लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १११ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीत भाजपाने नवख्या चेहर्यांना संधी दिली आहे. या यादीत काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले प्रसिद्ध उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या नावाचाही समावेश आहे. जिंदाल पँथर पोलो टीममधील त्यांचे सहकारी त्यांचे वर्णन ‘कॅप्टन कूल’, असे करतात. १० वर्षांच्या विश्रांतीनंतर जिंदाल निवडणुकीच्या राजकारणात पुनरागमन करीत आहेत. नवीन जिंदाल २००४ ते २०१४ या कालावधीत हरियाणाच्या कुरुक्षेत्रातून काँग्रेसचे खासदार राहिले आहेत. त्यांनी सत्ताधारी भाजपामध्ये प्रवेश करताच, पक्षाने त्यांना कुरुक्षेत्र मतदारसंघातूनच लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत नवीन जिंदाल?
जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल)चे अध्यक्ष नवीन जिंदाल हे दिवंगत ओ. पी. जिंदाल यांच्या चार मुलांपैकी सर्वांत धाकटे आहेत. १९९२ मध्ये त्यांचे नाव चर्चेत आले होते. तेव्हा त्यांनी नुकतीच टेक्सास विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली होती आणि ‘स्टुडंट लीडर ऑफ द इयर’चा पुरस्कारही जिंकला होता. त्याच वर्षी स्थानिक उपायुक्तांनी छत्तीसगडमधील रायगड येथील नवीन जिंदाल यांच्या कारखान्यावर फडकणारा तिरंगा हटविण्यास सांगितले होते. त्यावर नवीन यांनी आक्षेप घेतला होता. या विषयाची सर्वदूर चर्चा झाली होती.
विशेष म्हणजे, नवीन यांनी त्या विषयाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रत्येक भारतीय नागरिकाला वर्षातील सर्व दिवस तिरंगा फडकवता यावा यासाठी ध्वजसंहितेत बदल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. अखेर २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रध्वज फडकवणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचा निर्णय देत, त्यांच्या बाजूने निकाल दिला.
वडिलांच्या पावलावर पाऊल
१९९१ च्या विधानसभा निवडणुकीत नवीन यांच्या वडिलांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. तेव्हापासूनच जिंदाल कुटुंब काँग्रेस पक्षाशी जोडले गेले. ओ. पी. जिंदाल यांच्या निधनानंतर पत्नी सावित्री यांनीही राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले.
१९९६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री भजनलाल आणि ओ. पी. जिंदाल यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे ओ. पी. जिंदाल यांनी माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या नेतृत्वाखालील हरियाणा विकास पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. हरियाणा विकास पक्षाच्या तिकिटावर त्यांनी कुरुक्षेत्र मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला. पण, २००० मध्ये ते पुन्हा जुन्या पक्षात परतले आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुलगा नवीन यांना कुरुक्षेत्रातून राजकारणात आणण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः हिसारमधून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. एक वर्षानंतर बन्सीलाल यांचा मुलगा सुरेंद्र सिंह यांच्यासह सहारणपूर येथे हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते पूर्णपणे राजकारणाकडे वळले.
नवीन जिंदाल २००४ व २००८ ला लोकसभेवर निवडून गेले. मात्र, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला. कुरुक्षेत्रमधून नवीन आणि हिसार मतदारसंघातून त्यांची आई सावित्री या दोघांनाही निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. मुख्य म्हणजे २०१४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात कथित कोळसावाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. भाजपाने याचा वापर आपल्या प्रचारात केला; ज्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. भाजपा उमेदवाराने त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नाही.
अब्जाधीश कुटुंब
राजकारणाचा त्यांच्या कौटुंबिक व्यवसायावर परिणाम झाला नाही. २०२३ मध्ये ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, भारतातील सर्वांत श्रीमंत महिला सावित्री यांच्या संपत्तीमध्ये अतुलनीय वाढ झाली. २००९ मध्ये नवीनने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सोनिपत येथे ओ. पी. जिंदाल जागतिक विद्यापीठाची स्थापना केली. नवीन यांच्या ‘अल्मा मॅटर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास’ने देणग्यांची पोचपावती म्हणून २०११ मध्ये विद्यापीठाचे नाव ‘नवीन जिंदाल स्कूल ऑफ मॅनेजमेंट’ केले.
नवीन यांना पोलो खेळण्यात रस आहे. त्यांना आपल्या पोलो टीम जिंदाल पँथरचे नेतृत्व करायला आवडते. गेल्या वर्षी त्यांनी अर्जुन पुरस्कारविजेत्या सिमरन शेरगिलचा समावेश असलेल्या आपल्या संघाला ‘इंडियन मास्टर्स पोलो चॅम्पियनशिप’मध्ये विजय मिळवून दिला होता. “माझ्यासाठी पोलो हा खेळ नाही, तर एक जीवनपद्धती आहे; जी तुम्हाला एकीचे बळ आणि शिस्त शिकवते,” असे ते कायम सांगत आले आहेत. ते एक प्राणीप्रेमी म्हणूनदेखील ओळखले जातात. ते त्यांच्या १३ वर्षांच्या श्वान चेस्टरला सर्वोत्तम मित्र मानतात. त्यांच्या कारखान्यामध्ये दरवर्षी ‘पॉसम डे’ साजरा केला जातो.
हेही वाचा : ३३ वर्षांनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लोकसभा निवडणूक लढवणार; गमावलेला गड काँग्रेसला परत मिळणार का?
नेमबाजीतील नवोदितांना प्रोत्साहन
लहानपणी नवीन यांनी नेमबाजीतही राष्ट्रीय विक्रम केला होता. ते नेमबाजीतील नवोदितांनाही प्रोत्साहन देतात आणि सहकार्य करतात. २०२२ मध्ये त्यांच्या सहकार्याने मैराज अहमद खान याने दक्षिण कोरिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. नवीन यांच्या पत्नी शल्लू या एक कुशल कुचिपुडी नृत्यांगना आहेत. त्या लुधियानाच्या ओसवाल कुटुंबातील आहेत. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नवीन यांनी आगामी निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढविण्याची तयारी केली आहे. भाजपानेच एकेकाळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्याविरुद्ध कोलगेट प्रकरण प्रलंबित आहे. या प्रकरणाचे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.