नगरः भाजप मुंडे-महाजनांचा पक्ष राहिला नाही, तो खूप बदलला आहे. पक्षातील निष्ठावंतांना डावलले जाते आहे, किमान पक्षाची संघटना तरी निष्ठावंतांकडे असावी, अन्यथा पक्षाच्या व्होट बँकेमध्ये अस्वस्थता वाढेल, बाहेरील नेत्यांना पक्षात घेण्यास हरकत नाही, मात्र निष्ठावंतांना डावलले जाणार नाही याची दक्षता पक्षश्रेष्ठींनी घ्यावी, सध्या पक्षाच्या प्रत्येक बैठकीत व कार्यक्रमात निष्ठावंतांचा अपमान होतो, कोणत्याही कार्यक्रमाच्या नियोजनात विश्वासात घेतले जात नाही, पक्षाचे काम व्हाॅट्सअ‍ॅपवर सुरू आहे, कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्यातील संवाद संपला आहे, अनेक पदाधिकारी ठेकेदारी कामात व्यस्त आहेत, अशी तोफ डागत स्वतःला निष्ठावंत म्हणवून घेणाऱ्या, पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरुद्ध दंड थोपटले आहेत.

भाजप पक्षश्रेष्ठींकडून मिळालेल्या पाठबळाच्या आधारावरच महसूल मंत्री विखे यांचे पक्षातील महत्त्व वाढलेले असतानाच दुसरीकडे पक्षाचा स्थानिक पातळीवरचा आधार असलेल्या निष्ठावंत, जुन्या पदाधिकाऱ्यांनी विखे पिता-पुत्राविरुद्ध स्वतंत्र बैठक घेत एल्गार पुकारला. आता या निष्ठावंतांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे. पक्षाच्या तीन जिल्हाध्यक्षांची (शहर, नगर दक्षिण व नगर उत्तर) नवीन निवड प्रतीक्षेत असतानाच निष्ठावंतांनी ही खदखद व्यक्त केली आहे. जिल्हाध्यक्षांची निवड हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेवर वर्चस्व कोणाचे, विखे गटाचे की निष्टावंतांचे? या वादातून या नियुक्त्या लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Vinayak Raut, BJP , former MP Vinayak Raut,
भाजपचे मताधिक्य गुणवत्तेवर नसून चोरी करून, माजी खासदार विनायक राऊत यांची टीका

हेही वाचा – ‘ओबीसी’वरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा

सध्या जिल्ह्यात खासदार, आमदार, जिल्हा बँक अध्यक्षपद अशी प्रमुख पदे पक्षाबाहेरून आलेल्यांच्या पदरात पडलेली आहेत. राम शिंदे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली तरी राज्यात सत्ता मिळूनही पक्षातील निष्ठावंत लाभाच्या पदापासून उपेक्षितच राहिले आहेत. महामंडळे, विविध सरकारी समित्यांवरील नियुक्त्या होण्याची चिन्हे दृष्टीक्षेपात नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लांबणीवर पडलेल्या, जिल्ह्यातील आपली कामेही मार्गी लागत नाहीत, जे मिळते आहे तेही विखे गटाकडे जाते आहे, यातून पक्षातील अस्वस्थता वाढीस लागली आहे.

पक्ष संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलत विखे पिता-पुत्रांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला. त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या पराभवाला विखेच जबाबदार असल्याची तक्रार त्यावेळी फडणवीस यांच्याकडे प्रमुख पराभुतांनी केली होती. त्याची दखल घेतली गेली नाही. या तक्रारीनंतरही फडणवीस यांच्याकडून विखे यांना पाठबळ मिळत गेलेले आहेच. मंत्री विखे यांनी जिल्हा बँकेत सत्ताबदल घडवल्यानंतर तर महत्त्व अधिकच वाढले. त्यानंतर माजी मंत्री राम शिंदे व विखे पिता-पुत्रात खटके उडाले. आमदार शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींचेही लक्ष वेधले. त्यावरही पक्षाकडून अद्याप उपायोजना करण्यात आलेली नाही. असे असतानाच आता पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी विखे पितापुत्रांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले आहे. विखे यांची भाजपमधील आजवरची कार्यपद्धत पाहिली तर या निष्ठावंतांच्या आवाजाला पक्षश्रेष्ठींकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावरच पक्षाचे जिल्ह्यातील भवितव्य अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा – नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार की बदलणार ?

विखे पूर्वी काँग्रेसमध्ये असताना, शिवसेनेत गेल्यानंतरही आणि आता भाजपमध्ये आल्यानंतरही, ते विरूद्ध पक्षातील इतर सर्व असेच चित्र कायम राहिले. युती सरकारच्या काळात विखे कृषिमंत्री असताना शिवसेनेतील त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांनीही अशाच त्यांच्याविरुद्ध बैठका घेत श्रेष्ठींकडे तक्रारी केल्या होत्या. काँग्रेसमध्येही तुल्यबळ अशा थोरात गटाशी विखे यांचा कायमच संघर्ष राहिला. थोरात-विखे गटाचे अनेक वाद कायमच दिल्ली दरबारी पोहोचत असत. त्यामुळे ‘पार्टी विथ डिफरंस’ अशी प्रौढी मिरवणाऱ्या भाजपामध्ये विखे आल्यानंतरही वेगळे काही घडते आहे, असे नाही.

भाजपमध्ये संघटनात्मकदृष्ट्या नगर जिल्ह्याचे प्रभारीपद उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच आहे. प्रभारी असले तरी फडणवीस गेल्या वर्षभरात जिल्ह्यात एकदाच आले. पक्षातील निष्ठावंतच असंतोष व्यक्त करू लागल्याने फडणवीस हा प्रश्न कसा हाताळतात याकडे लक्ष राहणार आहे. निष्ठावंतांच्या बैठकीस प्रामुख्याने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जुने पदाधिकारी उपस्थित होते. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सुजय विखे करतात. ते व नगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील राजकीय मैत्रीतून पक्षात असंतोष वाढलेला आहेच. मात्र त्याची फिकीर विखे यांनी कधीच केली नाही. निष्ठावंतांकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम कसबा (पुणे) व कर्नाटकमध्ये दिसला, या दोन्ही निवडणुकांतून पक्षाचे मूळ मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्यानेच तेथे पक्षाचा पराभव झाला, असे सूचक इशारेही निष्ठावंतांनी बैठकीत दिले आहेत. त्यामुळेच फडणवीस हा प्रश्न कसा हाताळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader