Lok Sabha Election 2024 Result Updates: भारतीय जनता पक्षाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६३ जागांचा फटका बसला. २०१९मधील ३०३ जागांवरून भाजपाची थेट २४० जागांपर्यंत घसरण झाली. आता भाजपाकडून नेमका कुठे पराभव झाला आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, यावर विचारमंथन केलं जात आहे. या सगळ्याची सुरुवात कदाचित पक्षाकडून अयोध्या आणि खुद्द मोदींचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीपासून व्हायला हवी, असं आता बोललं जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला समाजवादी पक्षानं धोबीपछाड दिल्याचं चित्र निकालात दिसून आलं आहे. भाजपाच्या कमी झालेल्या ६३ जागांपैकी १४ जागा फक्त अयोध्या व वाराणसीच्या आसपासच्या प्रभावक्षेत्रातल्या आहेत!

सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्येबाबतचा ऐतिहासिक निकाल आणि राम मंदिराची उभारणी या मुद्द्यांवर देशभरात भाजपाच्या नेत्यांनी व उमेदवारांनी प्रचारादरम्यान अनेकदा भाष्य केली. पण त्याच अयोध्येत भाजपा उमेदवाराचा पराभव झाला. शिवाय, फक्त अयोध्याच नसून या भागातील ९ मतदारसंघांपैकी तब्बल ५ मतदारसंघांमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे वाराणसीत मोदींचा मोठा विजय झाला असला, तरी त्याच्या आसपासच्या १२ पैकी तब्बल ९ मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आहेत.

अयोध्येनं भाजपाला नाकारलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षामुळे अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्याचे दावे अनेक भाजपा नेत्यांनी केले. या भागातील प्रचारात हा एक प्रमुख मुद्दा होता. त्यामुळे अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येते, त्या फैझाबाद मतदारसंघात भाजपाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, समाजवादी पक्षानं उभे केलेले दलित समाजातील उमेदवार अवधेश प्रसाद सिंह यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व ठेवणाऱ्या भाजपाकडून यंदा हा मतदारसंघ गेला. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

अयोध्येच्या प्रभावक्षेत्रात भाजपावर ५ पराभवांचा नामुष्की!

पण फक्त अयोध्याच नसून, या प्रभावक्षेत्रातील जवळपास ९ मतदारसंघांपैकी ५ ठिकाणी भाजपाचे उमेदवार पराभूत झाले. वरुण गाधींना उमेदवारी नाकारून त्यांच्या आई मनेका गांधींना सुलतानपूरमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. गोरखपूरहून आयात केलेले सपाचे उमेदवार राम भुवाल निशाद यांनी मनेका गांधींचा पराभव केला. बस्ती लोकसभा मतदारसंघात तर भाजपाचे दोन टर्म खासदार हरिष द्विवेदी यांचा सपाच्या उमेदवाराने पराभव केला.

सत्तास्थापनेचं ठरलं, आता मंत्रीपदांसाठी चढाओढ; १२ खासदारांच्या संख्याबळावर नितीश कुमार तीन खात्यांसाठी आग्रही!

राम मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला आंबेडकर नगर आणि श्रवस्थी या दोन मतदारसंघांमध्ये विजयाची आशा होती. खुद्द राम मंदिर उभारणीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांचे पुत्र साकेत मिश्रा श्रवस्थीहून उभे होते. पण या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपाचा पराभव झाला. या प्रदेशातील कैसरगंज, गोंडा, दोमरियागंज आणि बाहरीच या मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार विजयी झाले. कैसरंगमधून वादग्रस्त भाजपा नेते ब्रिजभूषण सिंह यांचे पुत्र करण सिंह उभे होते.

वाराणसी आली, पण इतर मतदारसंघांचं काय?

अयोध्येप्रमाणेच वाराणसी प्रभावक्षेत्रातही भाजपाला मोठं नुकसान झालं. भाजपा व मित्रपक्ष अपना दल-सोनेलाल यांना या भागातील १२ पैकी तब्बल ९ मतदारसंघांमध्ये पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. २०१९मध्ये यातील ७ मतदारसंघांमध्ये भाजपा-अपना दल आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते.

यंदा मात्र आघाडीला फक्त तीन ठिकाणी विजय मिळवता आला. त्यातही अपना दल-सोनेलाल पक्षाची एक जागा आहे. त्यामुळे भाजपाला या भागात फक्त दोन जागा जिंकता आल्या आहेत. चंडौली मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचा यावेळी पराभव झाला आहे. २०१४ आणि २०१९ असे सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपानं जिंकलेले रॉबर्टकंज आणि बलिया हे मतदारसंघ यंदा समाजवादी पक्षाच्या ताब्यात गेले आहेत.

निलेश लंकेंच्या स्वीय सहाय्यकावर जीवघेणा हल्ला, पारनेरमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात

या भागात भाजपानं जिंकलेल्या दोन जागांपैकी एक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाराणसी ही जागा आहे. दुसरीकडे भदोहीतून विनोद कुमार बिंड यांनी तृणमूलच्या ललितेश पती त्रिपाठी यांचा पराभव केला. तर मिर्झापूरमधून सलग तिसऱ्यांदा अपना दल-सोनेलाल पक्षाच्या उमेदवार व केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल निवडून आल्या आहेत.