Premium

घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष

भाजपने गेल्या दहा वर्षात पक्षवाढीसाठी दरवाजे सताड उघडल्याने जुन्यापेक्षा नव्या कार्यकर्त्यांची व नेत्यांची गर्दी वाढली असून जुने आणि बाहेरचे अशी वर्णव्यवस्था आहे.

BJP loyalists displeased
घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकीची उमेदवारी आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीमध्ये निष्ठावंत भाजप नेत्यांवर अन्याय करून बाहेरून आलेल्या नेत्यांचे लाड होत असल्याने आणि घराणेशाही वाढत असल्याने भाजपमधील जुन्या व निष्ठावंत नेत्यांमध्ये असंतोष आहे. भाजपने गेल्या दहा वर्षात पक्षवाढीसाठी दरवाजे सताड उघडल्याने जुन्यापेक्षा नव्या कार्यकर्त्यांची व नेत्यांची गर्दी वाढली असून जुने आणि बाहेरचे अशी वर्णव्यवस्था आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनीच अन्य पक्षातील नेत्यांना प्रवेश देताना आणि उमेदवारांची निवड करताना नीतीमूल्ये, पक्षनिष्ठा आणि भ्रष्टाचार आदी मूल्यांना तिलांजली दिल्याने नेते व पदाधिकारी हेही पक्षापेक्षा अधिक लाभ कुठे व कसा मिळेल, याचा विचार करीत आहेत. जुन्या नेत्यांवर अन्याय करून अन्य पक्षांमधून आलेल्या नेत्यांना सत्तापदे दिली जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपने घराणेशाहीवर सातत्याने टीका केली, मात्र पक्षात घराणेशाही वाढत आहे. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभा आणि त्यानंतर लोकसभेची उमेदवारी व केंद्रात मंत्रीपद मिळाले होते. त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. आता दुसरे चिरंजीव नीलेश राणे यांच्या उमेदवारीसाठी राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत. शिंदेंकडे जागा झाल्यास त्यांच्या पक्षातही जाण्यास नीलेश यांना अडचण नाही. सर्व सत्तापदे राणे यांच्या घरात जाणार असतील तर कोकणातील भाजप नेत्यांनी नुसतीच कामे करायची का, असा सवाल विचारण्यात येत आहे. त्यासाठी राजन तेली यांनीही भाजप सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली, तरी त्यांचे चिरंजीव संदीप नाईक यांचाही उमेदवारीसाठी हट्ट होता. ती भाजपकडून न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करून बेलापूरमधून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. एकच निवडणूक पिता भाजप व पुत्र विरोधी पक्षाकडून (पवार गट) लढत आहे. नाईक यांच्या आशिर्वादानेच हे होत असले तरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखलही घेतलेली नाही. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही काळापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याविरूद्ध सुरू असलेल्या चौकशा थांबल्या. साखर कारखान्याला अर्थसहाय्य मिळाले. पण विधानसभेत उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर पाटील यांनी भाजपला रामराम ठोकून शरद पवार गटात प्रवेश केला. काँग्रेसमधून आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांना डावलून महसूलसारखे महत्वाचे खाते मिळाले. त्यांचे चिरंजीव सुजय यांना दोन वेळा लोकसभेची उमेदवारी मिळाली. ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना खासदारकी तर त्यांची मुलगी श्रीजया यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे गेल्यावेळी विधानसभेची निवडणूक हरल्यावर त्यांना पाच वर्षे राज्यसभा किंवा विधानपरिषद देण्यात आली नव्हती. लोकसभेसाठीही त्यांची बहीण डॉ. प्रीतम यांचे तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रीतम यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या पूनम यांना दोन वेळा निवडून येवूनही तिसऱ्यांदा उमेदवारी नाकारली गेली. आमदार आशिष शेलार आणि त्यांचे सख्खे बंधू विनोद या दोघांनाही विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : भाजपाच्या ८० आमदारांना पुन्हा तिकीट; उमेदवारी देताना भाजपाने यावेळी अधिक खबरदारी का घेतली?

गेल्या निवडणुकीत भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना उमेदवारी नाकारली. बावनकुळे यांना नंतर प्रदेशाध्यक्षपद, विधानपरिषद व आता विधानसभेची उमेदवारी मिळाली. तावडे यांना केंद्रीय सरचिटणीसपद मिळाले असले तरी लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली नाही. डॉ. अजित गोपछडे, अशोक चव्हाण व इतरांना संधी मिळाली, पण पक्षाचे जुने नेते असलेल्या तावडे यांचा विचार झाला नाही.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठरेना

विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या चित्रा वाघ, धर्मगुरू राठोड, विक्रांत पाटील यांना संधी मिळाली. पण पक्षातील जुने नेते आणि पदाधिकारी माधव भांडारी, केशव उपाध्ये, सुनील कर्जतकर आदी कोणाचाही विचार झाला नाही. महायुती असल्याने भाजप नेत्यांना उमेदवारी मिळत नसून शिंदे व पवार गटातील नेत्यांना मिळत आहे. भाजप नेत्यांना मात्र त्यांचे निवडणुकीसाठू काम करावे लागत आहे. जुन्या नेते व पदाधिकाऱ्यांना डावलून अन्य पक्षांमधून आलेल्या नेत्यांना संधी व सत्तापदे मिळत असल्याने लोकसभा निवडणुकीतही भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका बसला, तसा या निवडणुकीतही बसण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp loyalists displeased due to nepotism and opportunities given to outsiders who newly joined bjp print politics news css

First published on: 23-10-2024 at 14:16 IST
Show comments