पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये जिथे जिथे प्रचार केला, त्या त्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटक सरकारवर टीका केल्यानंतर सिद्धरामय्या यांनी त्याचे उत्तर दिले. “मोदी यांचे भाषण असत्यावर आधारित पूर्णपणे राजकीय भाषण होते. त्यांनी राजकीय आरोप केले. कर्नाटकाच्या निकालामुळे ते निराश आहेत. ते ४८ वेळा कर्नाटकात आले. जिथे जिथे ते गेले, तिथे भाजपाचा पराभव झाला. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी रोड शो आणि जाहीर सभा घेतल्या, तिथल्या जागा भाजपाला वाचवता आलेल्या नाहीत”, असा पलटवार सिद्धरामय्या यांनी माध्यमांशी बोलताना केला.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी मध्य प्रदेशमध्ये जाहीर सभेत बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकमधील सरकारवर टीका केली. “कर्नाटकमध्ये विकास ठप्प झाला आहे. मुख्यमंत्री (सिद्धरामय्या) किती काळ सरकारचे प्रमुख राहतील याची खात्री नाही. ज्या ज्या राज्यात चुकूनमाकून काँग्रेसचे सरकार स्थापन होते, तिथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात राज्य लुटण्याची स्पर्धा लागते. कर्नाटकातूनही अशाच प्रकारच्या बातम्या येत आहेत”, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
माझ्या देशाच्या पंतप्रधानांकडून अशा प्रकारच्या विधानाची मला अपेक्षा नव्हती. पंतप्रधानांनी अशाप्रकारचे विधान करणे त्यांच्या पदासाठी अशोभनीय आहे, असे प्रत्युत्तर सिद्धरामय्या यांनी दिले. त्यांच्याकडे काही पुरावे, दस्तऐवज असतील तर त्यांनी अशाप्रकारचे आरोप करावेत. पण, पंतप्रधान या नात्याने त्यांनी खोटे बोलू नये. केंद्र सरकारकडे अनेक तपास यंत्रणा आहेत, काही चुकीचे होत असेल तर त्यांनी त्याची चौकशी केली पाहिजे, याकडेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लक्ष वेधले.
आणखी वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लिहिलेल्या आक्षेपार्ह लिखाणाचा मी निषेध करतो : आमदार रोहित पवार
सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, कर्नाटकमधील निकालामुळे भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व कमालीचे निराश झालेले आहे. त्यामुळेच त्यांनी अद्याप विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची निवड केलेली नाही.