. छत्तीसगडच्या कावर्धा राजघराण्यातील योगेश्वर राज सिंह यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे.

ऐतिहासिक त्रिपक्षीय करार काय आहे?

त्रिपुरातील आदिवासी समुदायाच्या समस्यांचा शोध आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. या करारात एक संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे; ज्यात आदिवासींचे विविध मुद्दे वेळेत सुटावेत यासाठी कार्य केले जाईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल.

हेही वाचा : काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं! पहिल्या समन्वय बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

त्रिपुरातील राजकीय इतिहासात आदिवासी समुदाय कायमच महत्त्वाचा राहिला आहे. राज्यातील ३७ लाख लोकसंख्येपैकी एक-तृतीयांश आदिवासी आहेत; ज्यातील बहुसंख्य लोक टिपराशासित त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषद (टीटीएएडीसी) प्रदेशात राहतात. त्रिपुरातील ६० पैकी २० विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. आजवर ज्यांना आदिवासींचा पाठिंबा मिळाला आहे, त्या पक्षांनी त्रिपुरामध्ये आपले सरकार स्थापन केले आहे. टिपरा मोथा पार्टी एनडीएमध्ये सामील झाल्याने राज्यात भाजपाच्या विजयाची शक्यता वाढली आहे.